( ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे जिवंत वा मृत व्यक्तींशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )

युवराजांनी बांधलेला अंदाज खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी फार मोठी मेहनत व खर्च करावा लागणार होता .डोंगराच्या, नदीच्या बाजूला सतत  लक्ष ठेवावे लागणार होते.नदीतून स्मगलिंग होते व तो माल चोरदरवाज्याने गुहेमध्ये साठविला जात असावा असा युवराजांचा एक केवळ अंदाज होता.ड्रग्ज,  हत्यारे ,आतंकवादी हमला, कदाचित स्त्रियांचा व्यापार, यातील एक किंवा अनेक गोष्टींसाठी गुहा डोंगर नदी यांचा वापर केला जात आहे, हे त्या लोकांना कळू न देता सिद्ध होणे आवश्यक होते .तरच सरकारतर्फे त्याविरुद्ध काही कार्यवाही होऊ शकली असती.त्याचप्रमाणे डोंगरांच्या पुढच्या बाजूने चोरदरवाजे आहेत का?लेणी आहेत का?याचाही शोध घेणे आवश्यक होते .

तूर्त संदेशच्या गुप्तचरांनी चोवीस तास डोंगराच्या मागच्या बाजूला लक्ष ठेवावे असे ठरविण्यात आले .विशेषत: रात्रीच्या वेळी या सर्व गोष्टी होत असाव्यात.रात्री नजर ठेवणे आवश्यक होते .झाडावर बसून इन्फ्रारेड कॅमेराच्या सहाय्याने सर्व हालचालींचे चित्रण होणे आवश्यक होते. त्यासाठी तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली .हे चित्रण दूरवरून कुणालाही संशय न येता केले जाणार होते. यातून काही सकारात्मक गोष्टी हाती लागल्या तरच सरकार दरबारी जाऊन त्याविरुद्ध अॅक्शन घेणे शक्य होणार होते.या बाबतीतत कमालीची गुप्तताही आवश्यक होती.

सुधांशूने जुने रेकॉर्ड पाहून त्या डोंगरात लेणी असण्याची शक्यता नव्वद टक्के आहे त्यासाठी उत्खनन करणे गरजेचे आहे असे सांगितले .वरिष्ठ स्तरावर सुधांशूने उत्खनन करण्यासाठी परवानगी व पैशाची तजवीज करण्याचे प्रयत्न चालविले .

शामरावांनी वरिष्ठस्तरावर बोलणी करून पुरेसे पोलीस दल कार्यवाहीसाठी उपलब्ध होईल याची तजवीज करून ठेवली .

युवराज व शामराव यांनी शासनामध्ये वरिष्ठ स्तरावर जाऊन जर युवराजांचा अंदाज खरा ठरला तर त्यासाठी योग्य अॅक्शन घेतली जाईल याची तजवीज करून ठेवली .

सुधांशू युवराज व शामराव यांनी सर्व हालचाली योग्य दिशेने केल्या होत्या. या सर्व हालचाली अत्यंत गुप्त पद्धतीने केल्या होत्या .शासनामध्येही देशशत्रूंचे लोक असणे अशक्य नव्हते. आता संदेशच्या गुप्तचरांकडून काय माहिती उपलब्ध होते यावर सर्व काही अवलंबून होते.तीन दिवस काहीच हालचाल एकाही गुप्तचराला आढळली नाही .आपले सर्व अंदाज चुकतात की काय असे युवराज यांना वाटू लागले होते .साप साप म्हणून अापण भुई तर धोपटीत नाही ना अशी शंका त्याना येऊ लागली होती.

चौथ्या दिवशी रात्री दोन वाजता नदीतून एक मोटरबोट डोंगराच्या मागच्या बाजूला आली.त्यातून काही लोक उतरले आणि त्यांनी काही पेट्या डोंगराकडे नेल्या.नंतर ते लोक पुन्हा मोटार बोटीमध्ये बसून निघून गेले .त्याच्या दुसर्‍या  दिवशी पुन्हा एक मोटरबोट आली त्यातून काही लोक आले व त्यांनी डोंगरातून काही पेट्या मोटार बोटीतून नेल्या.या सर्वांचे चित्रण पाहता मोटार बोटीतून आलेल्या पेट्या व मोटार बोटीतून नेलेल्या पेट्या या वेगवेगळ्या होत्या असे आढळून आले.हे चित्रण पाहिल्यावर काहीतरी बेकायदेशीर गोष्टी तिथे होत असाव्यात असा सहज अंदाज करता येत होता . 

हे चित्रण योग्य त्या व्यक्तींना सावधगिरी  ठेवून गुप्तता राखून  दाखविल्यावर वरून योग्य ते आदेश सुटले . चित्रणाच्या आधारावर तपास केल्यावर  डोंगराच्या नदीच्या बाजूला एक गुप्त दार आढळून आले.हे दार झुडपातून आत गेल्यावर एका डोंगर कड्यांमध्ये होते.दार पोलादी होते परंतु बाहेरून ते डोंगराचा एक भाग आहे असे वाटत होते .काळजीपूर्वक जवळून पाहिल्यावर ते दार ओळखता येत होते.गुहेतील गोदामातील माल केव्हाही ताब्यात घेता आला असता .ते काम करणार्‍या  लोकांना पकडणे,त्यांची साखळी लक्षात येणे.,ती टोळी उद्ध्वस्त होणे ,नामशेष होणे ,जास्त गरजेचे होते.त्यासाठी नदीमध्ये दोन मोटारबोटी सज्ज ठेवण्यात आल्या.मोटारबोटी ठेवण्याचा उद्देश गरज पडल्यास, त्यांना शंका येऊन त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केल्यास  त्यांचा पाठलाग करता यावा हा होता. त्यामध्ये अर्थातच सशस्र सैनिक होते.आता सरकारी गुप्तचर यंत्रणा कामाला लागली होती .मोटार बोटीतून आलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आले .त्यांच्या मार्फत त्या संपूर्ण साखळीतील सर्व लोक  ताब्यात घेण्यात आले .त्यांच्यावर खटले चालविण्यात आले .कमी जास्त मुदतीच्या त्यांना शिक्षा झाल्या.

ज्यावेळी गुहेतील दरवाजा उघडून तपास करणारे आत गेले त्यावेळी ते आतील सुविधा पाहून स्तिमित झाले.गुहेत खेळती हवा होती.उष्णता नियंत्रण केलेले होते .दहा लोकांची आरामशीर राहण्याची व्यवस्था होती .त्यांच्यासाठी आवश्यक तो दहा दिवस आरामशीरपणे पुरेल इतका अन्न पुरवठा तिथे अस्तित्वात होता .त्यासाठी भूगर्भात जनरेटरची व्यवस्था केलेली होती .त्याचा आवाज बाहेर येऊ नये अशी व्यवस्था होती .गुहेत ड्रग्ज,स्फोटके व  शस्त्रास्त्रे आढळून आली .त्यांचा पुरवठा करून देशाची संरक्षण यंत्रणा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात होता.या सामुग्रीचा वापर करून  देशविघातक कृत्ये केली जात असत .रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त करणे,रेल्वे बसेस मेट्रो यांमध्ये स्फोट घडवून आणणे, अशा गोष्टींसाठी शस्त्रास्त्रे स्फोटके यांचा वापर  देशद्रोह्यांकडून केला जात होता असे आढळून आले .याच्या पाठीमागे स्थानिक देशद्रोह्यांप्रमाणेच शत्रूराष्ट्राचाही हात होता.देशाचा विकास व अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचे काम याच्या मार्फत होत होते.एक फार मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट सापडले .

ही नदी आपल्या देशातून त्याचप्रमाणे शत्रुराष्ट्रातून वहात होती.त्यामुळे शस्त्रास्त्रे ड्रग्ज आतंकवादी यांची देशात आयात करणे सहज शक्य होत असे.देशात अनेक लोकांची धरपकड झाली .त्यामध्ये राजकारणी व शासनातीलही मंडळी होती. गुप्तचर खात्याला एक फार मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे समाधान व श्रेय मिळाले.

सुधांशूने पुरेशी आर्थिक मदत पुराणवस्तू संशोधन खात्याकडून मिळवून उत्खनन केले .त्यासाठी तंबू टाकून पुराणवस्तू संशोधन खात्यातील मंडळी तिथे वास्तव्य करीत होती .भुतांच्या अफवेमुळे स्थानिक मजूर सुरुवातीला मिळत नव्हते.दुसरीकडून मजूर आणून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली .हळूहळू स्थानिक मजूरही येऊ लागले.उत्खननानंतर तिथे दहा लेणी सापडली.त्यामध्ये उल्लेखनीय तीन मंदिरे होती.एक कृष्ण मंदिर दुसरे विष्णू मंदिर व तिसरे राम मंदिर .

कृष्ण मंदिरात कृष्ण व राधा यांच्या अत्यंत सुबक रेखीव मूर्ती होत्या .भव्य सभागृह होते .त्यामध्ये जवळजवळ एक हजार लोक व्यवस्थित बसू शकतील अशी व्यवस्था होती .सभागृहात सर्व बाजूंनी व मंदिराच्या बाहेरच्या बाजूनेही कृष्ण चरित्रातील रेखीव शिल्पे होती .

विष्णू मंदिरात शेषशाही भगवान व माता लक्ष्मी यांच्या मूर्ती होत्या.या मंदिरातील सभागृहात सर्व बाजूनी व मंदिराच्या बाहेरही विष्णूच्या निरनिराळ्या अवतारातील शिल्पमालिका होत्या .

राम मंदिरात राम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्ती व भव्य सभागृह होते .येथेही शिल्पांची रेलचेल होती .येथे संपूर्ण रामायण शिल्पकलेच्या माध्यमातून मांडण्यात आले होते .

या तीन मंदिराशिवाय शिव व शक्ती यांचीही निरनिराळ्या स्वरूपातील मंदिरे होती .अजिंठा वेरूळ खजुराहो याप्रमाणेच हा लेण्यांचा समूह जगप्रसिद्ध होईल असा विश्वास सर्वांना वाटत होता .

या उत्खननातून एक भुयार सापडले.शिव मंदिरातील पिंडी सरकवल्यावर खाली पायऱ्या व नंतर भुयार होते.ते भुयार नदीपर्यंत गेले होते 

उत्खननाचे सर्व काम होण्यासाठी जवळजवळ पाच वर्षे लागली .त्यानंतरही पुढे  बारीक सारीक काम चालू होते .

या दोन गावांना शहरांना कृष्णनगर व रामनगर अशी नावे का होती ते आता लक्षात आले .या मंदिर समूहावरून  या दोन गावांना ही नावे देण्यात आली  असावीत .वृद्ध मंडळी या डोंगरात लेणी आहेत मंदिरे आहेत असे सांगत असत ते बरोबर होते.अर्थात त्यांनीही ते त्यांच्या पूर्वजांकडून ऐकलेले होते .पिढ्यान पिढ्या चालत आलेली आख्यायिका सत्य होती असे आढळून आले .

रामनगर कृष्णनगर ही एके काळी लहान असलेली शहरे आता मोठी झाली आहेत .नदीतून रस्त्यावरून वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे .आता रात्री कोणत्याही प्रहरात कुठल्याही रस्त्याने बिनधास्तपणे मंडळी जातात . भुतांची अख्यायिका आता केवळ आख्यायिकाच  राहिली आहे.जवळच विमानतळ झाला आहे.देशातील व परदेशातील मंडळी लेणी पाहण्यासाठी आवर्जून येतात .पर्यटन क्षेत्रातील हे एक महत्त्वाचे स्थळ झाले आहे .लेणी पाहण्यासाठी लोकांच्या असलेल्या ओघामुळे हॉटेलिंग व्यवसायही भरभराटीला आला आहे.एकूणच या प्रदेशात समृद्धी आली आहे .रामनगर व कृष्णनगर या दोहोंमधील जागा आता बंगले अनेक मजली इमारती कारखाने हॉटेल्स रेस्टॉरंट्स यांनी व्यापली जात आहे . जमिनीला सोन्याचा भाव आला आहे .हळूहळू या दोन शहरांचे एकच शहर होईल अशी स्थिती आहे .त्याला रामकृष्णनगर हे नाव शोभून दिसेल.

देशद्रोही मंडळींना देशविघातक कृत्यांसाठी दोन राष्ट्रांना जोडणारी नदी व जवळचा डोंगर ही उत्कृष्ट जागा सापडली.त्यांना गुहा खोदण्यासाठी किंवा असलेली गुहा मोठी करून आपल्याला सुव्यवस्थित करून घेण्यासाठी व आपले बेकायदेशीर व देशविघातक व्यवहार करण्यासाठी लोकांना दूर ठेवणे आवश्यक होते .त्यासाठी त्यांनी भुतांचे अस्तित्व ही कल्पना पुरेपूर राबविली व यशस्वीही करून दाखविली.

जर संदेश त्याच्या वडिलांच्या मित्राला माधवरावांना भेटण्यासाठी आला नसता ,जरी आला असता तरी त्याच्याबरोबर युवराज आले नसते, जरी युवराज  आले असते परंतु माधवरावांचे  रामनगर येथील मित्र आजारी पडले नसते आणि माधवरावांच्या पत्नीने तुम्ही हायवेने जाणार आहातना असा युवराजांच्या देखत उल्लेख केला नसता व युवराजानी कुतूहल दाखवून लांबून जाण्याचे कारण भुताचे अस्तित्व याबद्दल माहिती करून घेतली नसती व   जादा कुतूहल दाखवत डोंगराची संदेशसह पाहणी केली नसती,तर कदाचित जैसे थे परिस्थिती अजूनही राहिली असती .रामनगर व कृष्णनगर यांचा विकास झाला नसता.लोक अजूनही रात्री डायरेक्ट रस्त्यावर, डोंगरा सभोवतालच्या रस्त्यावर फिरकले नसते.भुतांची अाख्यायिका तशीच चालू राहिली असती.देशद्रोह्यांच्या देशविघातक कारवाया व शत्रूराष्ट्राच्या कारवाया कदाचित अजूनही तशाच चालू राहिल्या असत्या!!!

सुधांशूने उत्खननाचा आग्रह धरला.आपल्या वरिष्ठांना गरज पटवून दिली .या प्रॉजेक्टचा प्रमुख म्हणून प्रोजेक्ट यशस्वी करून दाखविले .

*सुधांशूला बढती मिळाली पुराणवस्तूसंशोधन खात्यात तो असिस्टंट डायरेक्टर झाला .*

युवराजांचा चाणाक्षपणा, संशयी वृत्ती,परिस्थितीची पाहणी करून योग्य निष्कर्ष काढण्याची क्षमता,काढलेले निष्कर्ष योग्य व्यक्तींना पटवून देवून त्याच्या तार्किक शेवटापर्यंत त्यांना नेण्याचे कौशल्य ,त्यासाठी हवे तेवढे परिश्रम करण्याची इच्छा ,या सर्वामुळेच हे एक देशकार्य शक्य झाले .देशविघातक रॅकेट उद्ध्वस्त झाले .त्या परिसराचा विकास झाला .देशाचा प्राचीन वारसा असलेला एक खजिना सर्व जगाला  उपलब्ध झाला .

*या सर्व कार्याची पावती म्हणून,फूल ना फुलाची पाकळी म्हणून  युवराजांना दहा लाख रुपये मानधन देण्यात आले.*

*देशासाठी केलेल्या कामासाठी  पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.*

*जे जे जेव्हा जेव्हा जसे जसे व्हायचे असते ते ते तेव्हा तेव्हा तसे तसे होत असते हेच खरे* 

( समाप्त)

३/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel