९२

गांधीजीं मोठे साक्षेपी पुरुष. त्यांची स्मृती जबरदस्त. शेकडो, हजारो लहान-मोठ्या सेवकांची त्यांना आठवण असे. स्मृती हा आध्यात्मिक गुण आहे. सात्त्विक गुण आहे. अर्जुन गीतेच्या शेवटी म्हणतो : ‘मोह गेला, स्मृती आली.’ स्मृती म्हणजे दक्षता. ‘दक्ष तो मोक्ष मेळवी’. बावळटाला, हे विसर- ते विसर करणाराला कोठून सिद्धी मिळणार?

महात्माजी बारडोलीहून वर्ध्याला जात होते, तापी रेल्वेने जात होते. अमळनेर स्टेशनवर त्यांना आहार देण्यात आला. सायंकाळ झाली. गाडी निघाली. एरंडोल रोड स्टेशनही गेले. आणि पुढच्या चावळखेडे स्टेशनवर गाडी थांबली. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून शेकडो शेतकरी जमले होते. गांधीजींच्या डब्याजवळ ते जमले, गांधी शांतपणे खिडकीजवळ बसले होते.

‘हरिजनके वास्ते,’ असे म्हणून त्यांनी आपला हात पुढे केला. आणि प्रत्येक शेतक-याने येताना मुद्दाम बरोबर आणलेला आणा-अर्धा आणा राष्ट्रपित्याच्या हातावर ठेवला. प्रत्येकजण ठेवी, प्रणाम करी, दूर होई. गांधीजींना समाधान झाले. गाडी निघाली. शेतक-यांनी जयजयकार केला. महादेवभाई, प्यारेलाल पैसे मोजत होते.

‘कोणता गाव?’ गांधीजींनी विचारले.

‘एरंडोलजवळची ही सारी खेडी. रिक्त हस्ताने कोणी आला नव्हता.’ कोणीतरी सांगितले.

‘एरंडोल? बरोबर. शंकरभाऊ काबरे, त्यांचा गाव, शंकरभाऊ—तो निरहंकारी सेवक.’ एरंडोल म्हणताच गांधीजींना तेथील शंकरभाऊ आठवले. लगेच त्यांच्या निरहंकारीपणाचा त्यांनी उल्लेख केला. मी त्या वेळेस डब्यात होतो. दूरच्या सेवकाविषयीची ती आठवण ऐकून माझे हृदय उचंबळून आले होते. सेवकांची अशी कदर करणाराला सेवकांची वाण पडत नाही. उगीच का देशभर हजारो माणसे गांधीजींनी उभी केली? ही सहृदय मानवता त्यांच्याजवळ अपरंपार होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel