तसा तो आता हायर मिडल क्लास कॅटॅगरीत पोचला होता..
म्हणजे स्वतःचा फ्लॅट , फोरव्हीलर, वर्षातून एक लाँग ट्रीप..
चार वर्षातून एकदा छोटीशी फाॅरेन ट्रीप ..
हे सगळं सहज जमून यायचं.
त्याची श्रीमंती दिसायची ती, त्याच्या भन्नाट आयडियांमधून.
अफलातून ईव्हेंट मॅनेज करायचा तो.
अर्थात घरच्या घरी.
यावेळीही..
काल सकाळी अचानक म्हणाला.
'बॅगा भरून ठेव.
दापोलीला जायचंय...'
दोघांची मिळून एक बॅग.
पोरांची एक.
आज सकाळी पुण्याहून निघालोही.
बारा वाजेपर्यंत दापोलीत पोचलो सुद्धा.
दापोली म्हणजे त्याचं होमपिच.
आईबाबा जालगावात रहायचे.
त्यांना कळवलं होतंच.
गेल्या गेल्या आजी आजोबा आणि त्यांची नातवंडं..
प्रचंड धुडगूस..
जेवणं झाली.
त्यानं अनाऊन्समेंट केली.
आज रात्री आम्ही दोघंच भूऽऽर जाणार आहोत..
जावो..
ऊरलेल्या चौघांना यांच्या अनाऊन्समेंटकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती..
पोरांच्या 'फूलमूननाईट'चा प्रोग्रॅम ठरला होता.
गच्चीत चंद्राबरोबर आजोबा, भूतांच्या गोष्टी सांगणार होते.
आजी मसाले दूध तयार ठेवणार होती.
नऊ वाजले.
जेवणं झाली.
दोघं निघाली.
त्यानं गाडी हर्णेच्या दिशेनं वळवली.
बंदरापाशी गाडी लावून दोघं ओल्या वाळूत चालायला लागले..
एक बोट लाईटिंगनं सजवलेली..
लाटांबरोबर मंद मंद झोका खेळणारी.
तिला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही.
त्याचा हात धरून ती बोटीत.
यांचीच वाट पहात बसलेली ती बोट..
लगेच पाण्यावर रेघोट्या ओढत पुढे निघाली.
पलीकडच्या टोकाहून अचानक शब्द ऐकू आले..
" हे सूरांनो चंद्र व्हा....."
बढिया..
मकरंदचा सूर काय लागलेला..
आकाशातला चंद्र खाली डोकावून बघू लागला.
मनाच्या तारा छेडत...
लाटांच्या लयीला साथ करत..
ते चंद्रबहार गाणं संपलं..
पलीकडचा अंधारा कोपरा प्रकाशमान झाला.
मकरंद , त्याचा तबलजी हर्षद , तानपुरा , पेटी,व्हायोलिन सगळा जामनिमा...
स्पष्ट आणि मनातल्या कानगोष्टी सांगणारी साऊंड सिस्टीम.
त्याच्या भन्नाट आयडियेवर ती भलतीच खूष.
अभयचं निवेदन सुरू झालं..
अभयला सगळा मालमसाला त्यानंच पुरवलेला.
नव्या नवरीसारखी सजलेली सुंदर मैफल.
सुरांच्या धुंदीनं चढत जाणारी नशीली रात्र..
ती दोघं...
अभयचा आवाज..
त्याच्या मनाचं हितगुज सांगणारा...
त्या दोघांची पहिली भेट...
लगेच मकरंदचं...
चंद्र आहे साक्षीला..
त्यांच्या लग्नाची आठवण.
गोव्याच्या रिसाॅर्टमध्ये नारळाच्या झाडात लपाछपी खेळणारा चंद्र..
वो चांद खिला..वो तारे हसीं.
मकरंदचं गाणं चारचाँद लावणारं..
त्यांच्या बाळाचा जन्म..
लिंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला गं बाई..
या बारा वर्षातल्या बारा आठवणी.
अभयनं त्यानुसार लिहलेलं सुंदर स्क्रीप्ट..
अन् त्यावर कळस..
मकरंदचं गाणं..
प्रत्येक गाणं चांदोबावालं.
जुनी, नवी, हिंदी , मराठी, नाट्यगीतं.....
पण तिच्या आवडीची..
प्रत्येक गाण्याच्या वेळी, ती त्याच्या डोळ्यातल्या आठवणीच्या डोहात बुडलेली..
सगळं अॅटमाॅस्फीयर 'ईस रात की सुबह नही' सारखं..
खरंच संपू नये अशी सुरीली रात्र..
गाणी संपली..
मसाले दूध आलं...
अभयनं मकरंद आणि टीमचा परिचय करून दिला..
खरंतर या टीमचे भारतभर प्रोग्रॅम व्हायचे.
हजारो टाळ्यांच्या सवयीचे त्यांचे सूर.
केवळ त्याच्या भन्नाट कल्पनेवर खूष होवून,
या दोघांसाठीच..
आज ते सूर गायले.
मग त्यानं मनापासून सगळ्यांचे आभार मानले.
अगदी रघू तांडेलचेही.
त्याच्या बोटीचेही.
वाट दाखवणारा चंद्र.
त्याच्या प्रकाशाचं बोट धरून चालणारी ती बोट.
चांगली चार तासाची रपेट करून किनार्यावर लागली...
तिची अवस्था..
आजकल पाँव जमीं पर रहते नही मेरे.... सारखी.
त्यानं फुलासारखी ऊचलून तिला, बोटीतून खाली उतरवली.
तिच्या जिंदगीतली मोस्ट मेमबरेबल कोजागिरी.
कललेल्या चंद्राला खिशात घालून तो वाळूतून गाडीकडे..
वाळूत ऊमटलेली ती चार पावले..
कितीही मोठी लाट येवू दे..
न पुसली जाणारी..
चांद तारे तोड लावू....
.......कौस्तुभ
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.