हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला.
ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते.
नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.