( ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

राधा ही एका गरीब कुटुंबातील सोळा वर्षांची मुलगी होती .तिला तिच्या पाठीपाठ तीन बहिणी व एक भाऊ होता .घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्यामुळे या सर्वांचा प्रतिपाळ करताना तिच्या आई वडिलांच्या नाकी नऊ येत असत.राधा ही अतिशय सुंदर मुलगी होती . एका गरीब कुटुंबात तेजस्वी हिरा जन्माला आला होता .तिच्या वयाबरोबर तिचे सौंदर्य जास्त जास्त खुलत जात होते.ही इतकी सुंदर आहे की राजाची राणी म्हणून शोभेल असे सर्वजण म्हणत असत.

ती अठरा वर्षांची झाली .आपल्याला अनुरूप अश्या एखाद्या मुलाबरोबर लग्न व्हावे असे तिला साहजिकपणे वाटत होते. गरीब असला तरी चालेल परंतु सर्व दृष्टींनी आपल्याला अनुरूप असावा असे तिला वाटत होते .दोघांचेही एकमेकांवर प्रेम असावे दोघांनीही हातात हात घालून जीवन प्रवास करावा.अशी तिची माफक अपेक्षा होती .परंतू बऱ्याच वेळा गरीबांच्या किंवा इतरांच्याही अपेक्षा पूर्ण होतात असे नाही.उत्पद्यंते विलीयंते दारिद्रय़ाणाम् मनोरथ: असे संस्कृत वचन आहे.तसेच तिचे झाले.

किंबहुना आपण असे म्हणूया की आपल्या कुटुंबाचे भले व्हावे म्हणून तिने त्याग केला .एका अर्थाने जन्मभर ती जळत राहिली .

त्याच गावात एक जमीनदार होता .तो खानदानी श्रीमंत होता  त्याच्या मालकीचे दहा गाव होते.जमीनदारी बरोबरच तो सावकारीही करीत असे.गडगंज इस्टेट,  मोठा राजवाड्यासारखा वाडा, अनेक नोकर चाकर, पूर्वीच्या काळातील एखाद्या मोठ्या सरदाराला लाजवील असा त्याचा थाट होता. त्याचे वय त्यावेळी चाळीस वर्षे असावे.हा जमीनदार बाहेरख्याली जुगारी व चंगी भंगी होता .रात्रीचा घरात असण्यापेक्षा तो घराबाहेरच जास्त असे .घरी असला तरी कुणीतरी नृत्यांगना  त्याच्यासोबत असेच .बाहेर व घरीही  त्याचे अनेक रंगढंग चालत असत. याहून जास्त मला कांही सांगता येत नाही.

सरकारने जमीनदारी नष्ट केली .त्यांची रयतेवरवरील जुलमी सत्ता नष्ट  केली . तरीही त्यांची मग्रुरी व पैशामुळे येणारी हुकुमत सत्ता नष्ट झाली नव्हती.त्याला अजून मूलबाळ नव्हते.आत्तापर्यंत त्याने दोन लग्ने केली होती.एकीने आत्महत्या केली . दुसरी कोणत्या तरी रोगाने मृत्यू पावली .हल्ली तो विधुर होता .एके दिवशी फिरत असताना त्याचे लक्ष राधावर गेले .तिच्या सौंदर्याने तो पागल झाला . ती लग्नाशिवाय आपल्याला मिळणार नाही याची त्याला खात्री होती.विवाह करून तिला आपलीशी करण्याचे त्याने ठरविले . विवाहासाठी तिच्या वडिलांकडे त्याने तिला मागणी घातली .तुला हवा तेवढा पैसा देतो. पैशामध्ये तुला गाडून टाकतो. असा निरोप त्याने दिला .

राधेच्या वडिलांचे राधेवर अपार प्रेम होते .तिच्या वडिलांना राधेचे लग्न जमीनदाराशी व्हावे असे मुळीच वाटत नव्हते.जमीनदार कसा आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. जमीनदाराची व्यसनी,बाहेरख्याली, अशी कीर्ती होती .आपल्या मुलीला तिथे मुळीच सुख मिळणार नाही याची त्यांना खात्री होती.त्यांना नकार कळवावा. मग जे कांही होईल ते होवो असे त्यांचे मत होते.जमीनदराची आर्थिक सत्ता होती .त्याचे पोसलेले गुंड होते. त्याने पोलिसांनाही मिंधे करून ठेवले होते .त्याने केलेल्या अन्यायाला वाचा फोडणे बहुत मुष्किल होते .त्याची गुंडगिरी माहीत असली, त्याच्याकडून भरपूर पैसा मिळेल याची खात्री असली तरीही  तिचे लग्न त्याच्याशी व्हावे असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.त्याचे गुंड आपल्या मुलीला वेळप्रसंगी उचलून नेतील हेही त्याला माहीत होते .जमीनदाराच्या गुंडांपासून वाचवण्यासाठी तिला शहरात तिच्या मामाकडे पाठवून द्यावे असे त्याने ठरविले. 

ते नकार कळवणार होते.राधेने वडिलांना समजाविले .मला तीन बहिणी आहेत. एक भाऊ आहे.त्यांचे शिक्षण विवाह यासाठी पैसा पाहिजे . भाऊही शिकून खूप मोठा व्हावा असे मला वाटते .त्यासाठीही पुष्कळ पैसा पाहिजे .जमीनदाराशी लग्न केले तर आपल्याला पैशाला ददात पडणार नाही.त्याला नकार कळविला तर तो काहीही करू शकतो . त्याच्याशी दुष्मनी महाग पडेल .मी सारासार विचार करून निर्णय घेतला आहे .कुटुंबाचे सुख, कुटुंबाचा उत्कर्ष,  मी मोठी असल्यामुळे माझी जबाबदारी आहे.तुम्ही होकार कळवा .

राधेच्या वडिलांच्या मनात नसतानाही राधेचा आग्रह पाहून सारासार विचार करून त्यांनी होकार कळविला .जमीनदाराला खात्री नव्हती .साम दाम दंड भेद असे आणखी काही मार्ग राधेला मिळविण्यासाठी योजावे लागतील असे त्याला वाटत होते .

राधाचे लग्न धूमधडाक्यात झाले .पंचक्रोशीतील सर्व गांव आठ दहा दिवस जमीनदाराकडे जेवत होते. लग्न झाल्यावर जमीनदार राधेमध्ये गुंगून पडला.त्याचे रात्रीचे बाहेर फिरणे भटकणे मौजमजा करणे बंद झाले.  घरीही कुणी नृत्यांगना आली नाही .गावातील कुणा बाईकडे वाईट नजरेने त्याने पाहिले असेही झाले नाही. जमीनदार सुधारला असे वाटू लागले .परंतु हे सर्व तात्पुरते होते .थोड्याच महिन्यात जमीनदाराला नवीन खेळण्याचा कंटाळा आला .त्याचे पुन्हा ये रे माझ्या मागल्या चालू झाले .रात्रीचे बाहेर भटकणे, दारू पिणे, घरी बाया नाचवणे ,सर्व काही साग्रसंगीत चालू झाले.

राधाच्या घरची परिस्थिती मात्र सुधारली .तिच्या तीन बहिणी शहरात जाऊन त्यांना हवे ते शिक्षण घेवू शकल्या .त्यांना तिथेच नोकऱ्या लागल्या .तिथेच विवाहही झाले.तिन्ही बहिणी सर्वार्थाने सुखी होत्या .तिचा भाऊही हुषार होता.तोही शहरात चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाला .त्याने आई वडिलांना शहरात नेले.जमीनदाराने लग्नाच्या वेळी खूप पैसा दिला होताच परंतु पुढेही त्याने कधी पैशाला कमी पडू दिले नाही .जमीनदार त्याची पूर्व कीर्ती पाहता राधेच्या बहिणींकडे कोणत्या नजरेने पाहील अशी सर्वांनाच काळजी होती परंतु त्या बाबतीत जमीनदार सज्जन निघाला.

राधेने जाणीवपूर्वक स्वतःला गाडून घेतले आणि कुटुंबाचा उत्कर्ष साधला .  

राधा त्याला घरी बांधून ठेवू शकली नाही.तिला तशी अपेक्षाही नव्हती.तिला त्याचा सहवास किळसवाणा वाटत होता. आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी तिने हे निखारे हातात घेतले होते.  असंख्य,अविरत, अनेक वर्षे चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे जमीनदाराचे शरीरही आतून पोखरले होते. तो उसना आव आणत होता .जमीनदारांच्या पहिल्या दोन पत्नी त्याला मूल देऊ शकल्या नव्हत्या.राधेला दिवस गेले. सर्वांना अत्यानंद झाला .तिने एका मुलाला जन्म दिला.जन्मापासूनच तो आजारी आजारी होता .अनेक दुखण्यातून मरता मरता तो वाचत होता .त्याच्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होत होता . असे होत होत तो मोठा झाला .त्याचे रूपांतर एका तरुणात झाले .

जमीनदार अनेक व्यसनांनी पोखरलेला असल्यामुळे  राधेबरोबरच्या लग्नानंतर तो थोड्याच वर्षांत आजारपणामुळे अंथरुणाला खिळला .सर्व कारभार आता राधेच्या हातात आला होता.ती एकाच वेळी आजारी मुलगा, आजारी नवरा व सर्वत्र पसरलेला कारभार समर्थपणे हाताळीत होती .

एक दिवस आजारी नवऱ्याने देह ठेवला .आता तर सर्वार्थाने सर्व सत्ता तिच्या हातात आली होती .ती वरवर सुखी वाटत होती परंतु अंतर्यामी किती सुखी होती ते तिचे तिलाच माहीत

तिला जमीनदारापासून वैवाहिक सुख फारच कमी मिळाले होते.जवळजवळ मिळाले नव्हतेच . तिलाही भावना होत्या. तिलाही शरीराची गरज होती.तरुण तगडा पोलिस इन्स्पेक्टर, तरुण देखणा वकिलीला नवीनच सुरुवात केलेला वकील ,अश्या  अनेक लोकांची तिच्या घरी ये जा सुरू झाली .शहरातील अनेक प्रकारचे अधिकारी फिरतीवर आले की आवर्जून राधेच्या राजवाड्यावर आपला मुक्काम टाकीत असत.राधा सर्वांची सरबराई उठबस चांगल्या प्रकारे ठेवीत असे .मोठमोठ्या अधिकाऱ्यांपासून राजकारण्यांपर्यंत तिचे घनिष्ठ संबंध होते .लोक काहीबाही बोलत खरे काय ते राधेला व त्या लोकांनाच माहीत.काही कमी जास्त असले तरी राधेची परिस्थिती, वय पाहता ,तिला दोष देता येणार नाही असे बर्‍याच  जणांना वाटत होते.

(क्रमशः)

२/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel