( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

एकामागून एक अशी आणखीही अनेक संकटे आली.पुढील कांही दिवस या संकटांमध्ये निरनिराळी भर पडत गेली.सर्व ग्राहक हॉटेल सोडून गेले.सर्व( सोशल मीडियावर) सामाजिक माध्यमांवर, न्यूज चॅनेल, वर्तमानपत्रे, इत्यादीवर ही बातमी आली.या राजवाडय़ाच्या खर्‍या खोट्या कथा सर्वत्र प्रसृत झाल्या.वेताळ पंचविशी सारखी एकाने शांतिकुंज पंचविशी लिहिली.   कुणीही हॉटेलमध्ये येत नाहीसा झाला.शांतिकुंजचे अशांतिकुंजमध्ये रूपांतर झाले.

वेळोवेळी केवळ कांही काळासाठी यंत्रणेमध्ये नादुरूस्ती एवढ्यापुरताच त्रास सिमित राहिला नाही.पुतळ्यांची मोडतोड, जिन्यांची मोडतोड,रात्री भयानक आवाज येणे,भीतीदायक आकृत्या दिसणे,अशा गोष्टी सुरू झाल्या.कुणीही या हॉटेलकडे फिरकत नाहीसा झाला.नोकरवर्ग सोडून गेला.हॉटेल बंद करण्यात आले.किंबहुना ते ग्राहकांअभावी   बंद झाले.काम करण्यासाठी कुणीही तयार होत नव्हते.       

मनसुखलाल (हॉटेल मालक) या सर्वांचे कारण शोधण्यासाठी प्रयत्नशील होता.

कारण मिळाले असते तर ते दूर करता आले असते.

शेवटी हा सर्व  ~संयुक्त गट भुताटकी~चा प्रकार आहे असे लक्षात आले. 

ही सर्व कथा सांगून झाल्यावर आमच्या(गाइड/वाटाडय़ा) मार्गदर्शकाने आम्हाला घेऊन  पडझड झालेल्या शांतिकुंजला एक फेरी मारली.अव्यवस्थित वाढलेले गवत,रंग उडालेली पाणी नसलेली कारंजी,पोहण्याचा कोरडा तलाव,गंजत पडलेली मोडतोड झालेली छप्पर उडालेली मध्यवर्ती   वातानुकूलित यंत्रणा,वीज निर्मितीसाठी बांधलेले छोटेसे परंतु   आता उद्ध्वस्त अवस्थेत असलेले पॉवर हाऊस,अस्ताव्यस्त वाढलेली झुडुपे,मोडकी तोडकी बाके,कांही धड आणि कांही मोडकेतोडके संगमरवरी पुतळे, इत्यादी सर्व अवशेष पाहून आम्ही शांतिकुंजच्या मुख्य दरवाजाजवळ आलो.

आमचा मार्गदर्शक आम्हाला घेऊन शांतिकुंजमध्ये शिरला.सुरुवातीलाच मोठा प्रशस्त जिथे दरबार भरू शकेल असा एक हॉल होता.पंचतारांकित हॉटेल अस्तित्वात असताना याचा स्वागतकक्ष म्हणून वापर केला जात होता.संगमरवरी पुतळे, भिंतीवर लावलेल्या मोडक्यातोडक्या तसबिरी,रया गेलेले सोफा सेट,विस्तृत काऊंटर,इत्यादी सर्वत्र पसरले होते.स्वागत कक्ष पाहून झाल्यानंतर आम्ही रेस्टॉरंट कम बार या विभागात गेलो.तिथेही सर्व उद्ध्वस्त स्वरुपात दिसत होते.येथे त्याचप्रमाणे जिन्यातही संगमरवरी दगडांचा भरपूर वापर केलेला होता.

राजवाडा सात मजली होता.सर्व जिने चढूनच जावे लागले.सर्वत्र संगमरवरी दगडाचा भरपूर वापर केलेला होता.प्रत्येक मजल्यावर छोटासा बार होता.                  

प्रत्येक मजल्यावर दहा राजेशाही खोल्या होत्या .प्रत्येक खोली म्हणजे एक अलिशान पूर्णपणे फर्निश्ड फ्लॅट होता .आता अर्थातच तो उद्ध्वस्त अवस्थेत होता.प्रत्येक मजल्यावरील प्रत्येक खोलीची कमी जास्त प्रमाणात वाताहात झालेली होती.एकूण तीन लिफ्ट होते.दोन ग्राहकांसाठी व एक कर्मचाऱ्यांसाठी अशी व्यवस्था होती .प्रत्येक मजल्यावर लांब रुंद कॉरिडॉर तर होताच शिवाय एक हॉलही होता.प्रत्येक खोली उद्ध्वस्त अवस्थेत होती .ठिकठिकाणी उभे केलेले पुतळे मोडलेले होते.उद्ध्वस्त शांतिकुंज, उद्ध्वस्त अवस्थेतही  प्रेक्षणीय होता!उद्ध्वस्त अवस्थेत ते सर्व पाहताना आमची मन:स्थिती सुन्न झाली होती.आम्ही मजले चढत चढत, मजला दरमजला करीत, गच्चीवर आलो.

मी गाईडला विचारले हे सर्व असे उद्ध्वस्त अवस्थेत टिकून कसे राहिले आहे.तो म्हणाला उद्ध्वस्त अवस्थेत जसेच्या तसे राखून ठेवण्याची जबाबदारी पुराणवस्तू संशोधन विभागाकडे आहे.त्यामुळे जशी मोडतोड झालेली आहे तशीच ती खात्यातर्फे ठेवली जाते.प्रत्येक मजल्यावर कांही ना कांही दुरूस्तीचे काम चाललेले दिसत होते.मात्र कोणतीही गोष्ट पूर्ण अवस्थेला नेण्याचा कुणीही प्रयत्न करीत नव्हता.तसा प्रयत्न केल्यास कुणीतरी अज्ञात शक्ती तो प्रयत्न हाणून पाडत होती.

गच्चीवर आल्यावर आम्ही गाइडला विचारले हे असे कां होत आहे ते शेवटी माहीत झाले का?गाईड म्हणाला हो माहीत झाले.येथे गुहेत एक मांत्रिक राहतात .त्यांना स्थानिक लोक,साधुबाबा म्हणतात.एक दिवस त्यांची माहिती शेठना कळली.साधुबाबांना मनसुखलाल शेठ भेटायला गेले.त्यांच्या गुहेत शिष्यांसमवेत साधुबाबा मस्त अवस्थेत राहत होते.मनसुखलालच्या विनंतीवरून त्यांनी येऊन एकदा उद्ध्वस्त शांतिकुंजची पाहणी केली.त्यांनी पुढील कारण सांगितले.    

जुलमी राजाकडून ज्यांचे ज्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष  प्राण हरण झाले ते सर्व मोकाट सुटले आहेत.ते मृत आत्मे ज्या राजाने त्यांना ठार मारले, किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडले,त्याचा या राजवाड्यात शोध घेत आहेत. त्यांना राजावर सूड उगवायचा आहे. राजा कां सापडत नाही याची त्यांना कल्पना नाही.मध्ये किती काळ सुप्तावस्थेत गेला तो त्यांना माहीत नाही.जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेत ते बाटल्यांमध्ये बंदिस्त होते.तो काळ त्यांच्या हिशेबी अस्तित्वातच नव्हता.राजाचा मृत्यू  झाला आहे याची त्यांना अर्थातच कल्पना नाही.तो सापडत नाही म्हणून ते क्रोधीत होऊन  राजवाड्याची मोडतोड करीत होते व आहेत. राजा सापडत नाही म्हणून ते पिसाळले आहेत. जुलमी राजाने त्या काळात अनन्वित अत्याचार केले.त्यात कित्येक गरीब बापडय़ा स्त्रियाही होत्या .त्याने कांहीना भिंतीत चिणून ठार मारले.कांहींना फाशी दिले.कांहींचा कडेलोट करण्यात आला.कांहींनी आत्महत्या केली.ते सर्व अमानवी आत्मे (अस्तित्वे)मांत्रिकाद्वारे बाटलीत बंद करण्यात आले होते. अमानवी अस्तित्व असलेल्या  बाटल्या जमिनीत खोल पुरण्यात आल्या होत्या.बाटल्यांत बंदिस्त असल्यामुळे त्यांना काहीही करता येत नव्हते.सुटकेसाठी त्यांची धडपड चालली होती.सर्व धडपड फुकट जात होती.

पुढच्या  काळात राजा मृत्यू पावला.स्वातंत्र्य मिळाले .तत्कालीन संस्थानिकाने राजवाड्याचे रुपांतर पंचतारांकित  हॉटेलमध्ये केले.त्याने हॉटेल एका शेटला विकले.

जवळच मोठे धरण बांधण्यात आले आहे.त्यातून कालवे काढण्यात आले आहेत.कालवे खणीत असताना जिथे बाटल्या पुरल्या होत्या ती जागा खणण्यात   आली.बाटल्या फुटल्या अतृप्त आत्मे मुक्त झाले.त्यांची झुंडच्या   झुंड राजाला शोधत त्यांच्या माहितीच्या राजवाड्यात आली .त्यांना राजा सापडत नव्हता.त्यामुळे ते आत्मे पिसाळले होते.त्यांनी हॉटेलच्या यंत्रणेमध्ये बिघाड निर्माण करण्यास सुरुवात केली.पुतळे उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.पुतळेच काय जे जे त्यांना अचल दिसे ते ते त्यांनी मोडून तोडून टाकले.त्यांचा राग त्यांनी अशा वस्तूंवर यंत्रणेवरच काढला.सुदैवाने त्यांनी ग्राहकाना, नोकरांना, किंवा कोणाही व्यक्तीला, कांहीही केले नाही. हा त्यांचा चांगुलपणा म्हणावा लागेल.

मनसुखलालने यावर तोडगा काय म्हणून विचारले.ते साधुबाबा म्हणाले यावर कांहीही तोडगा नाही.ते अतृप्त आत्मे एकदा बाटल्यात बंदिस्त करता आले.आता त्यांचे कांहीही करता येणार नाही.ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.सुरू झाले ते केव्हांतरी बंद होणारच.ज्याला आदि आहे त्याला अंत आहे.हे अतृप्त आत्मे काळानुसार त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार केव्हांतरी पुढच्या गतीला जातील.शेवटचा अतृप्त आत्मा पुढच्या गतीला गेल्यावर ही जागा शापमुक्त होईल. हे अतृप्त आत्मे ही जागा सोडून कुठेही जाणार नाहीत.आज ना उद्या राजा येथे येईल म्हणून ते त्याची वाट पाहात राहतील.  

दिवसा हे आत्मे निद्रिस्त अवस्थेत असतात.सूर्यास्ताबरोबर ते जागृत होतात.सूर्योदयाबरोबर ते पुन्हा   निद्रिस्त होतात.किंवा असे म्हणूया कि सूर्य आकाशात नसेल त्या काळात ते शक्तिशाली असतात.दिवसा त्यांचा शक्तिपात झालेला असतो.म्हणूनच रात्री इथे त्यांचा वावर असतो.त्यांनी अजून कुणा माणसाला इजा केलेली नाही.याचा अर्थ असा नाही की ते पुढे इजा करू शकणार नाहीत.जरी त्यांनी शारीरिक इजा केली नाही तरी ते मानसिक प्रभाव पाडू शकतात.त्यांची अक्राळविक्राळ रुपे त्यांचे अक्राळ विक्राळ आवाज एखाद्याला भयभीत करून सोडतील .एखादी कमकुवत मनाची व्यक्ती हृदय बंद पडून मरू शकेल.त्याला वेड लागेल.तो सकाळपर्यंत बेशुध्द होईल. शुद्धीवर आल्यावर त्याचे काय होईल ते सांगता येत नाही.

एवढे बोलून साधुबाबा आपल्या गुहेत निघून गेले.मनसुखलाल येथील सर्व व्यवहार बंद करून निघून गेला.त्याने गुंतवलेला पैसा दहा वर्षांत बऱ्याच प्रमाणात वसूल झाला होता.अर्थात पैसा वसूल झाला नसता तरीही तो कांहीही करू शकत नव्हता.त्याला ही अशी शापित जागा त्याच्या मालकीची नको होती.या अशुभाचा आपल्या कुटुंबावर आपल्या आर्थिक व्यवहारांवर कदाचित वाईट  परिणाम होईल म्हणून तो भयभीत झाला होता.ही जागा खरेदी करण्याला एवढेच काय फुकट घेण्यालाही कुणी तयार नव्हता. त्याने ही जागा सरकारला फुकट देऊन टाकली.सरकारने ही जागा पुराणवस्तू खात्याकडे दिली.त्याची आहे त्या अवस्थेत देखभाल पुराणवस्तू खाते करते.रात्री जे येथे राहतात त्यांना भयानक अनुभव येतात.भयानक आकृत्या दिसतात.त्यामुळे रात्री येथे राहायचे असेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे  लिहून द्यावे लागते.स्वतःच्या जबाबदारीवर येथे रहावे लागते.वास्तू संध्याकाळी सहा ते सकाळी सहा बंद असते.पुराणवस्तू खात्याने मोडके पुतळे ,उद्ध्वस्त कारंजी, बंद पडलेल्या लिफ्ट,पाणीपुरवठा, दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.रात्री पुन्हा आहे त्या अवस्थेला सर्वकांही आणून ठेवले जाते.त्यामुळे पुराणवस्तू खाते जे जसे आहे तसे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.ही सर्व कथा सांगणारी पुस्तिका खात्याने प्रसिद्ध केली आहे.तुम्हाला हवी असल्यास जाताना ती पुस्तिका खरेदी करता येईल.

सुन्न अवस्थेत आम्ही कांही न बोलता हळूहळू गच्चीवरून  एकेक जिना उतरत राजवाड्याबाहेर आलो.एकदा शांतिकुंजला चक्कर मारली.बाहेर पडताना सर्व कथा सांगणारी पुस्तिकाही खरेदी केली.

पर्यटक सहसा जिथे जात नाहीत तिथे नेल्याबद्दल आम्ही आमच्या गाइडचे आभार मानले.  

*एकदा राजवाड्याची रया गेलेली अवस्था बाहेरून पाहिली व कांहीही न बोलता आमच्या गाडीत बसून हॉटेलकडे प्रयाण केले.*

*सर्व कथा ऐकून राजवाडा पाहून आम्ही इतके सुन्न झालो होतो की कुणीही एकही शब्द हॉटेलवर येईपर्यंत उच्चारला नाही.*

*नंतरही त्याबद्दल कांही बोलावे असे आम्हाला वाटत नव्हते.*

*दुसर्‍या दिवशी सकाळी गाइड बरोबर गाडीतून आम्ही जेसलमेरकडे प्रयाण केले.*

(समाप्त)

१५/५/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel