नवेलपासून ३० ते ३५ किमी अंतरावर सुमारे दीडशे एकर जागेवर एका मोठ्या बंगल्याच्या प्रोजेक्टवर मार्केटिंग सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली. बिल्डरने मला साइटवर भेटायला बोलावले. कोणत्याही प्रोजेक्टचा मार्केटिंग सल्ला देण्याच्या अगोदर मी खूप सखोल अभ्यास करतो. प्रोजेक्टचे लोकेशन, आजूबाजूचे लोक, त्यांचे व्यवसाय, सामाजिक वातावरण, निसर्ग इत्यादी. हे सर्व माहीत होण्यासाठी मी स्थानिक लोकांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. बिल्डरच्या सहकार्याने गावातील व परिसरातील किमान पन्नास लोकांशी भेट घालून देण्याचे वचन दिले आणि माझे काम सुरू झाले. माझी भेट कट्ट्यावर बसलेल्या ६० ते ६५ वय असलेल्या राजाराम पाटील या व्यक्तीशी घालून देण्यात आली. तो प्रोजेक्टच्या जमिनीचा मूळ मालक असल्याचे कळताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.
२० ते २५ वर्षांपूर्वी : चंपकलाल. एक राजस्थानातून अंदाजे २० ते २२ वयाचा मुलगा राजाराम पाटील यांच्या गावात येतो व एक छोटे किराणा मालाचे दुकान सुरू करतो. राजारामही त्या वेळी तरुण, गावचे सरपंच होते. हळूहळू चंपकलालचा व्यवसाय वाढत गेला. एक-दोन वर्षांत त्याने स्वत:चे दुकान विकत घेतले. पनवेलच्या आसपास अजून चार दुकाने सुरू केली. त्याचे भाऊ व चुलत भाऊ इत्यादींना ती दुकाने चालवण्यास आणले. चंपकलाल अहोरात्र काम करत होता. राजारामची जमीन होती, उत्पन्न येत होते. राजाराम काही काम न करता ऐशआरामात जीवन जगत होता.
काळ बदलू लागला : दहा-पंधरा वर्षे निघून गेली. पनवेलच्या आजूबाजूच्या गावांत जमिनीचे दर भलतेच भडकले होते. तोपर्यंत चंपकलालची आजूबाजूच्या गावांत नऊ दुकाने होती. एक-दोन एकर जमीनही त्याने घेतली होती. एक दिवस प्रवास करण्यासाठी व मालाची ने-आण करण्यासाठी चंपकलालने स्कॉर्पिओ गाडी घेतली. तशी राजारामच्या मनात असूया निर्माण होऊ लागली, पण चंपकलालशी मैत्री होती. निवडणूक व छमछम चैनीसाठी राजारामला चंपकलाल पैशाची मदत करायचा. राजारामने काही एकर शेती विकून स्कॉर्पिओ घेण्याचे मत चंपकलालकडे व्यक्त केले.
चंपकलालने सांगितले की, तुम्ही पाटील आहात. तुम्ही माझ्यापेक्षा चांगली गाडी घ्या. २५ लाखांची फॉर्च्युनर घेण्याचे ठरले. दीडशे एकरांपैकी ५० हजार रुपये प्रति एकरप्रमाणे राजारामने जमीन चंपकला विकली व फॉर्च्युनर गाडी घेतली. चंपकलाल आपले काम, आपली दुकाने चालवत होता. राजारामचा आपल्या फॉर्च्युनर गाडीतून राजकारण, निवडणुका व छमछमचा नाद चालू होता. अशी हळूहळू राजारामची अधोगती होत गेली. पुढे चंपकलालने बंगला बाधला. राजारामनेही बंगला बांधण्यासाठी २५ एकर जमीन चंपकलालचा चुलत भाऊ छगनलालला विकली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी काही एकर जमीन विकण्यात आली.
आजची परिस्थिती : आज राजारामकडे दीडशे एकर जमिनीपैकी एकही एकर जमीन नाही. फक्त एक बंगला व गंजत पडलेली फॉर्च्युनर आहे. राजारामचा मुलगा बी.ए.बी.एड. झाला आहे. तो गावातीलच शेठ चंपकलाल विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करतो व राजारामला महिन्याला १ हजार रुपये पान व विडीच्या खर्चासाठी देतो आणि राजाराम गावातील एका मंदिराच्या कट्ट्यावर बसून विड्या ओढतोय. गावच्या विकासासाठी चंपकलालने गावातील शाळेला २५ लाखांची देणगी दिली आहे. गावातील व्यक्तींनी त्याचा मुलगा रोहनलालला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. रोहनलाल बिल्डर असून त्याचे बेलापूरला मोठे कार्यालय आहे. तो आठवड्यात एखाद्या दिवशी गावात येतो.
प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन : एक मार्केटिंग सल्लागार म्हणून मी त्या प्रोजेक्टचे व्हॅल्यूूएशन करू लागलो आणि माझे डोळे पांढरे झाले. प्रति स्वेअर फूट रु. ३,२०० दर काढायचे ठरले. त्यानुसार दीडशे एकराच्या प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन खूप मोठे आहे. एक एकरात किमान ६ कोटींचा व्यवसाय होतो. दीडशे एकरांत सुमारे १ हजार कोटींच्या पुढे जाईल. पुढील तीन वर्षांत प्रोजेक्ट तयार होईल. रोहनलाल जे माझे क्लाइंट आहेत त्यांनी सांगितले की, हे १ हजार कोटी वापरून आपण अजून असे बारा प्रोजेक्ट पुढील पाच वर्षांत सुरू करू.
गावातील स्थिती : राजाराम पाटील हे एक उदाहरण झाले. अशा अनेक लोकांनी भविष्याचा विचार न करता आपल्या जमिनी विकून टाकल्या. रोहनलालसारख्या बिल्डरांनी त्या विकत घेतल्या. स्वत:ला पाटील म्हणणारी मुले कधी व्यापार शिकली नाहीत. थोडी जमीन विकायची, गाडी घ्यायची व चैन करायची. गावातील बरीच मुले रोहनलालच्या कार्यालयात वॉचमन, क्लार्क, कामगार म्हणून काम करतात. घरामध्ये गावातीलच पाटलांच्या सुना मोलकरणीचे काम करतात.
गणेशोत्सव, शिवजयंती, गावची यात्रा अशा अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांत रोहनलाल सढळ हाताने लाख-दोन लाखांची मदत करत असतो. गावातील पाटलांच्या पोरांची मंडळे आहेत. रोहनलालकडे कार्यक्रमासाठी देणगी मागण्यासाठी येत असतात. गावातील अशा उत्सवांत रोहनलालची मोठी पोस्टर्स लावलेली असतात. रोहनलाल आपल्या बेलापूरच्या कार्यालयात दुसर्या गावातील जमीन विकत घेण्याची तयारी करत असतो. गावातील पाटलांची पोरे शिवजयंतीत झांज पथक बोलावून आनंद शिंदे-मिलिंद शिंदेच्या गाण्याच्या तालावर नाचत असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.