तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी.
पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही.
लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत.
अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे.
आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.