''काही तरी बोलू नकोस. आपण आता सुखी होऊ.''

''मी आता जातो. जरा धीराने घे.''

रंगराव गेले. गॅलरीत सुलभा उभी होती. रंगरावाने मागे वळून पाहिले नाही. आणि तिकडून हेमा येत होती.

''बाबा, बरे आहात ना?'' तिने विचारले.

''तू का तेथे वरती राहतेस?'' त्याने विचारले.

''हो.''

''सुखी अस.''

तो निघून गेला. ती खिन्नपणे वरती आली.

सुलभा गॅलरीत उभी होती. रस्त्यात हेमंत कोणाजवळ तरी बोलत होता. ती त्याच्याकडे बघत होती.

''तुम्ही नगरपालिकेचे अध्यक्ष व्हा. सारे तुम्हांला निवडून देतील.''

''मला मानाची हौस नाही. दूर राहूनही लोकांची सेवा करता येईल.''

''परंतु सगळयांनीच तुम्हांला आग्रह केला तर?''

''बघू पुढे काय होते ते. अद्याप अवकाश आहे. मला जाऊ दे. काम आहे.''

असे म्हणून हेमंत निघून गेला. सुलभा अजूनही तेथेच होती. ती खोलीत आली. भयंकर उकाडा होत होता.

''हेमा, जरा पंखा आण पाहू.'' तिने हाक मारून सांगितले.

''फार उकडते आहे, नाही?'' हेमा म्हणाली.

''त्या हेमंताना मी पाहिले. रस्त्यात बोलत होते.''

''केव्हा, आता?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel