(ही कथा काल्पनिक आहे वास्तवाशी कुठे साम्यआढळल्यास तो योगायोग समजावा)

बँकेच्या किल्यांच्या डुप्लिकेट बनविल्याशिवाय स्ट्राँग रूम किंवा तिजोरी उघडता येणे शक्य नव्हते .किल्ल्यांच्या डुप्लिकेट बँकेतून कुणीतरी सामील असल्याशिवाय करता येणे शक्य नव्हते.डुप्लिकेट कशा केल्या ते शोधून काढणे आवश्यक होते .तिथूनच कदाचित दरोडेखोरांपर्यंत  पोहचता आले असते.

युवराज स्वतः बँक मॅनेजरला भेटण्यासाठी गेले.त्याना किल्ल्या कुठे ठेवलेल्या असतात त्यांच्यापर्यंत कोणकोण पोहोचू शकतो हे सर्व माहीत करून घ्यावयाचे होते.सर्व चौकशीअंती त्यांच्या असे लक्षात आले की सर्व किल्ल्या एका पॅनेलवर ठेवलेल्या असतात.  पॅनेल एका कपाटात बसविलेले आहे .कपाटाला कुलूप आहे .पॅनेलवरील निरनिराळ्या हुक्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्या असतात. प्रत्येक हुकखाली तेथील किल्ल्या कशाशी संबंधित आहेत तेही लिहिलेले असते. असे किल्ल्यांचे गट केल्यामुळे आपल्याला हवी असलेली किल्ली पटकन सापडते. तिथे एक क्लार्क बसलेला असतो .तिथेच एक प्यून असतो . कुणीही लॉकर उघडण्याला आला की बँकेचा प्यून त्यातील योग्य तो जुडगा  घेतो आणि बँकेची किल्ली लॉकरला लावून आलेल्या ग्राहकाला  लॉकर उघडण्याला मदत करतो.कधी कधी जिथे किल्ल्या असतात तिथे शिपाई किंवा क्लार्क कुणीही नसतो .स्ट्राँग रूमपासून दूर जायचे झाल्यास कपाटाला कुलूप लावून किल्ली स्वतःजवळ ठेवून क्लार्कने जावे अशी अपेक्षा आहे.ही शिस्त नेहमी पाळली जातेच असे नाही.रुटीन कामांमुळे व्यक्ती हळूहळू शिथिल होत जातात. आलेला ग्राहक तिथे प्यून किंवा क्लार्क यांची वाट बघत बसतो.अशा वेळी एखादा चलाख ग्राहक किल्ल्यांचे ठसे घेऊ शकतो.स्ट्राँग रूम बँकेच्या मुख्य ऑफिसपासून दूर तळघरात असल्यामुळे ठसे घेणे शक्य आहे .

यासाठी बँकेचे लॉकर कुणा कुणाकडे आहेत त्याची माहिती गोळा करून त्यामध्ये कुणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे का हे पाहिले पाहिजे .

तसेच शिपाई क्लार्क यातील कुणी गुन्हेगारांना सामील आहे का हेही पाहिले पाहिजे. 

युवराजांनी सर्व लॉकर  होल्डर्सची यादी बँक मॅनेजर कडून घेतली.त्याचप्रमाणे सर्व स्टाफची प्यूनसकट  यादी घेतली .त्या दोनही याद्या संदेशला दिल्या व संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले .जिथे किल्ल्या ठेवलेल्या असतात तेथील  सीसीटीव्ही फुटेज एक वर्षांपर्यंतचे पाहणे फार किचकट  गोष्ट होती .एक वर्षांपूर्वी गाळा भाड्याने देण्यात आला होता .किल्ल्यांचे ठसे केव्हा घेतले गेले हे सांगणे शक्य नव्हते .ते सीसीटीव्ही फूटेज शिल्लक असेल की डिलिट केले असेल असाही प्रश्न होता.इतर गोष्टी मार्फत जर गुन्हेगारांपर्यंत पोचता आले तर जास्त सोपे पडणार होते.

संदेशने सरजू व  बिरजू यांचा बँकेमध्ये लॉकर आहे अशी बातमी आणली .ते दोघेही लॉकर उघडण्यासाठी आले असता एकाने क्लार्क व प्यून यांच्याकडे लक्ष ठेवले असेल किंवा त्यांना एखाद्या कामामध्ये गुंतवून ठेवले असेल आणि किल्ल्यांचे ठसे घेतले असतील अशी दाट शक्यता  होती .

या बातमीमुळे जरी त्यांच्यावरचा संशय वाढला असला तरी त्यांना पकडता येणे शक्य नव्हते. बँकेत लॉकर असणे हा काही गुन्हा होऊ शकत नव्हता .त्यासाठी आणखी भक्कम पुरावा हवा होता .त्यांना आत घेऊन पोलिसी हिसका दाखवून ते आपले तोंड उघडतील याची शक्यता कमी होती .त्यापेक्षाही त्यांचे साथीदार सावध होतील आणि माल व ते गायब होतील ,अशी भीती होती .नंतर त्यांना पकडणे आणखी बिकट झाली असते.

आणखी एका माहितीमुळे त्यांच्यावरचा संशय वाढला .ज्या रात्री बँकेत चोरी झाली त्यानंतर दोन दिवस दोघेही शहरातून गायब होते .कदाचित चोरलेला माल शहराबाहेर ठेवण्यासाठी ते गेले असण्याची दाट शक्यता  होती.

युवराजांच्या मनात आणखी एक कल्पना चमकून गेली .भुयार जवळजवळ  पूर्ण होत आल्यावर त्या दोघांनी किल्ल्यांच्या डुप्लिकेट केल्या असतील.तेव्हा गेल्या दोन महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर कदाचित ते दोघे किल्ल्यांचे ठसे घेताना आढळतील .त्या दृष्टीने त्यांनी मॅनेजरकडून गेल्या दोन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज मागविले .ते पाहताना बहुधा ते दोघे ठसे घेत असावे अशी क्लिप पाहण्यात आली .दोघेही पाठमोरे उभे होते .ते काय करीत आहेत हे खात्रीपूर्वक  सांगणे कठीण होते.तसेच ते बिरजू व सरजू आहेत असे लक्षात येत असले तरी तसे ठामपणे सांगणे कठीण होते .सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे मुद्दाम पाठ करून त्यांनी ठसे घेतले असण्याची दाट शक्यता होती .एवढ्या पुराव्यावर त्या दोघांना पकडता आले असते.त्यांची पोलिस चौकशी करता आली असती परंतु जर या मागे एखादी गँग असेल तर ती सावध झाली असती .माल आणि ते लोक गायब झाले असते.कुणालाही संशय येऊ न देता या दोघांवर तसेच लक्ष ठेवणे योग्य ठरेल असा निर्णय घेण्यात आला .त्या दोघांवरील लक्ष आणखी कडक करण्यात आले .

मध्यंतरी एक टेम्पो बेवारस अवस्थेत एका जंगलात सापडला.तो टेम्पो बहुधा  त्या गाळ्यातून माल आयात निर्यात करण्यासाठी वापरला जात असावा असा संशय येत होता .परंतु खात्री देता येत नव्हती .चौकशी करता त्या टेम्पोच्या मालकाने टेम्पो चोरीला गेल्याची फिर्याद केल्याचे आढळून आले .तपास करण्याचा तोही मार्ग बंद झाला .

नंतर दोघांसंबंधी आणखी एक गोष्ट अशी आढळली की त्यावरून तेच गुन्हेगार आहेत याची खात्री पटली .दोनच दिवसात दोघेही शहराबाहेर पडले.ते शहरापासून शंभर किलोमीटर दूर अंतरावरील एका तळ्यावर पोचले.तिथे जाताना प्रथम रेल्वे नंतर बस व शेवटी रिक्षा व नंतर चालत असा प्रवास त्यांनी केला .त्यांचा हेतू आपला जर कुणी पाठलाग करीत असेल तर त्याला चकवा देणे हाच होता .अर्थात संदेशच्या माणसानी त्यांची पाठ सोडली नाही.

हे तळे आसरांचे तळे   म्हणून ओळखले जाई .तळ्यामध्ये कुणी बोटिंगला किंवा पोहण्यासाठी गेला एवढेच काय तर आसपासही फिरकला तर त्याला आसरा पाण्यात ओढून नेतात व तो मृत्यू पावतो अशी अफवा होती.काही जण तसे मृत्यू पावल्यामुळे ती अफवा निर्माण झाली होती . त्यामुळे तिकडे कुणीही फिरकत नसे . मुद्दामच त्यांनी ते तळे निवडले होते. बोट घेऊन ते दोघे तळ्याच्या मध्यभागी गेले.संदेशचा माणूस  हाय एंड कॅमेऱ्यातून दूरवरून त्यांचे चित्रण करीत होता .

दोघे तळ्याच्या मध्यावर पोचल्याबरोबर संदेशला त्याच्या माणसाने फोन केला होता .संदेशने युवराज व शामराव यांना फोन केला .युवराजांना फोनवरून ते दोघे तळ्याच्या मध्यभागी गेले आहेत अशी बातमी मिळताच त्यांनी पुढील सर्व अंदाज केला .त्याप्रमाणेच सर्व घटना घडल्या . युवराजांनी शामरावांना फोन करून त्या दोघांना तळ्याच्या काठावर अटक करण्यास सांगितले 

शामरावांनी स्थानिक पोलिसांना फोन करून त्या दोघांना अटक करण्याची व्यवस्था केली.

इकडे हायएंड कॅमेऱ्यातून त्यांचे चित्रण करीत असलेला संदेशचा माणूस रनिंग कॉमेंट्री करीत  होता.त्याचा मतितार्थ पुढील प्रमाणे होता.

त्या दोघातील एक जण बोटीत बसून राहिला .दुसऱ्याने तळ्यात बुडी मारली. जरा वेळाने तो पुन्हा वर होडीत आला .त्यानंतर दोघांनी काहीतरी जड वस्तू वरती ओढून घेतली. जलप्रतिबंधक बॅगेमध्ये माल ठेवण्यात आला होता .त्यातून त्यांनी काही पैसे काढून घेतले .बॅग पुन्हा पॅक करून ती आत सोडण्यात आली.पुन्हा एकाने तळ्यात डुबी मारली.नंतर दोघेही तळ्याच्या काठावर येतात तोच त्याना स्थानिक पोलिसांकडून अटक करण्यात आली..

वॉटरप्रूफ बॅगेमध्ये सर्व माल नोटा व सोने नाणे ठेवलेले होते .ही बॅग इकडे तिकडे सरकू नये यासाठी ती तळाला एका दगडाला बांधून ठेविली होती.एक जण तळ्यात डुबकी मारून दगडापासून ती बॅग सोडवीत असे व नंतर हुकाला अडकवून ती वरती ओढून घेऊन त्यातून माल काढीत असत . इकडे कुणी सहसा फिरकत नाही यासाठी हे अफवा असलेले आसरांचे तळे बॅग लपविण्यासाठी शोधून काढले होते .

शामराव पाणबुडय़ांसह त्या तळ्यावर पोहोचले .पाणबुड्या ती बॅग वरती घेऊन आला .जवळ जवळ सर्व माल त्यांमध्ये होता.बेड्या घातलेले सरजू व बिरजू तिथेच तळ्याच्या काठावर होते .डोळ्यादेखत आपण लपवलेला माल बाहेर काढून काठावर आलेला पाहताच  त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .त्यांच्या तोंडातील घास जणु काही कुणी काढून घेतला होता . 

. बिरजूला दयारामजींनी भाड्याने गाळा घेण्यासाठी आलेली सुधाकर नावाची हीच व्यक्ती असे ओळखले .

शामरावांनी व युवराजानी त्यांना त्यांच्याविरुद्धचा सर्व पुरावा दाखविला.त्यांनी हात मारण्याची योजना सुरेख आखली होती .जवळच भाड्याने गाळा घेणे, तेथून भुयार खणणे,बँकेमध्ये जाऊन तेथील कार्यपद्धती पाहून किल्ल्यांचे ठसे घेणे व डुप्लिकेट किल्ल्या  बनविणे,आपल्यावर संशय येऊ नये म्हणून शहरातच राहणे कुठेही पळून न जाणे,पैसे लपविण्यासाठी आसरांचे तळे शोधून काढणे, हा सर्व प्लॅन उत्तम होता .त्यांनी सहा महिने दम काढणे आवश्यक होते .जर ते अासरांच्या तळ्यांमध्ये पैसे काढण्यासाठी गेले नसते तर त्यांना पकडणे कठीण गेले असते.एवढे पैसे आपल्याजवळ असताना गरीबीत राहायचे त्यापेक्षा मधून मधून थोडी थोडे पैसे काढून मजेत राहू या असा विचार त्यांनी केला .आणि त्या ठिकाणीच ते फसले.इतर काही पुरावे त्यांच्या दिशेने बोट दाखवत होते .  गाळा भाड्याने घेण्यासाठी आलेला तो हाच असे दयारामजींनी त्यांना ओळखणे,ठसे घेतांचे सीसीटीव्ही फुटेज, जंगलात सोडून दिलेली टेम्पो त्यांनी वापरला असावा  ,इ.परंतु हे निर्णायक पुरावे असू शकत नव्हते.तो पूरक स्वरूपाचा (सपोर्टिंग एव्हिडन्स)  पुरावा होता.'माल सापडणे व तेथेच त्यांना अटक करणे हा निर्णायक पुरावा होता.   

एवढा पुरावा पाहताच ते दोघे पोपटासारखे बोलू लागले.पोलिसी हिसक्याची गरज पडली नाही.पोलिसी हिसका त्यांनी पूर्वी अनुभवलेला होता .त्यांनी दिलेल्या जबाबाचा आशय पुढीलप्रमाणे होता .

माती भरलेली पोती एक्सपोर्ट होत .तर हवेने फुगवलेली पोती इम्पोर्ट होत           

बँकेवर डल्ला कसा मारावा याचा विचार करताना त्याना एक नामी कल्पना सुचली .

दोघांची एक खासियत होती .पूर्ण सारासार विचार करूनच ते कोणतेही पाऊल उचलत असत.घाईगर्दीत घिसाडीपणाने ते कोणतीही गोष्ट करत नसत.अगोदर नियोजन आणि नंतर त्याची अंमलबजावणी अशी त्यांची पद्धत होती.

बँकेवर एकदाच हात मारावा परंतु तो असा हात मारावा की जन्माची ददात फिटेल.असा त्यांचा विचार होता .आणि मग त्यानी एक योजना आखली.

भारत बँकेशेजारी त्यानी एक गाळा भाड्याने घेतला.त्यावर भारत इम्पोर्टस अँड एक्स्पोर्ट्स अशी पाटी लावली .एका टेम्पोमधून खोदकामाची सर्व हत्यारे व इतर सामुग्री तिथे नेवून ठेवली.बाहेरच्या छोटय़ा खोलीत त्यांनी ऑफिसटाइप रॅक्स टेबल कॉम्प्युटर इत्यादी सामुग्री ठेवली .गोडावूनमध्ये आलेल्या गेलेल्या मालाचा ते हिशेब ठेवत आहेत असा एकूण त्यांचा आव होता.आतल्या बाजूला गोण्यांची थप्पी लावलेली असे.मधून मधून टेम्पो येऊन तिथे उभा राहात असे.केव्हा केव्हा टेम्पोतून माल उतरत असे तर केंव्हा केव्हा त्यात माल चढत असे.माती भरलेली पोती एक्सपोर्ट होत .तर हवेने फुगवलेली पोती इम्पोर्ट होत .          

त्यांचा मुख्य उद्योग रात्री चालत असे .योजना अशी होती .त्यांनी भाड्याने घेतलेल्या गाळ्यांपासून एक भुयार बँकेच्या स्ट्राँग रुमपर्यंत तयार करायचे.रात्री बँक साफ करायची .व सकाळी बँकेला पत्ता लागेपर्यंत आपण मुद्देमाल नाहीसा करायचा .आपण मात्र गायब व्हायचे नाही .कारण आपले नाव पोलिस दरबारी आहे .आपण गायब म्हटल्यावर पोलीस आपल्या मागे लागतील .कानून के हाथ लंबे होते है .तेव्हा येथेच राहून हळूहळू पैसे बाहेर काढून मजा करायची .वरकरणी आपण एखादा उद्योग करीत आहोत असे दाखवायचे .त्यातून आपल्याला उत्पन्न मिळते असा भास निर्माण करायचा .म्हणजे  पोलिसांना आपला केव्हाही संशय येणार नाही.

मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे त्यांनी नियोजन पक्के केले .त्याची अंमलबजावणी उत्कृष्ट प्रकारे केली .बँक लुटताना इमर्जन्सी कनेक्शन कसबीपणाने तोडून टाकले.जरी त्यांना लॉकर्स साफ करता आले नाहीत तरी त्यांनी बँकेची तिजोरी संपूर्णपणे साफ केली .बँकेच्या तिजोरीच्या डुप्लिकेट किल्ल्या तयार केल्या .तिजोरीचा नंबर जरी माहीत नसला तरी ती त्यांनी कौशल्याने उघडली.अशा तिजोऱ्या उघडण्यात बिरजू वाकबगार होता. सर्व तिजोरी साफ केली.

*दहा कोटींची कॅश व पंधरा कोटींचे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण पंचवीस कोटीवर त्यांनी हात मारला.*

*तळ्यामध्ये माल काढण्यासाठी ते लवकर गेले आणि तिथेच त्यांनी माती खाल्ली.*

* शेवटी दोघेही पकडले गेले .*

* बँकेचा बहुतेक माल परत मिळाला.*

*दोघांनाही दहा दहा वर्षे शिक्षा मिळाली .*

*युवराजांच्या नावावर आणखी एक केस जमा झाली.*

६/७/२०१९ © प्रभाकर पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel