मराठ्यांना भाला व तलवार ही बंदुकीपेक्षा अधिक प्रिय वाटत. मराठा भालाधाऱ्यांना इटेकरी किंवा विटेकरी म्हणत. मराठा पायदळ व घोडदळात पाच प्रकारचे भाले वापरात होते. इटा व बर्च्छा (फेकण्याचे) हातातला भाला, सांग किंवा संग (लांब सरळ टोकदार फाळाचा) व फाळाचे टोक बाकदार चोचीसारखे असलेला भाला. हे आयुध साधारणपणे ४ ते ४.५ मीटर लांब असे. इटा व बर्च्छा हे बहुधा संपूर्ण लोखंडी व पोलादी असत. इटाला दोरी बांधून फेकण्याचा पल्ला वाढवीत व तो परत माघारी खेचीत. छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत महाराजांच्या पाठोपाठ इटेकरी असत आणि नंतर इतर सैनिक चालत. संरक्षणासाठी मराठे राऊत पायउतार होऊन भाल्यांची तटबंदी उभारीत. मुसलमान बखरकार मराठा इटेकऱ्यांना ‘गनीम-इ-लाभ’ (शापग्रस्त शत्रु) व ‘नैझ-बाज’ (पट्टीचे भालाधारी) म्हणत. मराठयांच्या भालाधारी घोडदळाची नक्कल स्किनर या अँग्लो-इंडियन अधिकाऱ्यांनी एकोणिसाव्या शतकात केली. आजही स्किनर्स हॉर्स हे घोडदळ विख्यात आहे.