प्राचीन कालापासून जगात सर्वत्र भाला वापरला जाई; मात्र त्या त्या समाजाच्या युद्धपद्धतीप्रमाणे भाल्याला कमीअधिक महत्त्व मिळे. ग्रीक व मराठे यांना भाला अतिप्रिय वाटे. आर्यमित्र औदुंबर (इ. स. पू. दुसरे-पहिले शतक), अयोध्येचा आर्यमित्र, जेष्ठमित्र (इ. स. पू. पहिले शतक), कार्तिकेय (उज्जयिनी) व यौधेयांच्या नाण्यांवर भाले आढळतात; तर इंडो – ग्रीक, इंडोपार्थियन व इंडो- बॅक्ट्रियन यांच्या नाण्यांवर प्रामुख्याने भालेच दिसतात; तसेच कुशाणाच्या व गुप्ताच्या नाण्यांवर आणि लेण्यांतील चित्रे व मूर्तिशिल्पे यांतही भाले आढळतात.कालिदासाच्या रघुवंशात भाल्याची वर्णने आहेत. शस्त्र म्हणून भाल्याचे महत्त्व सतराव्या शतकानंतर संपुष्टात येऊ लागले. बंदुक आणि रायफलीच्या नळीला संगीन जोडून त्या जोडशस्त्राचा भाल्याप्रमाणे उपयोग करण्यास सुरूवात सुरूवात झाली. पहिल्या जागतिक महायुद्धात (१९१४-१९) घोडदळ निष्प्रभ झाल्यामुळे भाले प्रचारातून गेले. भारतात १९२७ सालापर्यंत एक परंपरा म्हणून घोडदळाकडे भाले होते. सांप्रत भारताच्या राष्ट्रपतींचे शरीररक्षक घोडदळ राष्ट्रीय समारंभप्रसंगी भाले मिरवतात.