७२

दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. युरोपातील राष्ट्रे भराभरा कोलमडत होती. इंग्लंड संकटात होते. त्या पहा वसाहतीतून फौजा येऊ लागल्या. इंग्लंडमध्ये उतरू लागल्या. एक ऑस्ट्रेलियन सेना मुंबईत उतरली. ती विलायतला जायची आहे.

रणांगणावर मरायला जाणा-या शिपायांना सारी मोकळीक असते. आणि गुलाम हिंदुस्थानात गो-या शिपायांच्या मिजाशीला सीमा नसे. ऑस्ट्रेलियन सैनिक, ते गोरे टॉमी, मुंबईत धुमाकूळ घालू लागले. कोणाच्या व्हिक्टोरियात बसून जात, कोणाची मोटार पकडीत. परंतु सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे त्यांची स्त्रियांच्या बाबतीतील वागणूक. गिरगाव, गँटरोड वगैरे भागांतून हिंदी नारींना हिंडणे कठीण होऊ लागले. टॉमी चावटपणा करायचे. पदरही म्हणे ओढायचे. परंतु मुंबईतील वृत्तपत्रे गप्प होती. महाराष्ट्रातील हिंदुत्वाची अभिमानी पत्रेही थंड होती. अखेर गोष्टी राष्ट्रपित्याच्या कानी गेल्या आणि तो शांतिसिंह प्रक्षुब्ध झाला. हरिजनमध्ये बापूजींनी लिहिले, ‘लष्करी अधिकारी कुठं गेले? काँग्रेस कमिटी का झोपली? हिंसा किंवा अहिंसा हा सवाल नाही. स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण झालंच पाहिजे.’ महात्म्याने आपला निर्भय आवाज उंच केल्याबरोबर मग इतर पत्रे रकाने भरून लिहू लागली. महात्माजी म्हणजे निर्भयता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel