एक कोल्हा आणि एक बोका प्रवासाला निघाले. वाटेत प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून तत्त्वज्ञानासारख्या गहन विषयावर बोलत ते चालले होते. कोल्हा बोक्याला म्हणाला, 'सगळ्या नैतिक सद्‌गुणात दयेची बरोबरी करणारा दुसरा सद्‍गुण नाही, असं मला वाटतं. माझ्या सुशील मित्रा, यासंबंधाने तुझं मत काय आहे बरं ?' बोका मोठ्या साधुत्वाचा आव आणून म्हणाला, 'मित्रा, जे तुझं मत तेच माझंही मत, ज्याला थोडीबहुत अक्कल आहे, अशा कोणत्याही प्राण्याला दयाळूपणासारखं दुसरं भूषण नाही.' याप्रमाणे निरनिराळ्या नीतितत्त्वाचे प्रतिपादन करीत व परस्परांच्या उदात्त विचारांबद्दल परस्परांची स्तुती करीत ते चालले आहेत, तोच जवळच्या रानातून एक लांडगा बाहेर पडला व एका मेंढ्याच्या कळपावर हल्ला करून एक कोकरू तोंडात धरून आणले. तो प्रकार पाहून बोका कोल्ह्याला म्हणाला, 'साधुमहाराज, किती हो दुष्ट हा लांडगा. ते कोकरू सारख ओरडत होतं, तरी तिकडे लक्ष न देता दुष्टानं नेऊन मारून खाल्लं. ही क्रूरपणाची अगदी सीमा झाली, असं म्हटलं पाहिजे. हा निर्दयपणा पाहून माझ्या अंगावर अगदी शहारे आले बुवा ! त्याचे जर भुकेनं अगदी प्राणच जात असतील तर लहान किडे मारून खायचे होते.' ह्या भाषणाची कोल्ह्याने फारच स्तुती केली व असल्या निर्दयपणामुळे निरपराधी प्राण्याचे हाल कसे होतात याचे अगदी वक्‍तृत्वपूर्ण भाषेत वर्णन केले की, ते ऐकून बोक्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी त्या लांडग्यावर बराच राग व्यक्त केला व शक्य तितक्या कडक शब्दात निषेध करीत ते पुढे चालू लागले. काही वेळाने ते एका शेतातल्या एका वाड्याजवळ आले. तेथे एक लठ्ठ कोंबडा दाणे टिपत होता. तो पहाताच कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले व आपली सगळी नीतितत्त्वे बाजूला सारून त्याने त्याच्यावर झडप घातली. इकडे एक मोठा उंदीर नुकताच बिळातून बाहेर पडला होता, तो पाहून बोकोबाही आपले सगळे तत्त्वज्ञान क्षणात विसरून गेले व उंदरावर झडप घालून त्यांनी त्याला खाऊन टाकले.

तात्पर्य

- प्रत्येक माणूसं आपल्या भाषणात सद्‌गुणाची नेहमी तारीफ करत असतो, पण त्याची वागणूक मात्र बहुधा उलट असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel