''काय छान नाव! मग तुमच्याकडे येऊ ना राहायला? मी सांगाल ते काम करीन.''

''ये. कधी येणार?''

''आज सायंकाळी किंवा उद्या उजाडत येईन.''

''मी वाट पाहीन. सायंकाळी जाणार नाही. सायंकाळीच ये.''

''आता मी जाते. सारी तयारी करायला हवी.''

हेमा निघून गेली. ती खरेच बांधाबांध करून लागली, तिने फारसे सामान घेतले नाही. फक्त चार कपडे तिने बरोबर घेतले. दोन पुस्तके, दोन वह्या, एक आरसा, फणी असे सामान तिने घेतले.

''तयारी चालली आहे वाटते?'' रंगरावांनी विचारले.

''हो, बाबा. मी तुमचीच आहे. जरूरी पडताच बोलवा मला. दुखले खुपले तर बोलवा. ज्या वेळेस माझी जरूर वाटेल, त्या वेळेस बोलवा. हेमा तुमचीच आहे.''

रंगराव काही बोलले नाहीत. ते तेथे उभे होते.

''बाबा, मला एकदा जवळ घेता? हृदयाशी धरता? डोक्यावरून हात फिरवता?'' तिने विचारले.

त्याने तिला जवळ घेतले.

''जा, कुठेही सुखी अस.'' तो म्हणाला.

''सायंकाळी जाईन.'' ती म्हणाली.

''आपल्या गाडीतून जा.'' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel