''त्यांचे घर कोणीही सांगेल. नाही तर त्यांच्या कचेरीतच जा. कचेरीत पाटीवर असेल. नाही तर कुणाला विचार. तोंड आहे ना?''

दुपार गेली. तिसरा प्रहर आला. मायाने चिठी लिहिली.

''ही घे चिठी, बाळ जा; लौकर परत ये.''

''खालचे काम कोण करील?''

''मी करीन; जा.''

हेमा चिठी घेऊन निघाली. तिचा पोषाख साधा होता. एक साधे पातळ ती नेसली होती. साधे पोलके होते. केसात एक फूल होते. ती जात होती. पाटया वाचीत जात होती. तिने एकाला विचारले. त्याने रस्ता दाखविला. ती त्या रस्त्याने कचेरीजवळ आली. ती आत शिरली. कचेरीत कोणी नव्हते. तेथे एका खुर्चीवर ती बसली. इतक्यात हेमंत लगबगीने आत आला. हेमा उभी राहिली. तिने हेमंतला ओळखले. परंतु त्याने तिला ओळखले नसावे.

''काय आहे आपले काम?''

''मालकांशी काम आहे. आपणच का मालक?''

''मी मालक नाही. ते थोडया वेळाने येतील. बसा तुम्ही; थांबा.''

हेमा तेथे बसली. तिला का जरा संकोच वाटत होता? परंतु हेमंतच तेथून निघून गेला. ती तेथे आता एकटीच होती. आणि रंगराव आले. ती उठून उभी राहिली.

''कोण पाहिजे?'' त्यांनी विचारले.

''आपणच ना रंगराव?''

''हो.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel