(ही गोष्ट काल्पनिक आहे.कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

त्यांचा एकुलता एक मुलगा जयंत याला कारखान्यात काहीही रस नव्हता.त्याला अभिनय व पेंटिंग यांमध्ये रस होता.तरीही वसंतरावांनी त्याला तू कारखाना सांभाळ बघत जा  म्हणून सांगितले होते .

वडिलांच्या आग्रहास्तव  जयंतने नाईलाजाने मी मधून मधून बघत  जाईन म्हणून सांगितले होते . जयंत कारखान्यावर रोज एक चक्कर मारीत असे .तेथील निरनिराळ्या विभागाचे प्रमुख त्याला  सर्व काही आलबेल आहे म्हणून रिपोर्ट देत असत .खरोखरच सर्वत्र आलबेल आहे की नाही हे तो पाहत नसे .वसंतराव त्याला तू कारखान्यावर गेला होतास ना म्हणून विचारत, तो होय म्हणे. मुलगा सर्वकाही पाहत आहे असे समजून वसंतराव निवांत असत .असेच दिवस चालले होते .

सर्व काही आलबेल चालले आहे असे त्यांना वाटत होते .आणि आता त्यांना हा कारखान्यात स्फोट झाल्याचा फोन आला होता.

विचार चक्रामध्ये बुडलेले असताना त्यांना कारखाना केव्हा आला ते कळले नाही.

त्यांना मॅनेजर लगबगीने उतरून घेण्यासाठी आले  .जनरल मॅनेजर बरोबर त्यांनी कारखान्यात एक चक्कर मारली .निरनिराळ्या विभागांमध्येही ते जाऊन आले.सतत काही दिवस आपण सर्व विभागांमध्ये लक्ष घातले पाहिजे.सर्वांची झाडाझडती केली पाहिजे .एरवी कारखान्याची प्रकृती सुधारणार नाही हे त्यांच्या दर्दी नजरेला लक्षात आले.गेल्या वर्षभरात ते कारखान्याकडे आले नव्हते. जयंता चक्कर मारणे या पलीकडे आणखी काहीही करीत नव्हता. मालक लक्ष देत नाही असे पाहिल्यावर सर्वच विभाग सुस्त झाले होते .जो तो पाट्या टाकण्याचे व पगार घेण्याचे काम करीत होता .

आवश्यक तेव्हा यंत्राचे सर्व्हिसिंग केलेले नव्हते .आवश्यक तेव्हा यंत्राचे पार्ट्स बदलले नव्हते .जुनी यंत्रे काढून तिथे नवीन बसविण्यात आली नव्हती .मालाचा दर्जा टिकवण्यासाठी काहीही करण्यात आले नव्हते .क्वालिटी  डिपार्टमेंट ढेपाळले होते .मालाची विक्री व्यवस्थाही ढासळलेली होती .कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता .जो तो जमेल तेथे पैसे खाण्यात मश्गुल होता .आज यंत्राचा स्फोट झाला त्यामुळे वसंतराव कारखान्यावर आले .जर आणखी काही महिने असेच गेले असते तर कारखान्याची प्रकृती दुरुस्त होण्यापलीकडे गेली असती.छुप्या  कमिशनवर लोकांना कामे दिली जात होती . मालाच्या दर्जाचा कुणीच आग्रह धरीत नव्हता .किंबहुना टक्केवारी घेतल्यानंतर कुणीच कुणाला बोलू शकत नव्हता .जयंताचे कारखान्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते.तो नुसता कारखान्यात जात होता .काहीही पाहात नव्हता काहीही तपासत नव्हता.त्याचे सर्व लक्ष त्याच्या आवडत्या क्षेत्रात होते .

गेले महिनाभर वसंतराव रोज कारखान्यावर येत होते .प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक गोष्ट प्रत्येक हिशोब लक्ष घालून तपासत होते .सर्वांचेच धाबे दणाणले होते .सर्वांची सुस्ती उडाली होती .सर्वत्र पुन्हा शिस्त अंमलात आली होती .प्रत्येक गोष्टीवर पटापट निर्णय घेतले जात होते .त्या निर्णयांची अंमलबजावणीही होत होती.

सहा महिन्यांमध्ये  कारखाना पूर्वीच्याच ताकदीने गतीने कौशल्याने शिस्तीने काम करू लागला होता .कारखान्यातील जुन्या जाणत्या लोकांना कुणी विचारत नव्हता .ते अडगळीत पडले होते.ते कंटाळून गेले होते. त्यातील काही जणांनी तर नोकरी सोडून दुसरीकडे नोकरी धरली होती.त्यांना परत बोलाविण्यात आले .जुन्या जाणत्या प्रामाणिक लोकांना त्यांचे अधिकार देण्यात आले.कोणत्याही व्यवसायात अनेक लोकांचा सहभाग असतो .त्यांना एका सूत्रात गोवणे हे कसबाचे काम असते.त्यासाठी कुशल नेतृत्व लागते.

जयंतने अनेक नवीन लोकांची भरती केली होती .ते केवळ होयबा होयबा करणारे व पाठीमागून त्यांना वाटेल तसे वागणारे होते .त्यांनीच कारखाना दिवाळे काढण्याच्या स्थितीपर्यंत आणला होता .या सर्वाला जयंत जबाबदार होता .त्याला त्याच्या नावडत्या क्षेत्रांमध्ये जबरदस्तीने टाकल्यामुळे पर्यायाने वसंतराव या सर्वाला जबाबदार होते.

वसंतरावांचे निवृत्तीचे स्वप्न विरून गेले होते.उलट त्यांना दुप्पट जोमाने काम करावे लागले होते .त्यांनी जयंतला कामातून केव्हाच मोकळा केला होता .तुला जे आवडते ते कर म्हणून त्यांनी त्याला पूर्ण मोकळीक दिली .अनेक नवीन नेमलेले लोक कामावरून काढून टाकले .कारखान्यांमध्ये पूर्वीची शिस्त व कार्यक्षमता आणली .

या सगळ्या घटनेमधून वसंतराव एक मोठा धडा शिकले .मुलांना सल्ला जरूर द्यावा.चुकत असतील तर त्यांना चेतावणी जरूर द्यावी .परंतु त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करू द्यावे .जोरजबरदस्तीने काहीही साध्य होत नाही .ना घरका ना घाटका अशी स्थिती होते.

निवृत्ती कि काम या द्वंद्वात वसंतराव सापडले होते. त्यांना व त्यांच्या पत्नीला स्वतःचा म्हणून वेळ पाहिजे होता.कारखाना हा त्यांचा छंद जरूर होता .परंतु त्यांना इतरही अनेक छंद होते .कारखाना त्यानी नावारूपाला जरूर आणला होता .इतरही छंद त्यांना खुणावत होते .

शेवटी त्यांनी कारखाना विकून टाकायचे ठरविले .काही कोटी रुपयांना त्यांचा कारखाना विकला गेला .

आता वसंतराव खऱ्या अर्थाने निवृत्त झाले आहेत .त्यांच्या इतर आवडत्या गोष्टीसाठी ते पूर्ण वेळ देऊ शकतात .

*नोकरी करणारा मनुष्य जसा पूर्णपणे निवृत्त होऊ शकतो तसा व्यवसायातील नाही *

*कोणतीही गोष्ट कोणावरही लादू नये *

*ते काम लादावर्दीचे होते.* 

*धंदा व्यवसाय मग तो कोणताही असो जर पुढील पिढी त्यामध्ये रस घेईल, तो कार्यक्षमतेने चालवील, तरच मालक खऱ्या अर्थाने निवृत्त होऊ शकतो.*

*अन्यथा नाही .हेच खरे.* 

(समाप्त)

२४/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel