''अग, ती म्हातारी आहे. तिला या गावाचा सारा इतिहास माहीत असेल. जो नातलग कित्येक वर्षांपूर्वी या गावी मला भेटला होता, त्याची हकीकत कदाचित् तिला माहीत असेल. तू येथे थांब; मी येते हं.''

हेमा तेथे थांबली. तिचे केस कपाळावर येत होते. ती ते मागे सारीत होती येणारे जाणारे तिच्याकडे बघत होते. तिच्या कोणी ओळखीचे नव्हते. ती एक गाणे गुणगुणू लागली. मधून आई आली का ती बघे. केव्हा येणार आई?

आई त्या म्हातारीशी बोलत होती. प्रश्नोत्तरे चालली होती.

''आजीबाई, किती वर्षे या गावात तुम्ही आहांत?''

''सारी ह्यात याच गावात गेली. सारी सुखदु:खे पाहिली. या गावात मी कुंवार्ली होते. लहानपणी मी खेळले. याच गावात माझे लग्न लागले. याच गावात मी विधवा झाले. हे दुकान घातले. काही दिवस भरभराटीचे गेले, काही कठीण गेले, परंतु मला एकटीला फार हवे तरी कशाला?''

''आजीबाई, या गावचा सारा इतिहास तुम्हांला माहीत असेल. येथल्या घडामोडी तुम्हांला आठवत असतील, नाही?''

''काही आठवतात.''

''तुम्हांला जवळ जवळ अठरा वर्षांपूवीची एक गोष्ट आठवते का? या गावातच घडली होती.''
''कोणती गोष्ट? हजारो गोष्टी गेल्या अठरा वर्षांत झाल्या असतील. किती मेली, किती जन्मली, काय काय तरी ध्यानात ठेवू?''

''परंतु ती गोष्ट तुम्ही विसरणे शक्य नाही. एका पुरुषाने आपली बायको विकली. तुमच्या दुकानाजवळच ती गोष्ट घडली म्हणतात. नवरा दारू प्याला होता. आठवते का गोष्ट?''

''आठवली हो ती गोष्ट. चमत्कारच बाई! पंचवीस रुपये घेऊन त्याने बायको विकली. आणि तीही आपली उपटाप्रमाणे विकत घेणार्‍याबरोबर गेली! दुसर्‍या दिवशी नवरा शुध्दीवर आला नि रडू लागला.''

''आजीबाई, त्याची तुमची पुन्हा कधी भेट झाली होती का?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel