( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

जवळच्याच एका पिंपळावर एक खवीस(एक प्रकारचे भूत) राहत होता.

त्याला ते बुजगावणे फार आवडले.

तो खवीस पिंपळ सोडून त्या बुजगावण्यामध्ये राहण्यासाठी आला.  

नंतर त्या बुजगावण्यांने जो गोंधळ घातला तो अवर्णनीय होता.

ते बुजगावणे दिसायला फारच विचित्र व भयंकर होते .हातापायाच्या काडय़ा मध्ये मोठे पोट आणि डोके एखाद्या मोठय़ा कलिंगडासारखे होते.डोळे बाहेर लोंबत असलेले बटबटीत आणि एखाद्या वाटीसारखे होते.डोक्यावर केस मुळीच नव्हते.नाक जवळजवळ फूटभर लांब होते.कान सुपासारखे होते.त्यांची जीभ लांब व लवलवती लाल भडक होती.ती तो तोंडाबाहेर काढून त्याने आपले कान सहज साफ करू शकत असे .त्याच्या डोळ्यांतून मधून मधून तीव्र प्रकाश किरणे बाहेर पडत होती . त्या प्रकाशकिरणांचे रंग क्षणोक्षणी बदलत होते .मनोहरच्या त्या अजय नावाच्या मित्राने काय युक्ती केली होती ती त्याची त्यालाच माहीत.त्या बुजगावण्याचे हात रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने अकस्मात जवळजवळ पांच फुटांपर्यंत लांब होत होते.तो एखाद्या ढेरपोटय़ा शेठ्यासारखा डुलत डुलत चालत असे.एकूणच त्याला बघितल्यावर भीती वाटत असे.त्याला पाहून पोटात ढवळल्यासारखे होऊन उलटी होईल की काय असे वाटत होते.रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने तो डागेपासून समुद्रकिनार्‍यापर्यंत सर्व अागरात आरामशीर फिरू शकत असे. ते बुजगावणे रात्री जर अकस्मात पाहिले तर दचकायला होत असे. बघणाऱ्याची पार घाबरगुंडी उडत असे.  

त्या बुजगावण्याचे  नियंत्रण कसे करायचे ते शिकवून त्यातील बॅटर्‍या कशा बदलायच्या इत्यादी तांत्रिक गोष्टी समजावून सांगून अजय परत मुंबईला निघून गेला.

पक्ष्यांना स्थिर बुजगावण्याची सवय होती .हलते चालते फिरते बुजगावणे पाहून पक्षी बिचकू लागले.वानरांची टोळी   प्रथम थोडीबहुत बिचकली.परंतु नंतर त्यांना ते बुजगावणे सवयीचे झाले.ते त्याला जुमानीत नाहीसे झाले.नशीब बुजगावण्यावर उडी मारून त्याच्याशी खेळून त्यांनी ते मोडून टाकले नाही.  ते बुजगावणे बॅटरीच्या सहाय्याने सर्वत्र हळूहळू फिरत असे  .अनोळखी कुणी दिसल्यास ते जोरात आवाज काढत असे.त्यामुळे तो माणूस दचके. चोर असला तर पळून जाई.महादबाही लगेच धावून जात असे.एकूण चोर्‍यांचे प्रमाण पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी झाले.अजयला त्याच्या निर्मीतीबद्दल जेवढा विश्वास वाटत होता तेवढय़ा प्रमाणात त्याचा उपयोग झाला नाही.

स्वतः महादबा, हंगामात ठेवलेला राखणा गडी,ते विचित्र बुजगावणे मिळून एकूण बऱ्यापैकी परिणाम चोर्‍यांवर किंवा नासधूसीवर होत होता.

असेच काही दिवस गेले.मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जवळच्या एका पिंपळावर खवीस रहात होता.तो रोज ते बुजगावणे पाहत होता.कां कोण जाणे त्या खवीसाला त्या बुजगावण्यात कांही दिवस जाऊन राहावे असे वाटले.कदाचित त्याला पिंपळावर सारखे बसून बसून कंटाळा आला असावा.एकदा खविसाने त्या बुजगावण्याचा ताबा घेतल्यावर ते बुजगावणे भलतेच कार्यप्रवण झाले.ते इतके कार्यप्रवण झाले कि त्याने हाहा:कार माजवला.

चांदणी रात्र होती.आकाश निरभ्र होते.पौर्णिमेच्या अगोदरच दोन दिवस चोरी करण्याचे चोरांनी ठरविले होते.दिवसा चोर कोणते   आंबे चोरायचे ते पाहून ठेवतात.मध्यरात्रीनंतर ते त्या ठिकाणी येतात.या वेळी साधारणपणे राखणदार गाढ झोपेमध्ये असतात.पौर्णिमेच्या आगेमागे दोन तीन दिवस चोर्‍यांचे   प्रमाण वाढते.पिठोरी स्वच्छ चांदणे पडलेले असते.आंबे व्यवस्थित दिसू शकतात.झाडावर चढून किंवा जमिनीवरूनही घळाच्या साहाय्याने आंबे पटापट काढता येतात.साधारण यामध्ये तिघेजण गुंतलेले असतात.एक घळाच्या सहाय्याने आंबे काढीत असतो.दुसरा ते घळतून पटापट काढून टोपलीमध्येच ठेवीत असतो.तर तिसरा कुणी मालक, राखणदार,येत नाहीना याकडे लक्ष ठेवून असतो.कोणत्याही स्वरूपाचा धोका दिसल्यास तो खुणेची शिट्टी वाजवितो.शिटी ऐकताच सर्व जण पूर्व नियोजनाप्रमाणे सूंबाल्या करतात.

आंबे चोरताना बुजगावणे अकस्मात येईल आणि जोराने ओरडेल अशी त्याना भीती वाटत होती.तसे झाले असते तर राखणा गढी धावून आला असता.पळून जावे लागले असते.चोरीचा प्रयत्न फुकट गेला असता. असे होऊ नये म्हणून त्या चोरांनी एक युक्ती शोधून काढली.बुजगावण्याच्या पायाना जर आपण साखळदंड बांधला आणि तो एका झाडाला बांधून ठेवला तर बुजगावणे जागेवरून हलू शकणार नाही .त्या बुजवण्याची संपूर्ण परिसरात असलेली गस्त थांबेल.अर्थातच बुजगावणे ओरडून महादबा आणि इतरांना सावध करणार नाही.परिणामी आपल्याला हवे तेवढे आंबे काढून नेता येतील.आपल्या चोरीमध्ये कोणीही अडथळा आणणार नाही.

चोर्‍या  करणार्‍या अनेक  टोळ्या होत्या परंतु त्यात सूर्याजीची टोळी अव्वल होती.  ही टोळी सूर्याजी आणि इतर चार पाच त्याचे साथीदार यांची होती.चोरलेले आंबे मुंबईला पाठवण्याचा त्यांचा व्यवसायच होता .यासाठी ते अर्थातच काही कलमे (हापूस आंब्याची झाडे)आंबे काढण्यासाठी पैसे भरून घेत असत.त्यामुळे त्यांच्यावर ते चोरलेले आंबे पाठवतात असा आरोप कोणीही करू शकत नसे.त्यांच्या वाटेला कुणी जात नसे.ते तुमचे कसे नुकसान करतील ते सांगता येत नसे.झाडाची पाच सहा इंच रुंदीची बुंध्यावरची वर्तुळाकार साल काढून टाकली कि जमिनीतून झाडाला मिळणारा जीवनरस खंडित होतो.परिणामी झाडं सुकून मरते.रात्रीची किंवा दिवसाचीही अशीच साल काढून टाकणे कुणालाही सहज शक्य आहे  .मालकाचे भयंकर नुकसान होते.दुसरा प्रकार म्हणजे विहिरीतील पाण्यात घाण टाकून पाणी वाईट करणे .पाणी पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी पहिले पाणी उपसून टाकावे लागते.अंगभूत झर्‍यानी विहीर भरायला वेळ लागतो.आग लावणे हा आणखी एक प्रकार .  टोळीला शिक्षा करण्याचा अद्दल घडवण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे त्यांचे त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे नुकसान केले हाेते.त्यामुळे या गुंडांच्या टोळीच्या वाटेला  कुणीही जात नसे.इतर चोर भुरटे होते.सूर्याजी हा जाना माना अव्वल इरसाल गुंड चोर होता. 

ही सूर्याजीची टोळी बुजगावण्याच्या बंदोबस्त करण्यासाठी आली होती.त्यांनी बरोबर साखळदंड आणला होता.बुजगावणे म्हणजे त्यांना एक कचकडय़ाचे खेळणे वाटत होते.

त्या बुजगावण्यात मनोहर त्यांच्या मित्राने कांही यंत्र बसविले आहे एवढेच त्यांना माहीत होते.त्या बुजगावण्यात ते बुजगावणे आवडल्यामुळे बदल म्हणून पिंपळावरचा खवीस त्यात येऊन बसला आहे याची त्यांना कल्पना नव्हती.मुळात पिंपळावर खवीस आहे हेही त्यांना माहीत नव्हते.

खवीसाने बुजगावण्याचे   पाय व्यवस्थित बांधू दिले.त्याने आरडाओरडा केला नाही.उरलेला साखळदंड जवळील एका झाडाला बांधू दिला.त्याला त्यांनी कुलूपही लावले.हे सर्व खवीस बघत होता.मनातल्या मनात तो खदखदा हसत होता.या गुंडांना कोणती शिक्षा करावी याचा तो विचार करीत होता.अनेक प्रकारच्या शिक्षा त्याच्या मनात आल्या होत्या.शेवटी त्याने जास्त विचार न करता साखळदंड बांधून झाल्यावर ते गुंड निघालेले पाहून त्यातील एकाला हात लांब करून पकडले.त्याला तसेच उचलून झाडावर उंचावर नेऊन ठेवले.बुजगावण्याचे हात लांब झाले. त्याने आपली गर्दन पकडली आणि तोच हात केवढा तरी लांब होऊन त्याने आपल्याला झाडाच्या शेंड्यावर ठेवले हे पाहून तो चोर गर्भगळित झाला होता.त्याची शुद्धच हरपली झाडाला घट्ट पकडण्याचे तो विसरला.आणि उंचावरून टपदिशी   खाली पडला.त्याच्या शरीरातले हाडन् हाड मोडले.तो मेला नाही.शहरातील इस्पितळात जवळजवळ वर्षभर तो आपल्या हाडांची गणती करीत होता.

उरलेले  दोघेजण स्तिमित होऊन पळायचे विसरले. खवीसाने हां हां म्हणता साखळदंड तोडून टाकला.त्या दोघांतील एकाला पायाने फुटबॉल सारखे उडविले.तो कम्पाऊंडच्या बाहेर जाऊन पडला.त्याच्या कंबरेचे हाड मोडले.आता तो बहुधा जन्मभर चालू शकणार नव्हता.उरलेल्या तिसर्‍याला पकडून त्याने जागच्या जागी खुळखुळय़ासारखे हलविले.तो घाबरून तिथेच बेशुद्ध झाला.त्यावर्षी सूर्याजी चोरलेले आंबे तर सोडाच  त्याचे स्वतःचेही आंबे काढू व मुंबईला पाठवू शकला नाही . मनोहरपंतांच्या बुजगाववण्याची कीर्ती पंचक्रोशीत पसरली.लांबून लांबून लोक ते बुजगावणे पाहण्यासाठी येऊ लागले  .आम्हाला आणखी एक असे बुजगावणे बनवून द्याल का अशा विचारणा अजयला फोन वर किंवा  पत्राने होऊ लागल्या .किमया बुजगावण्याची नसून त्यातील खविसाची आहे याची कुणालाच कल्पना नव्हती!

तेव्हापासून मनोहरपंतांच्या कम्पाऊंडमध्ये येण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती.चोरांचा उपद्रव बंद झाला.

एकदा वांदरांची टोळी आली.खवीसाने त्या टोळीतील हुप्प्याला असा काही बुकलला कि ती वानरांची टोळी पळून गेली.पुन्हा मनोहरपंतांच्या आगरात फिरकण्याची त्यांची हिंमत नव्हती.वेताळाने वांदरांना कसे घाबरवले ते त्या वेताळाला व त्या वांदरानाच माहीत.

पक्षी उनाड गुरे चोर वांदर कुणीही मनोहरपंतांच्या आगराकडे ढुंकूनही पहात नाहीसा झाला.  

मनोहरपंतांच्या आगाराला लागून विसूभाऊंचे आगर व घरदार होते.पूर्वी पक्षी चोर गुरे वांदर इत्यादी दोघामध्ये विभागली जात असत.आता हा सर्व भार विसूभाऊंवर पडू लागला.त्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले.नुकसान टाळण्यासाठी त्यानेही उंच कंपाउंड वॉल राखणा बुजगावणे  इत्यादी गोष्टी अवलंबल्या होत्या.परंतु मनोहर पंतांच्या बुजगावण्याची जी दहशत होती तशी दहशत विसूभाऊंच्या बुजगावण्याची निर्माण होऊ शकली नाही.

*मनोहरपंतांचे बुजगावणे सर्व अनर्थाचे कारण आहे.*

*ते बुजगावणे आपण नष्ट करू शकलो तर पूर्वीसारखा त्रास विभागला जाईल.*

*त्या बुजगावण्याची उगाचच भीती निर्माण केली गेली आहे असा त्यांचा समज होता*

*येनकेनप्रकारेण ते बुजगावणे नष्ट करण्याचा मनसुबा विसूभाऊनी आखला.*

* प्रताप बुजगावण्याच्या नसून त्यात वस्तीला आलेल्या खवीसाचा आहे याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती *  

*त्याची त्याना कल्पना  असती तर ते त्या बुजगावण्याच्या वाटेला गेले नसते*

* परंतु जे व्हायचे असते ते अटळ असते.*

*विनाशकाले विपरीत बुद्धी हेच खरे.*

(क्रमशः)

२२/४/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel