( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

मनोहरपंत शिकले. सीए झाले .मुंबईला आले.त्यांनी मुंबईच्या एका फर्ममध्ये नोकरी धरली .नंतर स्वतःची  फर्म स्थापन केली.ती नावारूपालाही आली.ते आता साठीच्या घरात होते.त्यांचा मुलगा वडिलांचा इच्छेप्रमाणे सीए झाला. तो आता समर्थपणे फर्म सांभाळीत होता. मुलाकडे सर्व सोपवून आपण निवृत्त व्हावे आणि निवृत्तीनंतरचा आपण सक्षम असू तो काळ आपल्या आवडीच्या गोष्टीत व्यतीत करावा असे त्यांना वाटत होते.

लहानपणापासूनचे त्यांचे आवडते स्वप्न पूर्ण करण्याला ते आता मोकळे होते.त्यांची दोन आवडती स्वप्ने होती.पहिले स्वप्न  प्रवास करावा देशाटन करावे त्याबरोबर तीर्थाटनही होईल.तसा त्यांनी अधून मधून प्रवास केला होता.परंतु मुलगा  व मुलगी यांचे शिक्षण, विवाह, फर्मचा कारभार,वृद्ध आईवडिलांची जबाबदारी, इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना विशेष प्रवास करता येणे शक्य झाले नव्हते.दुसरे त्यांचे स्वप्न आपल्या कोकणातील बंगलीवजा घरात जाऊन राहावे व विकसित केलेल्या बागेचा पूर्णार्थाने उपभोग घ्यावा.  त्यांच्या पत्नीची त्यांना पूर्ण साथ होती.मनोहर मूळचा कोकणातील एका समुद्रकाठच्या खेडेगावातील मुलगा.कौलारू घर घराभोवती छोटीशी कलमांची बाग.एवढय़ा उत्पन्नात कुटूंब चालवणे शक्य नव्हते.वडील शहरात नोकरी करीत होते .त्यांचे उत्पन्न त्यांच्या कुटूंबाला पुरेसे होते.निवृत्त झाल्यावर ते त्यांच्या घरी जाऊन राहिले.त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे ,त्याना असलेल्या प्रॉपर्टीमध्ये भर घालता आली नाही . आईवडील दोघेही वृद्ध झाल्यावर मनोहर जवळ येऊन मुंबईला राहिली.मनोहरचा मुंबईचा ब्लॉक मोठा होता.आईवडील मुले ते स्वतः पाहुणे या सर्वांना स्वतंत्र शयनगृहे उपलब्ध होती. 

मनोहरने त्याचे कोकणातील गावाकडील घर व परिसर यामध्ये वाढ व सुधारणा करण्याचे ठरविले.त्याने तिथे एक   कायम स्वरुपी नोकर ठेवला.तो नोकर व त्यांचे कुटुंबीय सर्वजण तिथेच काम करीत असत.त्याचे घर व घरासभोवतील आगराला लागून त्याने काही जमिनी खरेदी केल्या.अशाप्रकारे डोंगर उतारावरील जमिनीपासून समुद्रकिनार्‍यापर्यंत सर्व जमीन त्याची झाली.डोंगर उतारावरील जमिनीला डाग म्हणत.घर व सभोवतील परसू परडे (आगर)याला घरठाण म्हणत.समुद्र किनार्‍यापर्यंतच्या जमिनीला कुर्याठ म्हणता येईल.    

मनोहर मधून मधून कोकणात जात असे  . मनोहरला त्याच्या फर्ममधून भरपूर उत्पन्न मिळत होते.त्यामुळे तो कोकणातील जमीन खरेदीबरोबरच जमिनीच्या मशागतीवर भरपूर पैसे खर्च करू शकत होता.हापूस कलमे,चिकू, पेरू, विलायती जांब,सीताफळ,काजू,जांभूळ, अशा विविध फळझाडांची लागवड त्याने योजनाबद्ध पद्धतीने केली.या सर्वातून उत्पन्न मिळावे अशी त्याची मोठी अपेक्षा नव्हती.अर्थात फळविक्रीतून काही ना काही उत्पन्न मिळत होते.शिवाय कुर्याठाचा काही भाग भातशेतीसाठी व भाजीपाला उगवण्यासाठी ठेवला होता.म्हशीचे दूध म्हशीच्या आचळाला पुरावे एवढीच त्याची माफक अपेक्षा होती.(कांही वाचकाना ही म्हण माहीत असण्याचा संभव नाही.म्हशीचे दूध काढण्यापूर्वी तिची कास जशी पाण्याने धुऊन घेतली जाते त्याचप्रमाणे नंतर ती पान्हवावी, तिची कास दुधाने भरून जावी, म्हणून आचळातून काढलेले काही दूध तिच्या आचळाना लावले जाते.जर म्हशीने तेवढेच दूध दिले तर ?)म्हणजेच देखभालीसाठी ठेवलेल्या कुटुंबाचा खर्च मिळणार्‍या  उत्पन्नातून किमान भागावा एवढीच त्याची अपेक्षा होती .तेवढा तो निश्चित भागत होता.शिवाय त्याला वरती काही उत्पन्न मिळत होते.घरचे हपुस आंबे, काजू गर, इत्यादी फळफळावळ मुलांना व सर्वांना खायला मिळत असे ते वेगळेच.शिवाय सुट्टीमध्ये मोकळ्या स्वच्छ हवेत जाऊन राहता येत असे.एकप्रकारे ते फार्महाऊसच होते .मुलांना चोवीस तासांत केव्हाही समुद्रावर जावून हुंदडायला खेळायला पाण्यात डुंबायला मिळत असे ते वेगळेच.मनोहर व त्याच्या पत्नीला सुधालाही समुद्रकाठी फिरायला पाण्यात स्नान करायला आवडत असे. गुंतवणूक केली किती आणि परतावा मिळतो किती याचा हिशोब सीए असूनही तो ठेवीत नव्हता.टुमदार घर असावे बाग असावी सर्वत्र हिरवेगार असावे हे त्यांचे स्वप्न होते.ते स्वप्न त्याने वास्तवात आणले होते.ती स्वप्नपूर्ती हाच त्याचा परतावा होता.

प्रत्यक्षात त्याच्या फळझाडांची नासधूस खूप होत असे .आंबा काजू जांभळे याचा मोसम सुरू झाला की वानर येत.खाण्यापेक्षा त्यांच्या इतस्ततः उडय़ा मारल्यामुळे कच्ची व पक्की  फळे खाली पडून नुकसान खूप होई.त्याशिवाय रात्री आणि कित्येकवेळा दिवसाही चोर येऊन फळांची मोठ्या प्रमाणात चोरी करीत असत.कीर (पोपट) चिमण्या कावळे आणि इतर पक्षी पिक्या फळांना मोठ्या प्रमाणात चोची मारून नुकसान करीत असत.कांडेचोर नावाचा एक प्राणी असतो तोही फळांचे खूप नुकसान करीत असे.

महादेव नावाचा गडी व त्याचे कुटूंब त्याने देखभालीसाठी ठेवले होते.कमी जास्त गडी,मजूर, लावून काम करून घेण्याची त्याला परवानगी होती.आपला डोंगर उतार  ते समुद्रा पर्यंतचा पट्टा आकर्षक हिरवागार प्रेक्षणीय असावा एवढीच त्याची माफक अपेक्षा होती.अधूनमधून तो व त्याची पत्नी  मुलाबाळांसकट कित्येकदा मित्रमंडळी व पाहुणे घेवूनही गावी येत असत.त्याच्या या  मालकीच्या लांबलचक पट्ट्यात फिरताना व इतराना फिरवताना त्याला अत्यानंद होत असे.समुद्र तर सगळ्यांनाच आवडत असे.सकाळी संध्याकाळी रात्री समुद्रावर फिरणे व समुद्रात डुंबणे हा तर बोनस होता.कांही दिवस राहून तो परत मुंबईला येत असे.

म्हादबाने निरनिराळ्या कारणांनी  वेळोवेळी होणारे नुकसान आणि त्यासाठी काय करता येईल असा प्रश्न त्याच्यासमोर अनेकदा ठेवला होता.म्हादबा आपल्या परीने प्रयत्न करीतच होता.भक्कम कुंपण,  गडी ठेवून  राखण, कुत्रे पाळणे, इत्यादी उपाय त्याने केले होते.परंतु नुकसान होतच होते.

मनोहरपंतानी साठाव्या वर्षी निवृत्त व्हायचे ठरविले.मुलगा समर्थपणे फर्म सांभाळत होता.त्याचे  लग्न झाले होते.सूनही फर्ममध्येच नोकरी करून घर व्यवस्थित सांभाळत होती. मुलीचे लग्न होऊन ती सुखाने नांदत होती.मनोहरपंतांचे  आईवडील केव्हाच निवर्तले होते.कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडल्या होत्या.प्रकृती धडधाकट आहे,साथ देत आहे तोपर्यंत त्यांनी आपल्या घरी जाऊन राहायचे ठरवले.जेव्हा त्यांना हवे असेल तेव्हा ते त्यांच्या मर्जीनुसार मुंबईला येऊन राहू शकत होते.प्रवासाला स्वतंत्र किंवा पर्यटन कंपन्यांबरोबर जाऊ शकत होते.   

आपल्या कारने मनोहर व सुधा आपल्या गांवी आले.म्हादबाला अगोदरच कळविलेले असल्यामुळे त्याने छोटेसे बंगलीवजा घर साफसूफ करून ठेवले होते .मालक इथे कायमचे राहणार हे ऐकून म्हादबाला खूप आनंद झाला होता .पहिले काही दिवस बागेत फिरण्यात समुद्रावर जाण्यात गेले.मनोहरपंत आले ते दिवस उन्हाळयाच्या सुरुवातीचे होते.आंबे काजू जांभूळ आंबा फणस तयार होत होते .एप्रिल महिना आला.आंबे तयार होऊ लागले.एक दिवस वानरांची एक टोळी आली .म्हादबा रिकामे  डबे वाजवीत होता.वांदरांना पळवून लावण्याचा प्रयत्न करीत होता .वांदर या झाडावरून त्या झाडावर उडय़ा मारीत होते.झाडाला लटकलेले आंबे धपाधप खाली पडत होते.वांदरांच्या या झाडावरून त्या झाडावर मारलेल्या उडय़ांनी काही खांद्या मोडत होत्या.म्हादबाने कांही भाजीपाला लावला होता .काकडी, टोमॅटो,इतर भाजी खाऊन वांदरानी  उद्ध्वस्त केली.चोरांचेही प्रमाण वाढले होते.काल ज्या झाडावर आंबे दिसत असत त्यावर  दुसर्‍या  दिवशी सकाळी पाहावे तो खांदी रिकामी झालेली दिसे.कोकणात चोरांचा हा एक सर्वसाधारण नेहमींचाच उन्हाळ्यातील उद्योग होता. दाखविण्यासाठी दोन चार आंब्याची झाडे आंबे काढण्यासाठी करायची.रात्री किंवा दिवसा जमेल तसे इतर बागांतून आंबे चोरायचे आणि सर्रास विक्रीसाठी पाठवायचे.कुणी विचारलेच तर त्यांची स्वतःची दोन चार झाडे होतीच.

आतापर्यंत मनोहरपंत केवळ नुकसान होते नुकसान होते अशी म्हादबाची ओरड ऐकत होते.डोळ्यांदेखत होणारे नुकसान त्यांना पाहवेना.दिवसाचा व रात्रीचा राखणदार ठेवून पाहिला.चोरांपासून संरक्षणासाठी मजबूत उंच कुंपण केले.तरी चोर्‍या  होतच होत्या. वांदर नुकसान करीतच होते पक्षी फळांना चोची मारून फळे निरुपयोगी करीतच होते.काय करावे ते मनोहरपंताना सुचत नव्हते.

याच काळात त्यांचा लहानपणापासूनचा मित्र त्यांच्याकडे फार्महाऊसवर आला होता.त्याने ते सर्व नुकसान पाहिले.तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर होता.त्याला निरनिराळे प्रयोग करण्याची हौस होती.त्याने मनोहरला एक उपाय सुचविला.मी एक बुजगावणे(scare crow)तयार करतो.ते पाहिल्याबरोबरच कुणाच्याही छातीत धडकी भरेल.शिवाय त्यांत मी एक अशी इलेक्ट्रॉनिक रचना बसवितो कि त्या बुजगावण्याचे हात पाय तोंड हालू शकेल .ते बुजगावणे चालू शकेल.उडय़ा मारील.त्यातून भयानक आवाज निघतील.ते बुजगावणे निरनिराळ्या रंगांचा प्रकाशही सोडील.तुला दूरस्थ नियंत्रण यंत्रणेमार्फत (रिमोट कंट्रोलने) त्याचे नियंत्रण करता येईल.ते बुजगावणे ,त्यातील निरनिराळ्या रंगाचे कमी जास्त तीव्रतेचे प्रकाश, त्यातून येणारे भयानक आवाज, त्याचे विचित्र पध्दतीने उडय़ा मारणे ,या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून चोर्‍या कमी होतील वांदर पळून जातील असा मला विश्वास आहे.पक्षी तुझ्या बागेकडे ढुंकूनही पाहणार नाहीत.तुझी बाग एकदम संरक्षित होईल.

त्याचा मित्र मुंबईला  परत गेला.त्याने त्याच्या कल्पनेप्रमाणे एक खास बुजगावणे तयार केले.त्याचे सुटे भाग घेऊन तो मनोहरच्या गावी आला.त्याने तिथे त्याचे सर्व भाग जोडले.त्यात इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बॅटर्‍या बसविल्या .त्याचे प्रात्यक्षिक त्याने करून दाखविले.दूरस्थ नियंत्रण यंत्रणेचा वापर कसा करावा तेही मनोहरला शिकविले.महादबाही नियंत्रण करण्यात तरबेज झाला.

*जवळच्याच एका पिंपळावर एक खवीस(एक प्रकारचे भूत) राहत होता.*

*त्याला ते बुजगावणे फार आवडले.*

*तो खवीस पिंपळ सोडून त्या बुजगावण्यामध्ये राहण्यासाठी आला.*  

*नंतर त्या बुजगावण्यांने जो गोंधळ घातला तो अवर्णनीय होता.*

(क्रमशः)

२१/४/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel