४९

महात्माजींचे जीवन हेतुमय होते. जे जे जीवनोपयोगी, त्याची त्याची त्यांनी उपासना केली. ते यंत्रविरोधी नव्हते, ते कितीदा म्हणाले : ‘शिवण्याच्या यंत्राचा ज्यानं शोध लावला त्याचे किती उपकार!’

ते म्हणाले “ ‘मलाही विजेची शक्ती हवी आहे. ती झोपडीत मला नेता आली आणि तेथील ग्रामोद्योगांना लावता आली तर सुंदर होईल!’ उपकारक यंत्र त्यांना हवे होते.

साबरमती आश्रमात महात्माजी राहत असत त्या वेळची ही गोष्ट आहे. महात्माजी आश्रमातून अहमदाबाद शहरात काही तरी महत्त्वाच्या कामासाठी गेलेले होते. परंतु दुस-या एका ठिकाणी त्यांना सभेला जायचे होते. गावातील कामात बराच वेळ गेला. ते त्या कामात व्यग्र होते. झपझप पावले टाकीत तो निर्भय पुरुष, तो कर्मयोगी येत होता. इतक्यात तिकडून आश्रमातले कोणी तरी सायकलवरून येत होते. महात्माजींना बघताच तो सायकलस्वारउतरला.

‘कुठं चाललास?’ महात्माजींनी विचारले.

‘बापू, तुम्हांला त्या सभेला जायचे आहे, दहा मिनिटंच राहिली. मी तुम्हांला आठवण देण्यासाठी येत होतो. नाही तर मागून म्हणाला असता की, मला कळवलं का नाही?’

‘ती सभा आजच ठरली वाटतं?’

‘हो, आणि वेळही होत आली.’

‘दे तर तुझी सायकल.’

‘तुम्हा सायकलवर जाणार? पडाल हो. शहरात गर्दी असते बापू.’

‘जे मी आफ्रिकेत शिकलो ते विसरण्यासाठी नाही. सायकलवर सर्वांना बसायला आलं पाहिजे. आण, वेळ नको दवडू.’

असे म्हणून बापू सायकलवर बसले आणि वेगाने गेले. आश्रमावासी पाहत राहिला. सायकलवर बसलेली बापूंची मूर्ती डोळ्यासमोर आणून गंमत वाटते, नाही!


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel