अश्मयुग हा मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड होय हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले जाते.
यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.
अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.
- आद्याश्मयुग (सु. पाच लाख वर्षांपूर्वीचे)
- पूर्वपुराणाश्मयुग (सु. पाच लाख ते दीड लाख वर्षे)
- मध्यपुराणाश्मयुग (सु. पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षे)
- उत्तरपुराणाश्मयुग (सु. पंचवीस हजार ते दहा हजार वर्षे)
- आंतराश्मयुग (सु. पंधरा हजार ते दहा हजार वर्षे)
- नवाश्मयुग (इ. स. पू. सु. आठ हजार वर्षांपासून )