बुद्धिबळाच्या खेळाच्या शोधाचे श्रेयही भारतालाच जाते, कारण प्राचीन काळापासून हा खेळ भारतात खेळला जात आला आहे. धर्मग्रंथ आणि प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यात याचे उल्लेख मिळतात. या खेळाची उत्पत्ती भारतात केव्हा आणि कशी झाली, याची निश्चित स्वरूपातील माहिती उपलब्ध नाहीये. असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावण याची पत्नी मंदोदरी हिने या खेळाचा अविष्कार अशा उद्देशाने केला होता की तिचा पती रावण याला आपला सर्व वेळ युद्धात व्यतीत करता येऊ नये. एका पौराणिक कथेत असा देखील उल्लेख आहे की रावणाचा पुत्र मेघनाद याच्या पत्नीने या खेळाचा प्रारंभ केला होता.
७ व्या शतकातील सुबंधू रचित 'वासवदत्ता' नावाच्या संस्कृत ग्रंथात देखील याचा उल्लेख पाहायला मिळतो. बाणभट्ट रचित 'हर्षचरित्र' मध्ये चतुरंग नावाने या खेळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरून स्पष्ट होते की हा खेळ शाही होता.
'अमरकोश' नुसार याचे प्राचीन नाव 'चातुरांगिनी' होते ज्याचा अर्थ आहे ४ अंगांची सेना. गुप्त काळात हा खेळ खूप प्रचलित होता. अगोदर या खेळाचे नाव चतुरंग होते परंतु ६ व्या शतकात पारशी लोकांच्या प्रभावामुळे याला शतरंज म्हटले जाऊ लागले. हा खेळ इरारणी लोकांच्या माध्यमातून युरोपात पोचला तेव्हा याला 'चेस (Chess)' म्हटले जाऊ लागले.
सहाव्या शतकात महाराज अन्नुश्रिवण यांच्या काळात हा खेळ भारतापासून इराणमध्ये लोकप्रिय झाला तेव्हा याला 'चतुरअंग', 'चातरांग' आणि मग कालांतराने अरबी भाषेत 'शतरंज' म्हटले जाऊ लागले.