(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

त्याच दिवशी सुधाकरचा युवराजांना फोन आला.त्याची एकुलती एक दहा वर्षांची मुलगी पळविण्यात आली होती.ती मुलगी त्या टोळीच्या ताब्यात काम होईपर्यंत राहणार होती. काम झाल्यावरच मुलगी परत येणार होती. त्या टोळीने सुधाकरला असाही दम दिला होता  की जर पोलिसांची मदत घ्याल तर मुलीच्या जिवाला  धोका पोहोचेल .

युवराजांनी सुधाकरला पन्नास लाख मिळाल्याशिवाय मी तुमचे काम  करणार नाही असे फोन करणाऱ्या व्यक्तीला निक्षून सांगण्यास सांगितले.दुसऱ्या दिवशी सुधाकरचा फोन आला कि ते त्यांच्या घरासमोरच्या कुंडीत बरोबर आठ वाजता पैशांचे पाकीट  ठेवणार आहेत आणि मला ते लगेच घेण्यास त्यानी सांगितले आहे .युवराजांनी लगेच संदेशला फोन केला .पुढे काय करावे यासंबंधी युवराजांचे संदेशबरोबर विस्तृत संभाषण झाले. कोणत्याही परिस्थितीत त्या टोळीचा माग लागलाच पाहिजे त्यासाठी कितीही खर्च झाला तरी हरकत नाही,असेही पुढे युवराज म्हणाले.  

संदेशचा माणूस कचराकुंडीवर लक्ष ठेवून होता.संदेशने त्याचे अनेक हस्तक या कामासाठी नेमले होते.कुणी केव्हा काय करावे याचा कच्चा आराखडा त्यांनी तयार केला होता . सुधाकरला धमकी देवून काम करण्यास सांगणारी टोळी चलाख  आहे याची युवराजांना खात्री पटली होती.त्यांच्या अनेक पर्यायी योजना असतील. त्या लक्षात घेऊन त्याला तोडीस तोड उत्तर देणे गरजेचे होते. आयत्या वेळी ठरल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास त्याचे हस्तक समर्थ होते .

मोटारसायकलवरून येणार्‍या  एका इसमाने पाकीट कुंडीत टाकले .त्याचा पाठलाग त्याला नकळत लगेच सुरू झाला .

संदेशचा दुसरा एक माणूस कचरा गाडी घेऊन तयारच होता. तो आला आणि ती कुंडी त्याने गाडीत रिकामी केली . युवराजांच्या कल्पनेप्रमाणे ते लोक कुंडीवर लक्ष ठेवून होतेच .कचऱ्यात पन्नास लाख रुपये असलेले पाकीट गेल्यामुळे त्या लोकांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला .गुंडांनी त्या गाडीला अडविले व ड्रायव्हरला ढकलून ती गाडी पळविली .त्या गाडीचाही पाठलाग  संदेशच्या हस्तकांनी सुरू केला .

या पाठलागातून काही तरी निष्पन्न होईल असे वाटत होते.वाटेत एकाने कचऱ्यातून पाकीट  उचलून मोटारीतून पळ काढला.त्या मोटारीचाही पाठलाग संदेशच्या माणसांनी सुरू केला .असे करण्यामागे त्यांचा हेतू कुणी आपल्यावर लक्ष ठेवीत असेल तर आपण त्याला सापडू नये असा अर्थातच होता .त्याचबरोबर पैसे कुणाच्या तरी हातात पडू नयेत असाही होता .

या पाठलागाचा शेवट एका बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये झाला .

या सर्वांचे कनेक्शन एखाद्या शेजारी राष्ट्राशी असावे व हे त्याचे हस्तक असावेत किंवा हे स्वतंत्रपणे काम करणारे दहशतवादी असावेत असा तर्क युवराजांनी केला.

आतापर्यंत युवराज ही सर्व केस संदेशच्या मदतीने स्वतःच हाताळीत होते .शामरावाना त्यांनी फक्त त्याची माहिती दिली होती.फ्लॅटवर जाऊन तपास करणे आवश्यक होते .यामध्ये पोलिसांचा संबंध आणणे सुधाकरच्या मुलीच्या दृष्टीने धोक्याचे होते .युवराज व संदेश तिथे काहीतरी चौकशी करण्याच्या बहाण्याने पोहोचले. ते एका माणसाचा पत्ता शोधत आहेत असा त्यांचा आव होता . फ्लॅट रिकामा होता .सर्व मंडळी तिथून गायब झाली होती .घाईघाईने आवराआवर करून फ्लॅट सोडताना त्यांनी दरवाजाही ओढून घेतला नव्हता. जरी फ्लॅट रिकामा होता तरीही युवराज व संदेश यांनी त्याची कसून तपासणी केली .त्यांना एका कपाटात चोरकप्पा आढळला .त्या चोरकप्प्यांमध्ये एक लॅपटॉप लपविलेला होता. घाई गर्दीमध्ये लॅपटॉप नेण्याचे ते त्यांच्या दुर्दैवाने परंतू युवराजांच्या सुदैवाने विसरून गेले होते.त्याचा पासवर्ड शोधून काढणे व त्या लॅपटॉपवरील माहिती शोधून काढणे ही प्रक्रिया वेळखाऊ होती .शक्य तितक्या लवकर ती माहिती शोधून काढणे आवश्यक होते .त्यासाठी एक तज्ञ बोलावण्यात आला.पासवर्ड शोधून काढला तरी त्यावरील माहिती सांकेतिक स्वरूपात होती .त्याच तज्ञाने ती माहितीही कळेल अशा शब्दांमध्ये आणली. यामध्ये तो संपूर्ण दिवस गेला.राष्ट्राच्या दृष्टीने उपयुक्त माहितीबरोबरच त्या लोकांचा ठावठिकाणा कळण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त माहिती त्यात होती.त्या माहितीच्या आधारे त्या त्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी संदेशने काही माणसांची नेमणूक केली .त्या जागांवर छापा घालणे दोन्ही दृष्टींनी योग्य ठरले नसते .सुधाकरच्या मुलीला धोका निर्माण झाला असता .त्याचबरोबर राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील माहिती मिळण्याला आपण मुकलो असतो .थांबा आणि पाहा .वेट अँड वॉच हे धोरण युवराजांनी अवलंबिले. 

शामरावाना सर्व माहिती वेळोवेळी युवराजांमार्फत कळत होती. युवराजांनी परवानगी दिल्याशिवाय शक्यतो हस्तक्षेप करायचा नाही असे त्यानी ठरविले होते .  युवराज व शामराव यांना सुधाकरची मुलगी कुठे आहे ते नक्की जाणून घ्यायचे होते .त्याच ठिकाणी त्यांना सर्व तयारीनिशी  छापा मारायचा होता.त्या टोळीच्या सर्व जागा आपल्याला माहीत झाल्या आहेत याची त्याना खात्री नव्हती .

सुधाकर युवराजांना सकाळ संध्याकाळ फोन करून मुलगी कुठे आहे ती कळले का? म्हणून विचारीत होता .त्याला पोलिसांकडे जावून तक्रार करता येत नव्हती .तसे केल्यास मुलीला ठार मारू अशी धमकी त्या लोकांनी दिली होती. मुलीवर त्याचे अर्थातच जिवापाड प्रेम होते.मुलीसाठी तो व्याकूळ झाला होता .

दोन दिवसांनी त्या टोळीचा फोन पुन्हा सुधाकरला आला .त्याला नोकरीवर हजर व्हायला आता सहा दिवसच राहिले होते याची त्याला आठवण करून देण्यात आली . सुधाकरने त्याला अजून पन्नास लाख रुपये मिळाले नसल्याचे लक्षात आणून दिले.सुधाकरने त्यांना तुम्ही माझी मुलगी परत करा मी तुमचे काम करीन मला पैसे नकोत असे  युवराजानी सुचविल्याप्रमाणे  सांगितले .त्यावर त्यांनी आता पैसे विसरा. आधी काम नंतर मुलगी म्हणून रोखठोक  सांगितले .जर काही चालूगिरी कराल तर मुलीला उंच बिल्डिंगवरून फेकून देऊ म्हणून सांगितले.  

सुधाकरने युवराजांना ही त्यांची धमकी सांगितली.त्यांच्या अनेक ठिकाणांपैकी एक ठिकाण उंच बिल्डिंगमध्ये होते .बहुधा  तिथेच मुलगी असावी असा अंदाज युवराजांनी केला.शामरावाना त्यांनी तशी सूचना केली.त्याचबरोबर नक्की खात्री झाल्याशिवाय छापा मारू नका म्हणून सांगितले .

पुन्हा त्यांचा फोन आला तेव्हा मला मुलगी दाखवा ती जिवंत आहे याची मला खात्री पटली पाहिजे असे सुधाकरने युवराजानी सुचविल्याप्रमाणे सांगितले . व्हिडिओ कॉल करून ती जिवंत आहे याची खात्री पटविली . तो व्हिडीओ युवराजानी बारकाईने बघितला.त्या व्हिडीओत आजूबाजूचा परिसर मोकळा दिसत होता .त्यावरून गावाबाहेरच्या बंगल्यात चित्रण केले असावे असा अंदाज युवराजांनी केला.व्हिडिओतील त्या परिसराचा अभ्यास करून तो बंगला कुठे अाहे,व कोणता ते निश्चित करण्यात आले .त्या बंगल्याची टेहळणी  करून तिथे संशयास्पद हालचाली चालतात आणि तिथे लहान मुलगी आहे  याची खात्री करून घेण्यात आली.म्हणजेच त्यांनी मुलीला हलविले होते .आता धोका पत्करून छापा मारण्याची वेळ आली होती .

सर्व तयारीनिशी शामरावांनी चार ठिकाणी छापा मारला.त्या बंगल्यावर तर फारच सावधगिरीने छापा मारण्यात आला. इतक्या आकस्मिकपणे त्या टोळीला घेरण्यात आले की त्यांना काही हालचाल करण्यासाठी वेळ मिळाला नाही. गावाबाहेरच्या बंगल्यात अपेक्षेप्रमाणे सुधाकरची मुलगी व्यवस्थित मिळाली .ती इन वन पीस दगा फटक्याशिवाय जिवंत मिळणे सर्वात महत्त्वाचे होते.

सर्व टोळीला पकडल्यावर असे लक्षात आले की ही टोळी स्थानिक होती .ती एक जानेमाने गुंडांची टोळी होती.शेजारील राष्ट्राकडून पैसे घेऊन ते काम करीत होते.सुधाकरला ते एक छोटेसे पेन देणार होते.ते पेनही तिथे सापडले त्या पेनचे लॅबोरेटरीमध्ये निरीक्षण केल्यावर असे आढळून आले की त्या पेनमध्ये  महाविध्वंसक शक्ती भरलेली होती .स्विच ऑन करून ते पेन इंजिन रूममध्ये ठेवल्यावर स्फोट होऊन संपूर्ण पाणबुडी नष्ट झाली असती .त्याबरोबर सुधाकरचाही मृत्यू झाला असता.सुरुवातीला दिलेले पन्नास लाख त्या टोळीने अगोदरच पळविले होते .काम करून घेऊन सर्व पैसे स्वतःच लाटण्याचा त्या टोळीचा इरादा होता .याशिवाय त्यांना काम करण्यासाठी दिलेले पैसे त्या टोळीने ठेविले असतेच.

* युवराजांनी संदेश व शामराव यांच्या साहाय्याने त्या टोळीचा बेत उद्ध्वस्त केला. सुधाकरची मुलगीही व्यवस्थित घरी आली .*

* मात्र आंतरराष्ट्रीय हेरांची टोळी आपल्याला सापडेल व ती आपण उद्ध्वस्त करू या कल्पनेवर, या बेतावर, या इच्छेवर, पाणी पडले *

* अर्थात ताब्यात घेतलेल्या गुंडांकडून शामरावांना ती माहिती कदाचित मिळाली असती .*

(समाप्त)

२४/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel