(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

.या बंगल्यातील रहस्याचा शोध घेतलाच पाहिजे असे जगदीशने मनाशी ठरविले .शक्य झाले तर ही जागा संकटमुक्त केली पाहिजे. असा त्याने मनाशी निश्चय केला .हॉटेलातील आपले सामान त्याने त्या  किती तरी अफवा, कथा,असलेल्या जागेत हलविले .

एवढ्या मोठ्या बंगल्याची साफसफाई करण्यासाठी दोन तीन माणसांची गरज होतीच.जगदीश प्रोजेक्ट प्रमुख असल्यामुळे त्याला श्रमिकांचा तुटवडा कधीच नव्हता.बंगल्याला  सर्व्हंट्स क्वार्टर्स, आऊट हाऊस, होते.त्याला नियमाप्रमाणे 

दोन कामगार  मिळाले होते. जगदीशने त्या कामगाराना  त्यांच्या कुटुंबासकट सर्व्हंट क्वॉर्टरमध्ये जागा दिली .

त्या जागेबद्दलच्या अफवा कामगारांनी ऐकल्या होत्या .त्यामुळे कामगार तिथे  रहायला यायला घाबरत होते. जगदीशने त्यांची कशीबशी समजूत काढली .जर इथे कुणी अमानवी अस्तित्व असेल तर ते मालक म्हणून मला त्रास देईल तुम्हाला काहीही होणार नाही .इत्यादी गोष्टी सांगून जगदीशने त्यांना आश्वस्त केले .त्यातल्यात्यात धीट कामगार निवडून त्यांना त्याने बंगल्यामध्ये काम दिले होते .

बंगल्याच्या व बागेच्या  साफसफाईचा प्रश्न मिटला .एका कामगाराची पत्नी स्वयंपाक करू लागली .तोही प्रश्न सुटला .

पहिले आठ दिवस काहीही झाले नाही .बंगला बाग आसपासचा परिसर चकाचक स्वच्छ झाला .बंगल्याबद्दल उगीचच अफवा उठल्या होत्या .इथे अमानवी असे काहीही नाही .अश्या  निर्णयाला जगदीश येऊ लागला होता .आणखी आठ दिवस वाट पाहावी आणि नंतर आपल्या आई वडिलांना पत्नीला येथे  बोलवून घ्यावे असा विचार त्याने केला .प्रकल्पाचे काम व्यवस्थित सुरू होते .जगदीश सकाळी नऊला प्रकल्पावर जात असे तो संध्याकाळी घरी येई.

जगदीशची व्यवस्थित घडी बसेपर्यंत अमानवी अस्तित्व शांत राहिले होते .

नवव्या दिवशी रात्री जगदीश शयनगृहात शांत झोपला होता .एकाएकी रात्री तो जागा झाला .आपल्याला कशाने जाग आली तेच त्याला उमगत नव्हते .पाणी पिऊन झोपावे असा त्याने विचार केला .एवढ्यात त्याला दूरवरून कसला तरी आवाज ऐकू येऊ लागला .हाता पायात साखळ्या,बेड्या , अडकविलेला एखादा मनुष्य जर कष्टाने चालू लागला, तर जसा आवाज येईल तसा आवाज दूरवरून येत होता .कष्टाने पाय उचलीत कुणीतरी बागेतून बंगल्यात आले होते .बंगल्याचा दरवाजा तर त्याने स्वतः नीट बंद केला होता .इतर सर्व दरवाजेही बंद आहेत याची त्याने खात्री करून घेतली होती .

तरीही कुणीतरी  बंगल्यात आले होते .खळ् खळ् साखळ्यांचा आवाज,घस् घस् कुणीतरी पाय घाशीत चालत असल्याचा आवाज, हळू हळू जवळ येत होता .हळू हळू  तो आवाज मोठा होत होता. प्रथम दूरवर बागेत येणारा आवाज, नंतर पोर्चमध्ये आला ,नंतर हॉलमध्ये, पॅसेजमध्ये, असा तो आवाज जवळ जवळ येत शेवटी त्याच्या शयनगृहाच्या दरवाज्याजवळ येऊन थांबला .

या आवाजानेच आपल्याला जाग आली हे जगदीशच्या लक्षात आले.आता तो पूर्णपणे जागा झाला होता.श्वास रोखून हातात पिस्तुल घेऊन तो आता पुढे काय होणार त्याला तोंड देण्यास सज्ज झाला होता .

शयनगृहाचा दरवाजा बंद होता.तरीही ते अस्तित्व बंद दरवाज्यातून  सहज आत आले .हाता पायात बेड्या घातलेला, साखळदंडांनी जखडलेला, एक उंचापुरा मनुष्य दरवाज्यात उभा होता.शयनगृहातील नाइट लँपच्या प्रकाशात तो स्पष्ट दिसत होता.  जगदीशला इजा करण्याचा त्याचा कोणताही उद्देश दिसत नव्हता .जगदीशला खूण करून तो त्याला आपल्या मागे बोलावीत होता. जगदीश जागच्या जागी खिळला होता .त्या अस्तित्वाबरोबर आपण जावे असे त्याला वाटत नव्हते .ते अस्तित्व काहीही बोलत नव्हते .फक्त आपल्या मागे खूण करून ये म्हणून त्याला सांगत होते.जगदीश आपल्या बोलावण्याला प्रतिसाद देत नाही हे पाहिल्यानंतर थोड्या वेळाने निराश होऊन ते अस्तित्व आले तसेच पाय घाशीत  घाशीत बागेकडे गेले. साखळ्यांचा आवाज कमी होत होत शेवटी नाहीसा झाला.

आवाज थांबल्याबरोबर दचकून जगदीश भानावर आला .आपण जे बरेच काही ऐकत होतो ते खरे असल्याचा त्याला अनुभव आला .आपण त्या अस्तित्वाबरोबर जायला हवे होते असे त्याला उत्कटतेने वाटत होते .त्या अस्तित्वाला जगदीशला कोणतीही इजा करावयाची नव्हती .ते अस्तित्व जगदीशला काहीतरी सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करीत होते .एवढी गोष्ट जगदीशच्या लक्षात आली .उद्या जर पुन्हा हाच अनुभव आला तर त्याच्या पाठीमागे जाण्याचे जगदीशने निश्चित केले .

रात्री जगदीशला स्वस्थ झोप आली नाही.त्याची सारखी चुळबुळ चालली होती .तो वारंवार कूस पालटत होता.सकाळी नोकर येऊन त्यांनी नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात केली.कुणीही काहीही बोलले नाही .सर्वजण नॉर्मल वाटत होते .त्या अर्थी त्यांना रात्री काहीही आवाज ऐकू आला नव्हता. जगदीशही त्याबद्दल काहीही बोलला नाही. 

दुसऱ्या रात्री पुन्हा पूर्वीचा अनुभव मध्यरात्री आला .या वेळी एकाऐवजी अनेक,साखळदंड बांधलेले कैदी चारी दिशांनी बेडरूमच्या दिशेने चालत येत आहेत असा भास होत होता.काल आलेले अस्तित्व त्या सर्वांचा पुढारी असावा.आज अनेक कैदी चालत येत असल्यामुळे साखळ्यांचा मोठा आवाज होत होता.  सर्व आवाज जगदीशच्या शयनगृहाबाहेर  येऊन थांबले .जणू काही त्या सगळ्यांनी मोर्चा काढला होता .आज तो कालचाच मनुष्य बंद दरवाज्यातून आत आला .तो त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता.तो जगदीशला आपल्या मागे काही तरी दाखवण्यासाठी बोलावीत होता .त्याच्या पाठीमागे जावे असे वाटत असतानाही जगदीश खिळे मारल्यासारखा जागच्याजागी उभा होता . जगदीश येत नाही असे पाहून निराश होऊन तो जरा वेळाने परत फिरला .

उद्या पुन्हा हा मोर्चा नक्की येणारच .या वेळी त्या मानवी अस्तित्वाच्या मागे जायचेच. त्याला जे काही आपल्याला दाखवायचे आहे ते पहायचे असा जगदीशने निश्चय केला.

जगदीशने  केलेला निश्चय   अंमलात आणला जात नाही अश्या  काही रात्री गेल्या.सर्व काही ठरवून निश्चय करून जगदीश रात्री वाट पाहात असे .प्रत्यक्षात त्या अस्तित्वाबरोबर तो जाऊ शकत नसे .

त्याच्या एवढे लक्षात आले होते की एक नाही तर अनेक कैदी अमानवी स्वरूपात येथे नाईलाजाने वास करून आहेत.त्यांना येथे राहणाऱ्यांना कोणताही धोका द्यायचा नाही .कोणतीही इजा करण्याचा त्यांचा हेतू नाही .किंवा कदाचित इजा करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नाही .त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचे आहे .त्यांना आपल्याला काहीतरी दाखवायचे आहे .

अश्या  अनेक रात्री गेल्यानंतर शेवटी एका रात्री जगदीश त्याच्या बरोबर बागेत गेला .बंगल्यासमोरील विस्तीर्ण बागेमध्ये एका ठिकाणी ते अस्तित्व येऊन उभे राहिले .अंधुक चांदणे पडले होते .तिथे ते अस्तित्व अदृश्य  झाले.

आसपासचे दगड गोळा करून जगदीशने जिथे ते अस्तित्व अदृश्य झाले होते त्या ठिकाणी ते दगड खूण म्हणून ठेवले .

येथे प्राचीन काळी तुरुंग असावा .जुलुमी जमीनदाराने, सरदाराने, राजाने, जो कुणी असेल त्याने कैद्यांना तळघरात डांबले असावे .ते कैदी अन्न पाण्याविना मृत्यू पावले किंवा कदाचित भूकंप होऊन गाडले गेले किंवा अन्य कारणांनी मेले होते . तेव्हांपासून ते सर्व येथे बागेत जमिनीखाली आहेत. असा अंदाज जगदीशने केला .बागेत खणण्याची मालकाकडून परवानगी घेतली पाहिजे .उत्खनन केल्यावरच खरे काय ते कळेल.

जगदीशने मालकाकडे परवानगी मागितली.सर्व हकीगत सांगितल्यावर मालकाने परवानगी दिली .कदाचित जगदीशच्या उपायांनी ती जागा शापमुक्त झाली असती .

तिथे जो कुणी आत्तापर्यंत राहायला येत असे तो साखळ्यांचे आवाज, पाय घासल्याचे आवाज,अस्पष्ट धूसर स्वरुपात दिसणारी एक किंवा अनेक अस्तित्वें ,यामुळे गडबडून जात असे .ते अस्तित्व काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तिकडे कुणीही लक्ष देत नसे .घाईगर्दीने बंगला सोडून पळ काढण्याकडे प्रत्येकाची प्रवृत्ती असे . बंगल्यासकट ती जागा  ज्याने विकत घेतली त्यानेही तिथे राहण्याचा प्रयत्न केला होता.रात्री येणाऱ्या आवाजाना, धूसर अस्पष्ट स्वरूपात दिसणाऱ्या अनेक अस्तित्वाना,पाहून त्याने पळ काढला होता.

तिथे जे कुणी भाड्याने बंगला घेऊन राहण्यासाठी आले त्यांनीही त्याचाच कित्ता गिरविला होता .

शापित जागा म्हणून कुणीही ती विकत घ्यायला तयार नव्हता.

मालकाने परवानगी दिल्यावर जगदीशने मजूर लावून उत्खनन केले.तिथे खाली एक मोठे तळघर होते . तिथे एके काळी  कैदखाना होता.लहान मोठ्या पंधरा वीस खोल्या होत्या .साखळ्यांनी जखडबंद केलेले  कैदी तेथे ठेवले जात असत. भिंतीमध्ये कड्या होत्या. कड्याना साखळदंडाने बांधलेले बारा सांगाडे सापडले .बाकी सर्व काळाने नष्ट केले होते .

ते सर्व सांगाडे एकत्र करून जगदीश प्रयाग राज तीर्थावर गेला.तिथे विधीपूर्वक त्याने त्या सर्व अस्थी संगमावर विसर्जित केल्या .

*तेव्हांपासून तिथे होणारे सर्व भास, आवाज, थांबले .तो सर्व परिसर पूर्णपणे सामान्य झाला.*

*प्रकल्प पूर्ण होईपर्यंत (आई वडील पत्नी) कुटुंबासह जगदीश त्या बंगल्यात रहात होता.*

ती जागा निर्दोष केल्याबद्दल मालकाने जगदीशकडून एक पैसाही भाडे म्हणून घेतला नाही.उलट मालकच स्वतः जगदीश बरोबर प्रयागराज तीर्थावर गेला होता .तिथे जाण्या येण्याचा,उत्खननाचा व इतर सर्व खर्चही त्यानेच केला.

*जागा संपूर्ण शापमुक्त झाली .*

*मालकाने तळघर, त्यातील खोल्या,भिंतीतील कड्या, पॅसेजेस, जिने,सर्व जसेच्या तसे डागडुजी करून ठेविले .*

* पर्यटकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ती जागा जतन केलेली आहे .*  

(समाप्त)

११/३/२०२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel