(ही गोष्ट काल्पनिक आहे.कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

दुपारचा एक वाजला होता .जेवण झाल्यावर वसंतराव पेपर वाचीत होते .तसा पेपर सकाळीच वाचून झाला होता.वसंतराव बातम्या वगैरे सकाळी वाचीत. लेख वगैरे  दुपारी संध्याकाळी सवडीने वाचत असत.पेपर वाचता वाचता वसंतराव  दुपारी एक डुलकी काढीत.निवृत्त झाल्यावर त्यांना ही सवय लागली होती .पूर्वी दुपारचे ते कारखान्यातच असत .घरून डबा येत असे .त्यांचे जेवण कारखान्यातच होत असे.वसंतराव पेपर वाचता वाचता तसेच डोळे मिटून झोपी गेले .चष्मा तसाच डोळ्यांवर होता. झोपेतून ते फोनच्या आवाजाने  जागे झाले .गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना क्षणभर आपण कुठे आहोत ते कळेना .भानावर येऊन त्यांनी मोबाइल उचलला.

फोनवर त्यांच्या कारखान्याचे मॅनेजर होते.कारखान्यात एका यंत्राचा मोठा स्फोट झाला आहे. सर्वत्र धूर झाला आहे . फायर ब्रिगेडला बोलाविले आहे . म्हणून त्यांनी बातमी दिली .वसंतरावांनी जयंत तिथे आहे का म्हणून विचारले .मॅनेजरनी तो तिथे नाही सकाळी येऊन ते लगेच गेले म्हणून सांगितले.त्याला तुम्ही कळविले का असे विचारल्यावर त्यांचा फोन लागत नाही म्हणून मॅनेजरने सांगितले.बातमी ऐकून वसंतरावांची झोपच उडाली.घाईघाईने कपडे करून ते मोटारीत बसले व ड्रायव्हरला त्यांनी मोटार कारखान्यावर घ्यायला सांगितली.

त्यांना या शहरात आल्यापासूनच्या घटना आठवू लागल्या. त्यांना कारखान्याच्या सुरुवातीपासूनच्या सर्व घटना आठवू लागल्या .स्वतःचा स्वतंत्र धंदा करायचा ही त्यांची लहानपणापासूनची इच्छा होती .मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यावर त्यानी प्रथम एका कारखान्यात नोकरी धरली. पत्नीची त्यांच्या आकांक्षेला पूर्ण साथ होती .काटकसर करून ते पैसे साठवत होते.त्यांची पत्नी नोकरी करीत होती .तिला वसंतरावांची इच्छा माहिती होती .दोघेही लहानश्या जागेत राहून संसार करीत होते .पैसे साठवायचे  बँकेकडून कर्ज घ्यायचे व कारखाना उभा करायचा या आकांक्षाने ते प्रेरित झाले होते .

सर्व गोष्टी मनासारख्या जमून आल्या .त्यानी लहानशी जागा घेऊन आपला स्वंतत्र व्यवसाय सुरू केला.अहोरात्र कष्ट करून ते आपला कारखाना वाढवीत होते .बँकेचे कर्ज वेळेवर फेडून ते आपली पत वाढवीत होते.वसंतरावांना जास्त कर्ज द्यायला हरकत नाही ते वेळेवर नक्की परत फेडणार अशी खात्री बँक व्यवस्थापनाची झाली .जास्त जास्त कर्ज घेऊन त्यांनी  कारखान्याचा विस्तार केला.दर वर्षी मिळालेल्या नफ्याचा फार मोठा भाग त्यांनी पुन्हा कारखान्यात गुंतवला. कारखान्याचा विस्तार चांगलाच मोठा झाला .

प्रॉडक्शन डिपार्टमेंट क्वॉलिटी डिपार्टमेंट मार्केटिंग डिपार्टमेंट जनरल अॅडमिनिस्ट्रेशन असे अनेक विभाग निर्माण करून, उत्पादनांवर योग्य नियंत्रण ठेवले जात होते . उत्पादनाच्या  दर्जामध्ये क्रमशः सुधारणा, उत्पादनांमध्ये विविधता, नवीन नवीन बाजारपेठांचा शोध ,अशा मार्गाने कारखान्याची उन्नती होत होती .

त्यांची आर्थिक उन्नतीही अर्थातच होत होती.दोन खोल्यांच्या जागेतून ब्लॉकमध्ये, ब्लॉकमधून मोठ्या फ्लॅटमध्ये व तेथून शेवटी स्वतःच्या बंगल्यांमध्ये असा त्यांचा हळूहळू  प्रवास झाला .दैव त्यांच्या बाजूला होते.यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले.आपली व आपल्या मालाची जाहिरात कशी करायची यातही ते तरबेज होते .त्यांच्या मुलाखती टीव्हीवर रेडिओवर येत असत .त्यांच्याबद्दल लेखही पेपरमध्ये छापून येत . यशोगाथा म्हणून त्यांच्या जीवनावर पुस्तकही प्रसिद्ध झाले होते.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून ते एक वर्ष निवडले गेले होते.अनेक मान सन्मान त्यांना मिळाले होते .

जयंत त्यांचा एकुलता एक मुलगा .तो इंजिनिअर होईल आणि कारखान्याचा सर्व भार समर्थपणे पेलील अशी त्यांना आशा होती.त्याला इंजिनिअर करायचे नंतर एमबीए मग कारखान्याची धुरा त्याच्याकडे सोपवायची आणि आपण निवृत्त व्हायचे असे त्यांचे मनसुबे होते .आतापर्यंत आपण कारखाना उर्जितावस्थेला आणण्यासाठी मरमर मेलो .आयुष्यात कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या .निवृत्त झाल्यावर त्या गोष्टी करायच्या असे त्यांनी ठरविले होते .आराम प्रवास नाटक सिनेमा इत्यादी गोष्टींचा आस्वाद,स्वतः एखादी कला शिकून घेणे, अध्यात्मावरील पुस्तकांचे वाचन,अशा कितीतरी गोष्टी त्यांना करायच्या होत्या .

थोडक्यात मनासारखे आयुष्य जगायचे त्यांच्या मनात होते.परंतु जयंतला इंजिनिअरिंगची मुळीच आवड नव्हती .त्याला कलेची आवड होती .जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जावे किंवा अभिनयाचे,दिग्दर्शनाचे किंवा चित्रपट व नाट्य व्यवसायातील इतर गोष्टींचे  धडे दिले जातील  अशा एखाद्या  संस्थेत अभिनयाचे शिक्षण घ्यावे आणि नाट्यव्यवसाय किंवा चित्रपट व्यवसाय यामध्ये जावे तिथे करिअर करावी ,असे त्याला वाटत होते .वसंतरावांच्या हट्टाखातर त्याने यांत्रिकी पदवी घेतली परंतु त्याचे मन मात्र अभिनयक्षेत्राकडे ओढ घेत होते .

शेवटी तडजोड करून त्याने कारखानाही पाहावा व अभिनयक्षेत्रातहि काम करावे असे ठरले.

वसंतरावांनी त्यांची वयाची साठ वर्षे झाल्यावर निवृत्त व्हायचे असे अगोदरपासूनच ठरविले होते .स्वतःचा कारखाना व्यवसाय धंदा असला म्हणून शेवटपर्यंत काम करीत राहावे हे त्यांना पसंत नव्हते .नोकरीमध्ये जसा मनुष्य अठ्ठावनाव्या किंवा साठाव्या वर्षी निवृत्त होतो त्याप्रमाणेच धंद्यातील मनुष्याने निवृत्त झाले पाहिजे असे त्यांचे मत होते .त्यांचा एकुलता एक मुलगा जयंत याला कारखान्यात काहीही रस नव्हता.त्याला अभिनय व पेंटिंग यांमध्ये रस होता.तरीही वसंतरावांनी त्याला तू कारखाना सांभाळ बघत जा  म्हणून सांगितले होते .

(क्रमशः)

२४/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel