रामायणानुसार इक्ष्वाकु वंशात सगर नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याच्या दोन राण्या होत्या - केशिनी आणि सुमती. दीर्घ काळापर्यंत संतान जन्माला न आल्यामुळे राजा आपल्या दोन्ही राण्यांना घेऊन हिमालयात गेला आणि तिथे पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या सुरु केली. तेव्हा महर्षी भृगुंनी त्यांना वरदान दिले की एका राणीला साठ हजार अभिमानी पुत्र होतील तर एका राणीला एक वंशाधार पुत्र होईल. कालांतराने सुमतीने तुम्बिच्या आकाराच्या एका गर्भपिंडाला जन्म दिला. राजा ते फेकून देणार होता तेवढ्यात आकाशवाणी झाली की त्या तुम्बीमध्ये ६० हजार बीज आहेत. तुपाने भरलेल्या एकेका मडक्यात एकेक बीज सुरक्षित ठेवल्यास कालांतराने त्यातून ६० हजार पुत्र जन्माला येतील. याला महादेवाची वाणी मानून सगरने त्याप्रमाणे सुरक्षित ठेवले. वेळ भरल्यानंतर त्या मडक्यांमधून साठ हजार पुत्र उत्पन्न झाले. जेव्हा राजा सगर ने अश्वमेध यज्ञ केला, तेव्हा त्याने या साठ हजार पुत्रांना यज्ञाच्या घोड्याच्या सुरक्षेसाठी नियुक्त केले. देवराज इंद्राने कपटाने तो घोडा चोरून कपिल मुनींच्या आश्रमात बांधला. त्या घोड्याला शोधत शोधत जेव्हा हे साठ हजार पुत्र कपिल मुनींच्या आश्रमात पोचले, तेव्हा त्यांना वाटले की कपिल मुनिंनीच यज्ञाचा घोडा चोरला आहे. असे वाटल्यामुळे त्यांनी कपिल मुनींचा अपमान केला. ध्यानमग्न कपिल मुनींनी जसे आपले डोळे उघडले, राजा सगर चे साठ हजार पुत्र तेथेच भस्म होऊन गेले.