१९ एप्रिल १९९८ ची टळटळीत दुपार.. मी "सई"ला जन्म दिला.माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण.
मला हवं तसंच माझं बाळ होतं...हसरं,गुबगुबीत.. आणि अजिबात न रडणारं....

नामकरण सोहळ्यादिवशी तिचे आजोबा म्हणाले,हिच्याकडे पाहिलं की माझ्या वडिलांची आठवण होते.त्यांचं नाव विष्णू होत़.विष्णूची आठवण करुन देणारी "वैष्णवी".....
माझ्या सासरी माझ्या धाकट्या दिरांनंतर जवळजवळ २८ वर्षांनी  आलेली ही सोनपावल़ं...
आणि माझ्या माहेरी माझ्या भावंडांमधे माझी ही एकटीच मुलगी..बाकी सर्वांना मुलंच...
दोन्हीकडचे हे लाडोबा प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचा सोहळा करुन घेत मोठे होत होते.
हुंकार देणं,हसणं,अंघोळ,काजळपावडर,शी-शू,हे दैनंदिन सोहळे...
घन आहार सुरु करायला सांगितलं डॉ नी की लगेच उष्टावणाचा सोहळा पुरणपोळीचा बेत करून साजरा....पहिलं पाऊल टाकलं की पाऊल उंडे...पहिला आलेला दातही गाजला...तसाच पहिल्यांदा आलेलं सर्दी तापाचं आजारपणही गाजलं..आमचं अख्खं घर आजारी पडलेलं..
लसीकरण ही झोकातच पार पडलं म्हणायचं...
मग आली संक्रांत... हलव्याचे दागिने घालून हा कान्हा जवळजवळ तासभर चौरंगावर न कुरकुरता बसला आणि बोरन्हाणाचा उत्सव दणक्यात साजरा झाला.
एखादं छोटेखानी लग्न वाटावं इतक्या झोकात पहिला वाढदिवस..
एक वर्षाची ही गोड परी किमान दहा अंगाईगीतं आणि पाचसहा गोष्टी ऐकल्या शिवाय कधी झोपलीच नाही.
अगदी पहिल्या वाढदिवसालाच तिला रंगीबेरंगी चित्रं असलेली पुस्तकं मी तिला आणली..मग जे कोणी आमच्या घरी येईल ते सगळेच चित्रकथांची,बडबडगीतांची पुस्तकं घेऊन यायचे..
करता करता पाचवा वाढदिवस आला..वयाबरोबरच ह्या पोरीला पाठ असलेल्या बडबडगीतांची, गोष्टींची संख्या वाढलेली..
पाचव्या वाढदिवसाला मी तिला "शामची आई" पुस्तक भेट दिलं.
मग रोज वाचन सुरू.
आधीच मोठे असलेले तिचे डोळे शामचं आणि त्याच्या आईचं कौतुक ऐकताना आणखी मोठ्ठाले व्हायचे.
शाम लहान असताना त्याची आई श्रीखंडाच्या वड्या करायची आणि वड्यांचं ताट खरवडून खायचं,हे शामच्या वाट्याला आलेलं काम.तो श्रीखंडाच्या वड्यांचं ताट खरवडून खाऊ लागला की आमच्या लालोत्पादक ग्रंथी उत्तेजित होऊन कानाच्या मागे कळा येऊ लागायच्या.(अजूनही ती बाहेरून घरात आली की काय मेनू आहे जेवायला, हे जाणून घेण्याआधी च हिच्या कानामागे दुखू लागतं नुसत्या वासानेच..)
तर श्रीखंडाच्या वड्या हे प्रकरण तिला खूप आवडायचं.शामची जशी वेणूताई होती तशीच हिलाही एक ताई होती...ती ताई म्हणजेच वेणूताई असंही वैष्णवीला वाटायचं.
वड्यांची गोष्ट तिला पुन्हा पुन्हा सांगावी लागायची.
अखंड पुस्तक तोंडपाठ झालं...कोणत्या रात्री शामने कोणती गोष्ट सांगितली हे क्रमवार पाठ झालं..
मग सुरु झाला हट्ट... "आई,तूही कर ना श्रीखंडाच्या वड्या..मलाही ताट खरवडून खायचंय.."
आता मात्र माझी पंचाईत झाली. मला काही ती रेसिपी माहिती नव्हती. मग नारळाच्या वड्या करायच्या आणि तेच ताट तिला खरवडायला द्यायचं,हे सुरु झालं....
लहान होती..खपून गेलं..
पुढं पुढं मीही श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी शोधणं बंद केलं.पण हिचं शामवरचं आणि शामच्या आईवरचं प्रेम मात्र दिसागणिक वाढतच होतं.शेजारची मुलं दिवेलागणीच्यावेळी जमवायची आणि रोज एकदोन गोष्टी सांगायची...बरं..हिचं गोष्ट सांगणं जितकं गोड तितकंच कदाचित त्याहून तिला गोष्ट सांगताना पाहणं गोड..)
(आजही तिचं गाणं जितकं श्रवणीय तितकंच प्रेक्षणीय ही)




आता ती नववीला गेली..तरीही शामची आई तिच्या मनात तेवढीच रुतलेली..

काही खरेदीसाठी मी रिदम हाऊसमधे गेलेले....तिथे मला शामची आई चित्रपटाची सीडी दिसली..तात्काळ मी ती खरेदी केली.मस्तपैकी गिफ्टपैकिंग केलं आणि तिच्या हातात ठेवली..
ती सीडी पाहिल्यावर चे तिच्या चेह-यावरचे झरझर बदलत गेलेले भाव मी आजही विसरलेले नाहीए आणि कधी विसरणारही नाही.
खूप खूश होतो आम्ही दोघीही..अलिबाबाची गुहा घावल्यागत..
साधारण पाचसहा दिवसांनी ती मला म्हणाली,आई,आज मी तुला सरप्राईज देणारै...
असं म्हणून तिने मला हाताला धरून खुर्चीत बसवलं..आज्ञाधारक मुलीसारखी समोर बसली आणि मला शामची आई चित्रपटातल़ं..भरजरी गं पीतांबर दिला फाडून..हे गाणं जसंच्या तसं म्हणून दाखवलः..तोंडपाठ..
माझ्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा पाऊस बरसत होता...
काय करू, काय बोलू,कसं रीएक्ट होऊ तेच समजत नव्हतं...
दोघी बराचवेळ बसून होतो..तो दिवस माझ्यासाठी "सोनियाचा दिनु"ठरला.
आजही आमच्या घरात भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्या तोंडून हे गाणं ऐकून पोटभर रडल्याशिवाय कुणी जेवत नाही...


आज ती मोठमोठी पुस्तकं वाचते..जडजड विषयांवर स्वतःची मतं मांडते..तरीही अजूनही त्या पुस्तकाचं वाचन काही थांबवलं नाहीच तिनं...

तर परवा तिने एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता ..विषय होता "प्रसारमाध्यमांचा अतिरिक्त वापर"..
प्रसार माध्यमाच्या अतिरिक्त वापराचे दुष्परिणाम सांगत होती मलाच...
माझ्याच स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरावर मला बडबडत होती...

आणि..मला ती दिसली...

मी चक्क ओरडलेच...

मिळाली..मिळाली...

तुमच्याप्रमाणेच तीही विचारू लागली,काय मिळाली?

मी चक्क गळामीठी मारली तिला...
"अगं,मला फेसबुकवर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी मिळालीय"..
त्याही वेळी झरझर बदलत गेलेले तिच्या चेहऱ्यावर चे भाव मी टिपले..
आता लवकरच मी तिला श्रीखंडाच्या वड्या करुन तिला ते ताट खरवडायला देणारच होते..

पण यावेळीही तिनेच मला सरप्राईज दिले..
मी बाहेरून आले..तिनं मला हाताला धरून खुर्चीत बसवलं..म्हणाली,सरप्राईज आहे तुझ्यासाठी...

मग मी माझै डोळे मोठ्ठे केले....
कारण आज तिने मला श्रीखंडाच्या वड्यांच़ ताट खरवडून खायला दिलं.....

माझी गुणी लेक मोठी तर झालीच...पण आज माझी आईही झाली....



सविता कारंजकर
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel