पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही.
पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.
नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी.भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ताम्रपाषाणयुग यांच्या संधिकालातीलच आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.