मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागितिहास अशी संज्ञा दिली जाते. प्रागितिहास, आद्य ऐतिहासिक युग आणि इतिहासयुग असे तीन प्रमुख टप्पे मानले जातात; परंतु या तीन टप्प्यांची मांडणी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत योजली गेली नव्हती. याचे कारण असे की यूरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत जगाची व मानवाची प्राचीनता पाषाणयुगाइतकी असेल, असे कुणालाच वाटले नाही.
एकोणिसाव्या शतकात सर चार्लस लायल यांनी भूविज्ञानानुसार पृथ्वी व मानव यांची प्राचीनता फार आहे, असे मत पहिल्या प्रथम मांडले.त्यानंतर बूशे द पर्थ या फ्रेंच संशोधकाला सों नदीच्या वाळूच्या घट्ट थरात अश्मयुगीन मानवी हत्यारे सापडली व हे वाळूचे थर फार प्राचीन असले पाहिजेत, असे मत त्याने मांडले, त्यामुळे यूरोपमध्ये तत्कालीन धर्मग्रंथांनुसार प्रचलित असलेले मानवी प्राचीनतेबद्दलचे मत खोडून काढले गेले. याच शतकात अश्मयुगीन मानवी हत्यारे व नामशेष झालेल्या जनावरांच्या अश्मास्थी इतरत्र सापडल्याने मानवी इतिहासाच्या टप्प्यांच्या फेरमांडणीला चालना मिळाली.
या वैचारिक मंथनातूनच डॅन्येल विल्सन यांनी प्रागितिहास या संज्ञेचा वापर पहिल्या प्रथम केला आणि याच संदर्भात पुढे आद्य इतिहास व इतिहास या संकल्पना रूढ झाल्या. ज्या काळात लिखित स्वरूपातील पुरावा उपलब्ध होतो, तो सर्व कालखंड ऐतिहासिक युग या संज्ञेने ज्ञात आहे. ज्या काळात लेखनाची कोणती तरी पद्धती प्रचलित होती; परंतु तिचा उलगडा करता आलेला नाही, मात्र नंतर तत्संबंधी लिहिले गेले, तो काळ आद्य इतिहास या वर्गात मोडतो. सिंधू संस्कृतीच्या मुद्रांवर लिखाण आहे, असे तज्ञांचे मत आहे; तथापि ती लिपी अद्यापि वाचता येत नसल्याने या संस्कृतीला आद्य ऐतिकासिक काळातच गृहीत धरतात. या दोन्ही कालखंडांच्या आधीच्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे संबोधिले जाते.या काळात लेखनकला, स्थिर जीवन, धातूंचा वापर, योजनाबद्ध वसाहत व अन्नोत्पादन यांचा अभाव दिसून येतो.
अश्मयुगासंबंधी जसजसा पुरावा उपलब्ध झाला, तसतसे या युगाचे उपकाल अथवा उपखंड योजणे अपरिहार्य ठरले. १८५१ मध्ये विल्सन यांनी प्रागितिहास ही संज्ञा वापरली; पण १८६५ मध्ये लॉर्ड एव्हबरी यांनी त्यात नवाश्मयुग या संज्ञेची भर टाकली. यानंतर द मॉर्तिये या फ्रेंच पुरातत्त्वज्ञाने आद्याश्मयुग, पुराणाश्मयुग आणि नवाश्मयुग अशी रचना करून पुराणाश्मयुगाचे आदी, मध्य व उत्तर असे तीन उपविभाग केले. या तीनही संज्ञा काहीशा कृत्रिम आहेत. त्या कालनिबद्ध वा प्रदेशनिबद्ध नाहीत. आजही पाषाणयुगीन जीवन जगणाऱ्या जमाती अस्तित्वात आहेत. मानवी संस्कृतीची उत्क्रांती याच क्रमाने सगळीकडे झाली, असेही मानणे चुक ठरेल. प्रागितिहास ही संज्ञा सर्वसामान्यपणे पाषाणयुगीन संस्कृतीशी निबद्ध आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.