(ही गोष्ट काल्पनिक आहे प्रत्यक्षात कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

कुणाला काय आवडेल ते सांगता येणे मोठे कठीण  आहे.ती लख्ख गोरी होती.उंची बेताची, ठेंगूमध्ये गणली गेली असती. तिचे केस काळेभोर आणि दाट होते.डोळे बारीक परंतु पाणीदार होते.ती कधी दोन शेपटे घालीत असे.तर कधी एकच घाली.बोलता बोलता लडिवाळपणे मान वेळावण्याची तिची पद्धत एखाद्याला आवडली असती तर एखाद्याला तो थिल्लरपणा बालिशपणा वाटला असता . बोलता बोलता शेपटा डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर व उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर फेकण्याची तिची स्टाइल पोरकटपणाची वाटत असे.परंतु शांतारामला तीच स्टाइल आवडली. त्यानेच तो घायाळ झाला. ती थोडे पोक काढून चालत असे .  तिचा आवाज थोडा किनेरा होता.काही असो शांतारामला ती आवडली एवढे मात्र खरे.

एक दिवस  दोघे मित्र सहज फिरता फिरता शांताच्या बंगल्यावरून जात होते .अविनाश शांतारामला म्हणाला हा तुझ्या शांताचा बंगला .आत जावून दादासाहेबांशी ओळख करून घ्यायची का?एकदा दादासाहेबांशी ओळख झाली की शांताशी ओळख व्हायला वेळ लागणार नाही . एवढ्यात मागून सर म्हणून हाक आली .सायकलवरून शांता येत होती .तिने दोघांनाही बंगल्यात येण्याचा आग्रह केला .शेवटी तिच्या आग्रहास्तव दोघेही बंगल्यात तिच्याकडे गेले . सुदैवाने तिचे वडील घरी होते .त्यांचा सराफीचा व्यवसाय होता .बाजारपेठेत त्यांचे सोन्या चांदीचे दुकान होते.आज मंगळवारी दुकानाला सुटी असल्यामुळे ते घरीच होते.

अविनाशला ते पहिल्यापासून ओळखत होते . त्याची पत्नी,नवीन बाळ, इत्यादींची त्यानी चौकशी केली.ते चांगलेच बोलघेवडे आणि गोड गोड बोलणारे होते. कदाचित त्यांच्या सराफीचा व्यवसायामुळेही तसे असेल,किंवा ते स्वभावानेच तसे असतील . अविनाशची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली आहे हे त्यांना माहीत होते .अविनाशला ते चांगले ओळखतात हेही  शांतारामच्या लक्षात आले .नंतर त्यांनी शांतारामची चौकशी केली .शांतारामचे नाव ऐकून ते गालातल्या गालात हसले असे वाटले.कदाचित शांता व शांताराम या योगायोगाची त्यांना गंमत वाटली असावी .सध्या राहतो कुठे? करतो काय ?आई वडील  कुठे राहतात? घर कुठे?  भावंडे किती? वडील काय करतात? इत्यादी सर्व माहिती बोलता बोलता त्याच्याकडून काढून घेतली .जणू काही त्यांच्या मुलीसाठी ते एखाद्या मुलाची साग्रसंगीत चौकशी करीत आहेत  असा भास होत होता .नंतर चहा पोहे झाले . गप्पा झाल्या आणि दोघांनीही त्यांचा निरोप घेतला . त्यांच्या आविर्भावावरून त्यांना अगोदरच आपल्याबद्दल माहिती आहे आपल्याला विचारून ते त्याबद्दल खात्री करून घेत आहेत असाही संशय शांतारामला आला .

निघता निघता शांतारामला एक कल्पना सुचली.यांचा एवढा मोठा बंगला आहे घरात ही तीनच माणसे राहतात . आई वडील व शांता .मुलगा शिक्षणासाठी परदेशी असतो .यांच्या मनात असेल तर आपल्याला बगल्यातील एखादी खोली भाड्याने द्यायला हरकत नाही.तो शांताच्या वडिलांना दादासाहेबांना  म्हणाला,  माझी अविनाशकडे दोन तीन महिन्यांसाठी रहाण्याची सोय झाली आहे.परंतू वहिनी माहेराहून आल्या की मला कुठेतरी सोय पाहावी लागेल.तुमच्या ओळखीत मला कुठे राहायला जागा असली तर सांगा .मी एकटाच आहे मला एखादी खोली सुद्धा पुरेल .

त्यावर दादासाहेब म्हणाले आमचे आऊटहाऊस रिकामेच आहे. नोकरांसाठी मोठ्या हौसेने मी आऊटहाऊस बांधले.परंतु येथे मनासारखे नोकर मिळत नाहीत .त्यामुळे ते रिकामेच आहे .तुम्ही पहा. तुम्हाला पसंत असेल तर तिथे राहायला यायला हरकत नाही.तुम्हाला काही सोयी हव्या असल्यास त्या मी करून देईन.शांताही दादासाहेबांच्या शेजारीच उभी होती. दादानी शांतारामला आउटहाऊसमध्ये जागा देण्याचे कबूल केले. किंबहुना त्याला त्यांनी राहायला येण्याचे निमंत्रण दिले हे ऐकून तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता .शांतारामला तर उड्या माराव्यात असे वाटत होते.

आपण सहज टाकलेला खडा इतका नेमक्या जागी बसेल असे त्याला वाटले नव्हते.त्याचा राहण्याच्या जागेचा प्रश्न तर सुटलाच होता परंतु तो त्याच्या आवडत्या शांताच्या घरी  तिच्या शेजारी जवळ राहायला येणार होता.  दादासाहेबांनी शांतासाठी स्थळ म्हणून आपल्याला हेरले तर नसेल ,असे त्याला वाटले .तसे असेल तर त्याचा आनंद गगनात मावणारा नव्हता .

आऊट हाऊसची साफसफाई करून घेतल्यानंतर दादासाहेबांना आवश्यक वाटणाऱ्या   सोयी केल्यानंतर  शांतारामला दादासाहेबांनी निरोप पाठवला.तुम्ही या प्रत्यक्ष बघा आणखी काही सोयी हव्या असल्यास करून देईन आणि नंतरच राहयला या.

शांताराम आऊट हाऊसचे  बदलते रूप बघण्यासाठी आला आणि आऊट हाऊस चकाचक झालेले पाहून स्तिमित झाला . 

त्याने आउट हाउस सुरुवातीला पाहिले होते त्यामुळे तेच का हे आऊट हाऊस म्हणून तो चकित झाला होता .

आऊट हाऊस हा एक स्वयंपूर्ण  ब्लॉक होता .फक्त त्यातील खोल्या एका मागून एक अश्या  आगगाडीच्या डब्यासारख्या होत्या.एवढा दोष सोडला तर त्या ब्लॉकमध्ये काहीही नाव ठेवण्यासारखे नव्हते .दिवाणखाना शयनगृह स्वयंपाकघर व स्वच्छतागृह  अशी रचना होती .दिवाणखाना स्वयंपाकघर याला स्वतंत्र दरवाजे होते .

शांताराम जवळ अक्षरशः कपडे पुस्तके याशिवाय काहीही नव्हते .कॉट, गादी, टेबल, खुर्ची, पाहुणे आले तर बसण्यासाठी सोफा,खुर्ची , वगैरे काहीही नव्हते.  दादासाहेबांचा निरोप आल्यावर त्याचे अविनाशशी बोलणेही झाले होते.तो अविनाशला म्हणाला होता आता आपल्याला बाजारात जाऊन बरीच खरेदी करावी लागणार .दादासाहेबांच्या बाह्यगृहामध्ये रहायला गेल्यानंतर तिथे काहीच नसणार.

दादासाहेबांनी बाह्य़गृह व्यवस्थित सजविले होते.   

दिवाणखान्यात म्हणजे बाहेरच्या खोलीत दोन कपाटे, टेबल, खुर्ची ,सोफा आणून ठेवला होता एवढेच नव्हे तर खाली त्यानी एक गालीचाही घातला होता.

शयनगृहात कॉट, गादी,  एक कपाट, ड्रेसिंग टेबल,ठेवले होते .  

स्वयंपाकात एक शेगडी व गॅस सिलिंडर आणि काही भांडी त्यांनी ठेवली होती.

हे सर्व पाहून शांताराम म्हणाला अहो तुम्ही हे काय केले आहे ?या सर्वांचे कितीतरी पैसे होतील . एवढे पैसे एकदम मी तुम्हाला देऊ शकणार नाही . मी तुमच्याजवळ  राहण्यासाठी फक्त एक खोली मागितली होती.इथे तुम्ही मला फर्निश्ड ब्लॉक दिला आहे .

त्यावर मंद स्मित करीत दादासाहेब म्हणाले मला माहीत होते की तुमच्या जवळ या गोष्टी नसणार.त्या तुम्हाला इथे खरेदी कराव्या लागणार किंवा तुमच्या घरून आणाव्या  लागणार .त्यापेक्षा मी विचार असा केला की तुम्हाला रिकामा ब्लॉक देण्याऐवजी फर्निश्ड ब्लॉक द्यावा. तुम्ही मला या सर्व सामानाचे पैसे देण्याचे कारण नाही.हे सर्व सामान माझ्या घरातील आहे ते वापरलेले आहे .तुम्हाला जे भाडे आकारणार आहे त्यात याचे भाडे समाविष्ट असेल .

शांतारामने बोलता बोलता किती भाडे द्यावे लागेल ते विचारले .त्यावर त्यांनी पन्नास रुपये दरमहा असे उत्तर दिले .जरी साठ वर्षांपूर्वीचा काळ घेतला,खेडे वजा शहर घेतले,तरीही पन्नास रुपये भाडे कमी वाटत होते .त्याने निदान पंचाहत्तर रुपयांपर्यंत तरी यांचे भाडे असले पाहिजे असा मनात विचार केला. दादासाहेब आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत हे त्याच्या लक्षात आले .

अविनाशच्या घरी परत जाताना अविनाश शांतारामला  म्हणाला एका माणसाची मजा आहे बुवा .

(क्रमशः)

१४/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel