''ते फूल जा ना घेऊन.''

''खरेच मी ते त्या फुलदाणीतून बाहेर काढले. लहान मुलाप्रमाणे जणू वागले. माफ करा हं.''

''अहो, फूल सर्वांना आवडते. बायकांना अधिकच. मी आपण होऊनच तुम्हांला दिले पाहिजे होते.''

''जाते.''

''अच्छा.''

ती गेली. दारापर्यंत हेमंत पोचवायला गेला. सुलभा जणू स्वप्नसृष्टीत गेल्याप्रमाणे चालत होती. तिचे इकडे तिकडे लक्ष नव्हते. समोरून बैलगाडी येत होती. गाडीवाला ओरडत होता. कोणी तरी सुलभाला बाजूला ओढले.

''मराल की!'' तो म्हणाला.

सुलभा शरमली. ती घरी आली. हेमा वाट पहात होती.

''किती वेळ झाला तुम्हांला जाऊन! भूक नाही का लागली?''

''तू जेवण का नाही घेतलेस? मला आज भूक नाही. पोट भरले आहे.''

''कोणी ओळखीचे भेटले की काय? कोठे का खाणेपिणे झाले? माझ्या बाबांची नि तुमची ओळख आहे. ते का भेटले? त्यांच्याकडे का तुम्ही गेला होता?''

''नाही.''

''मग कोण भेटले?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel