कृपाचार्य हे महाभारतातील प्रमुख पात्रांपैकी एक होते. त्यांच्या जन्माशी संबंधित सर्व वर्णन आपल्याला महाभारताच्या आदि पर्वात पाहायला मिळते. त्याच्या अनुसार महर्षी गौतम यांचे पुत्र होते शरद्वान. ते बाणांसोबतच जन्माला आले होते. धनुर्विद्या शिकण्यात त्यांना जेव्हढा रस होता, तेवढा अभ्यासामध्ये नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून सर्व अस्त्र - शस्त्र प्राप्त केली. शरद्वानाची घोर तपश्चर्या आणि धनुर्विद्येतील नैपुण्य बघून देवराज इंद्र फार भयभीत झाला. त्याने शरद्वान यांच्या तपश्चर्येत बाधा आणण्यासाठी जानपदी नावाची एक देवकन्या पाठवली. ती शरद्वान यांच्या आश्रमात येऊन त्यांना भुरळ घालू लागली. त्या सौंदयवतीला बघून शरद्वानांच्या हातातून धनुष्य - बाण खाली पडले. ते अतिशय संयमी होते, तेव्हा त्यांनी स्वतःवर ताबा मिळवला, परंतु त्यांच्या मनात वासना उत्पन्न झालीच. त्यामुळे नकळतच त्यांचे वीर्य स्खलन झाले. ते धनुष्य, बाण, आश्रम आणि त्या सुंदरीला सोडून ताबडतोब तिथून निघून गेले.
त्यांचे वीर्य धारेवर पडल्याने ते दोन भागात विभागले गेले. त्यातून एक कन्या आणि एका पुत्राची उत्पत्ती झाली. त्याच वेळी योगायोगाने राजा शांतनू तेथून जात होता. त्यांच्या नजरेला ते बालक आणि बालिका पडली. शांतनुने त्यांना उचलले आणि आपल्या बरोबर घेऊन गेले. त्याने बालकाचे नाव कृप ठेवले आणि बालिकेचे नाव कृपी ठेवले. जेव्हा ही गोष्ट शरद्वानाला समजली, तेव्हा ते राजा शांतानुकडे आले. मुलांचे नाव, गोत्र इत्यादी सांगून त्यांना चारी प्रकारचे धनुर्वेद, विविध शास्त्र आणि त्यांच्या रहस्यांचे शिक्षण दिले. थोड्याच दिवसात कृप सर्व विषयांत पारंगत झाला. कृपाचार्यांची योग्यता पाहून त्यांना कुरुवंशाचे कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले.