(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .जिवंत किंवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )

युवराजानी विचार केला आणि संदेशला फोन लावला.मॅनेजर रमाकांत त्या दिवशी सकाळी साडेआठ ते साडेनऊ नक्की कुठे होता ते त्याने शोधले का? ते विचारले.

त्या दिवशी साडे नऊ वाजता जेव्हा सर्व कामगार मॉलसमोर जमले होते तेव्हा कुठून तरी घाई घाईने रमाकांत त्यांच्यात येउन मिसळला.सकाळी आठपर्यंत तो त्याच्या घरात होता .आठ ते साडेनऊ पर्यंत तो कुठे होता ते सांगता येइल असा त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता.

त्याला संधी होती .तो मॅनेजर असल्यामुळे राजेश समोर मुक्तपणे वावरू शकत होता .केव्हाही शटर उघडून तो आत गेला किंवा बाहेर गेला तरी त्याला कुणीही अडवणारे नव्हते .रामसिंगचा काटा मुद्दाम दूर करण्यात आला होता किंवा अनायासे दूर झाला होता .

सीसीटीव्ही बंद असणे. सीसीटीव्ही फुटेज नष्ट होणे.फाइलमधील कागद चोरणे.एकदा सेफ उघडल्यावर पैसेही गायब करणे .कदाचित पैसे गायब झाले ही  लोणकढी  असण्याचा संभव होता.

राजेशसोबत सरबत पिणे.  ग्लासमध्ये गुंगीचे औषध टाकणे बेशुद्धावस्थेत राजेशला फासावर लटकविणे.या सर्व गोष्टी रमाकांत सहज करू शकत होता .हे केल्यावर चटकन मॉल बाहेर पडून नंतर पुन्हा सर्वांबरोबर साळसुदपणे आत येणे हेही तो करू शकत होता . 

सत्य व असत्य यांची एकत्र भेसळ झाली होती .खरे काय व खोटे काय ते ओळखता येत नव्हते.

एवढ्यात संदेशचा एक महत्त्वाचा फोन आला .संदेशजवळ बोलणे झाल्यावर युवराजांच्या मनाची पक्की खात्री पटली.

त्यांनी शामरावांना फोन लावला. शामराव व ते रमाकांतला  भेटण्यासाठी मॉलवर गेले.

राजेशची केबीन सील केलेली होती .रमाकांतला बोलवून त्याच्यादेखत सील उघडून दोघेही रमाकांतसह आत शिरले.केबिनचा दरवाजा त्यांनी लावून घेतला .रमाकांतला समोरच्या खुर्चीवर बसवून ते दोघेही त्याच्याकडे एकटक बघत राहिले .अशीच पांच मिनिटे गेली.रमाकांत अत्यंत अस्वस्थ झाला होता .

त्याने चुळबुळ करत मी कामाला जाऊ का म्हणून विचारले .तो उभा राहात असता शामरावांनी त्याच्या खांद्यावर जोरात हात ठेवला.त्या हाताच्या दाबानेच रमाकांत खुर्चीत कोसळला .

तो खाली बसताच युवराजांनी बोलण्याला सुरुवात केली .

राजेशचा खून तूच केला आहेस.त्याने आत्महत्या केली असा पुरावा तू उभा केला आहेस.तुला खून करण्याचे कारणही होते व संधीही  होती.

तुम्ही माझ्यावर भलतेच आरोप करीत आहात असे काहीतरी रमाकांत बोलू लागला .

त्यावर शामरावांनी आपले दणकट पंजे त्याच्या खांद्यावर ठेवीत मुकाटय़ाने  खाली बस आणि निमूटपणे ऐकून घे असे दरडावले .तुला जुगाराचा नाद आहे .तू निरनिराळ्या जुगाराच्या स्क्मिसवर पैसे लावतोस.तुला कुणी तरी अमुक अमुक आकडा नक्की येईल असे सांगितल्यामुळे तू त्याच्यावर ऑफिसचे (मॉलचे पैसे)लावलेस. त्यात तुला फटका बसला .ऑफिसचे पैसे परत कसे करावे असा प्रश्न तुला पडला होता .राजेशचा तुझ्यावर विश्वास असल्यामुळे तू अगोदर जुगारासाठी परंतू वेगळे कारण सांगून  त्याच्याकडून कर्जाऊ  पैसे घेतले होतेस.

त्या पैशांमध्ये या वापरलेल्या पैशांची भर पडली. हिशेब तपासताना राजेशला या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या .राजेशने तुला सर्व पैसे ताबडतोब भर नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन.अशी चेतावणी दिली होती .खून केलास तो पैसे भरण्याचा  शेवटचा दिवस होता.

फुलांची पुडी देणाऱ्याकडून तू अगोदरच पुडी घेतलीस आणि ती गायब केलीस. हेतू असा होता की राजेश रामसिंगला फुलांची पुडी आणण्यासाठी पाठवील व तू जेव्हा मॉलमध्ये शिरशील तेव्हा तो गैरहजर असेल.त्याचप्रमाणे तू जेव्हा मॉलमधून बाहेर पडशील तेव्हा रामसिंग तिथे नसावा म्हणून त्याची सायकल पंक्चर करण्याची व्यवस्था तू केली होतीस . तू त्या दिवशी पावणे नऊ वाजता शटर वर करुन एक छोटी ब्रीफ केस घेऊन आत आलास.पैसे आणल्याचे नाटक केलेस.राजेशचे आवडते लिंबू सरबत बनवलेस.त्याच्या नकळत त्यात गुंगीचे औषध टाकलेस.तो अर्धवट शुद्धीत असताना त्याला फासावर लटकवलेस.ग्लास बाहेरून रुमालाने स्वच्छ पुसून ठेवलेस.सेफमधून कर्जाचे कागद काढून घेतलेस.ते घेताना कागद खाली पडले .ते तसेच घाई घाईने तू फाईलमध्ये ठेवलेस.सेफवर फाइलवर ऑफिसमध्ये सर्वत्र तुझ्या हाताचे ठसे होते. परंतु त्याची तुला काळजी नव्हती .तू तर ऑफिसचा मॅनेजर होतास.ठसे असणे स्वाभाविक होते .

सेफमध्ये दोन लाख रुपये नव्हते. ते असल्याची तू उगीचच आवई उठविली होतीस.

परंतु तुझ्या हातून काही चुका झाल्या .

तू शटर वर करून पावणे नऊ वाजता आत गेलास आणि पुन्हा सव्वा नऊ वाजता बाहेर आलास हे कुणी पाहिले नसेल असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे. 

तुला आत जाताना व बाहेर येताना पाहणारे साक्षीदार  आमच्या जवळ आहेत.मॉलसमोरच्या दुकानदाराने त्या दिवशी दुकान लवकर उघडले होते त्याने तुला आत जाताना व बाहेर येताना पाहिले आहे .मॉलसमोर तळमजल्याला सर्व दुकाने आहेत परंतु वरच्या मजल्यावर ऑफिसेस व रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहेत.मॉलसमोरील पहिल्या मजल्यावरील गच्चीमध्ये एक गावाहून आलेला पाहुणा रस्त्यावरील गंमत पाहात उभा होता त्याने तुला आत जाताना व बाहेर येताना पाहिले आहे. तेव्हा तुला काहीही लपविता येणार नाही .

तू ज्या दुकानातून गुंगीचे औषध घेतलेस तो दुकानदार तुला ओळखतो.

तुझा जुगाराचा नाद त्यात गुंतविलेले पैसे व त्याच वेळी राजेशकडून घेतलेले कर्ज यांचा परस्पर संबंध कोणाच्याही सहज लक्षात येईल .

खुनाच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असणे ,योगेश व राजेश यांचे बोलणे असणारा सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा भाग गायब होणे .हे तुझ्याशिवाय दुसरे कुणी केले असण्याचा संभव दिसत नाही .कारण सर्व चाव्या मॅनेजर म्हणून तुझ्याच ताब्यात असतात .

राजेशकडून घेतलेल्या कर्जाचा दस्तऐवज जरी फाइलमधून काढून घेतला असलास तरी त्याची  फोटोकॉपी राजेशच्या घरी सुरक्षित आहे . 

राजेशने लिहिलेले तथाकथित मृत्यूपूर्व पत्र तूच लिहिलेले आहेस हे आम्ही हस्ताक्षरतज्ञ्याच्या साक्षीतून सिद्ध करू शकतो .

आम्ही राजेशच्या फॅमिली डॉक्टरला भेटलो आहोत राजेशला काळजी करण्यासारखा  कसलाही मानसिक किंवा शारीरिक आजार नव्हता. याची त्याने आम्हाला लेखी ग्वाही दिली आहे. पत्रात दिलेले आत्महत्येचे कारण फुसके आहे ।

तू जर गुन्हा मान्य केला तर तुझी शिक्षा कमी होण्याचा संभव राहील .तेव्हा तुला आता काय करायचे आहे ते आम्हाला सांग.वाटल्यास तू आपल्या वकिलाचा सल्ला घेऊ शकतोस

युवराजांच्या भडीमारापुढे रमाकांत क्षणोक्षणी हतबल होत जाताना दिसत होता.

त्याने एकदा पळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला परंतु शामराव त्याच्या शेजारीच त्याचा हात घट्ट धरून बसले होते .

* त्याने आपला गुन्हा मान्य केला .*

*खोटे नाटे सांगून रामसिंग व योगेश यांना अडकवण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला.*

*शामरावानी पोलिसाला हाक मारली व त्याला बेड्या घालून व्हॅनमध्ये बसविण्यास सांगितले.*

*यशस्वीरित्या केस सोडविल्याचे समाधान युवराजांच्या चेहऱ्यावर दिसत होते.*

(समाप्त )

१५/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel