(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

~ १~

कॅप्टन जगदाळे ही एक मोठी असामी होती .त्यांचे वय जेमतेम पस्तीस होते .त्यांचे वडलोपार्जित व्यवसाय  निरनिराळ्या क्षेत्रात पसरलेले होते. कारखाने, ट्रान्सपोर्ट, जमीनजुमला,बांधकाम, सर्वत्र त्यांचा संचार होता. जगदाळे अॅण्ड कंपनी ही मुख्य कंपनी होती.जगदाळे ट्रान्सपोर्ट, जगदाळे कन्स्ट्रक्शन,जगदाळे हाऊसिंग, जगदाळे कॅनिंग,जगदाळे फार्मिंग,जगदाळे अॅग्री प्रोडक्ट्स ,जगदाळे प्रोसेसिंग ,अशा अनेक उपकंपन्या होत्या . वडिलोपार्जित व्यवसाय,खानदानी श्रीमंती व रुबाब ते व्यवस्थित सांभाळीत होते .एवढेच नव्हे तर ते त्याचा विस्तारही करीत होते .ते नेहमीच  कार्यमग्न असत .

त्यांचा अजून विवाह झाला नव्हता .जगदाळे लहान असताना दुर्दैवाने त्यांच्या आई वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता.सुरुवातीला त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला ट्रस्ट सर्व व्यवहार सांभाळत असे. कॅप्टन जगदाळे सज्ञान  होताच मृत्यूपत्राप्रमाणे सर्व सूत्रे त्यांच्याकडे  सोपविण्यात आली होती. लहान वयातच त्यांच्यावर जबाबदारी पडली होती. त्यांना कॅप्टन ही उपाधी कशी लागली कांही माहित नाही .ते कधीही सैन्यात गेले नव्हते. कुठल्याही खेळाशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध आला नव्हता.तरीही ते सर्वत्र कॅप्टन जगदाळे म्हणूनच ओळखले जात असत. 

त्यांचा विवाह न होण्याचे कारण दोन्ही  बाजूनी येणारा नकार हे होते.ते ज्यांना पसंत करीत त्या त्यांना नकार देत असत .तर ज्या मुली , त्यांना (कोणत्याही कारणाने असो, बहुधा श्रीमंती हेच कारण असावे)पसंत करीत असत, त्यांना ते नकार देत.  कितीही श्रीमंत हुषार असले तरी त्यांचा चेहरा विचित्र होता.थोडक्यात ते कुरुप होते.बसके व फताडे नाक,मोठे सुपासारखे कान ,बटबटीत बाहेर डोकावणारे डोळे,खप्पड गाल, अरुंद कपाळपट्टी, आखूड मान, डोक्यावरील राठ केस,केसाळ शरीर, पुढे आलेले दात ,केसाळ भुवया,काळा वर्ण,  यामुळे त्याचे स्त्रियांवर,स्त्रियांवरच काय कुणावरही सुरुवातीला  मुळीच इंप्रेशन पडत नसे .मुलींच्या स्त्रियांच्या मनात, त्यांच्याबद्दल आकर्षण तर सोडाच तिटकारा विरोध  विकर्षण निर्माण होत असे.पुरुषांनाही त्यांचा चेहरा पसंत पडत नसे .काळोखात अकस्मात ते समोर आले तर दचकायला होत असे.  वरील प्रकारचे दिसण्यातील दोष कुठेना कुठे आढळतात पण सर्व एकत्र असणे हे थोडे दुर्मिळच.त्यांच्या बोलण्यातून आणि वर्तनातून त्यांचे गुण कळत असत.त्यांची छाप पडत असे. कितीही समर्थ व्यवस्थापक नेमलेले असले, व्यवसायाचे कितीही विकेंद्रीकरण केलेले असले ,तरी  त्यांनाच लक्ष घालावे लागे. अंतिम निर्णयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. विविध उद्योग ते समर्थपणे हाताळत होते .

ते श्रीमंत तर होतेच पण बुद्धिमान व वाक्चतुरही होते.त्यांचे वाचन अफाट होते .त्यांचा मित्र परिवार दांडगा होता .साध्या कामगारापासून ते एखाद्या सीईओपर्यंत सर्वांशी  ते तेवढ्याच आस्थेने व  प्रेमाने वागत असत.ते कसेही दिसत असले तरी सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती व प्रेम होते .त्यांच्याशी एकदा संभाषणाला सुरुवात केल्यावर त्यांची विलक्षण छाप पडत असे.त्यांच्या वाक्चातुर्याने ऐकणारे मंत्रमुग्ध होत असत .ते दिसायला  ओबडधोबड असले तरी त्यांचे हृदय कनवाळू होते .

त्यांच्या सहवासात स्त्रिया या ना त्या कारणाने येत असत.त्या गप्पा मारीत. हास्यविनोद करीत.त्यांच्या निरनिराळ्या ऑफिसमध्ये,व्यवसायात , मुली काम करीत होत्या. मुलींचा सुरुवातीचा मानसिक विरोध, सहवासाने मावळत असे.त्यांच्या स्वभावाचे पैलू सर्वांच्या मनात आदर निर्माण करीत . त्यांना पाठिमागे विनोदाने गोरीला, अस्वल,अशा उपाधी दिल्या जात असत.लोक आपल्या पाठीमागे चांगले व वाईट काय बोलतात ते त्यांनाही माहीत होते .त्याच्याकडे ते फारसे लक्ष देत नसत. त्यांना बघितल्यावर अनोळखी इसमाला प्रथम दचकायला होत असे.ओळख झाल्यावर त्यांच्या गुणांची मोहिनी पडत असे.अजूनपर्यंत तरी त्यांचे लग्न झाले नव्हतै. कॅप्टन जगदाळेनी मागणीच घातली नव्हती, की मागणी घातली तरी कुणी त्यांच्या रुपाकडे बघून होकार दिला नव्हता, माहीत नाही .ते अविवाहित होते एवढे मात्र खरे .

त्यांचे रूप सोडले तर स्थळ सर्वदृष्टीने आकर्षक होते. योग जुळून येत नव्हता एवढे मात्र खरे.

~२~

सदानंद व सुनिता ही एक लोकांना फसवणारी टपोरी जोडी होती.समसमा संयोग की जाहला अशी ती जोडी होती .याची टोपी त्याला घाल.त्याची टोपी याला घाल. ते जमले नाही तर एखाद्याला आपल्या जवळची टोपी घाल.असे त्यांचे उद्योग चाललेले असत.त्यांचा उत्पन्न मिळवण्याचा फसवणूक हा मार्ग होता.कायद्याच्या कचाट्यात न येता हे सर्व कसे साधावे याची हातोटी त्यांना जमली होती.अजून तरी ते कुठे  सापडले नव्हते.  सदानंदने एका प्रशस्त जागेत अलिशान ऑफिस थाटले होते.हाताखाली त्याने बऱाच स्टाफ नेमला होता.एखाद्या यशस्वी  व्यावसायिकाचा आव  त्याने सुरेख आणला होता.  सदानंद,साहेब व सुनिता त्याची पीए होती.ऑफिसमध्ये येणारा कुणीही ऑफिसचा थाट बघून गार होत असे.

एवढे ऑफिस, एवढा खर्च, एवढी मोठी जागा, म्हणजे सर्व कांही बरोबरच असणार असे प्रत्येकाला, निदान काही जणांना तरी वाटे .सदानंदच्या जिभेवर साखर पेरलेली होती .मधात घोळून घोळून तो आपली योजना अभ्यागताच्या गळ्यात उतरवत असे.एखाद्याचा लचका तोडणे जमले नाही तर टक्केवारीवर भागवावे अल्पसंतुष्ट राहावे असा त्यांचा फंडा होता .

सुनिता सुंदर होती. देखणी होती.सदानंदच्या बोलण्याला अनुसरून कसे बोलावे, आलेल्या अभ्यागतावर छाप कशी पाडावी, याचे तंत्र तिला बिनचूक जमत असे.तिला पगार भक्कम तर होताच.परंतु फसवून मिळालेल्या   पैशातून तिला पंचवीस टक्के  सदानंद देत असे.त्यामुळे तिचे  उत्पन्न आकर्षक होते . व्यावसायिक संबंध वगळले तर दोघांमध्ये काहीही  संबंध नव्हते.काही संबंध,कांही नाते निर्माण होण्याची शक्यताही विशेष दिसत नव्हती .सदानंद विवाहित होता.तो त्याच्या  संसारात सुखी होता . तर सुनिता अविवाहित होती . दोघांच्या वयात अंतरही बरेच होते .सदानंदचे वय सुमारे पंचेचाळीस  असावे.सुनीता केवळ चौवीस वर्षांची होती.

सुरुवातीला ती सदानंदने दिलेल्या जाहिरातीनुसार नोकरीसाठी आली होती .तिचा चटपटीतपणा पाहून सदानंदने तिला पीए नेमले होते .सुनिताला थोड्याच दिवसांत सदानंदचे एकूण व्यवहार लक्षात आले.तीही त्याला काही युक्त्या सुचवू लागली.तिचे चातुर्य,तिचा चारसोबिसपणा , आपल्या व्यवसायाला असलेली तिची अंगभूत पूरकता, सदानंदच्या लक्षात आली.त्याच्या व्यवसायात सहकारी म्हणून त्याने तिचा स्वीकार केला .फसवणूक करण्यात दोघांचीही एकमेकांना सुरेख साथ मिळत होती.

~३~

सदानंद त्या दिवशीचे पेपर पाहात होता .त्याला एक जाहिरात दिसली.जाहिरात पुढीलप्रमाणे होती ~  जगदाळे आणि कंपनी  ही  फर्म सर्वानाच माहीत आहे.या फर्मचे कॅप्टन जगदाळे हे सर्वेसर्वा आहेत .त्यांचे उद्योग अनेक क्षेत्रात पसरलेले आहेत.त्यांच्या अनेक पूरक कंपन्या आहेत .त्यांना त्यांच्या व्यवहारात मदत करणार्‍या, त्यांचे व्यवहार समर्थपणे हाताळू शकणार्‍या,अशा एका सेक्रेटरीची गरज आहे .लायकीप्रमाणे पगार व इतर सुविधा मिळतील .सर्टिफिकेटसह वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तारीख अठरा रोजी सकाळी अकरा वाजता ऑफिसमध्ये  हजर राहावे . ~

ती जाहिरात पाहून एक चमकदार कल्पना सदानंदच्या सुपीक डोक्यातून निघाली.त्याने सुनीताला बोलावून घेतले .तिला ती जाहिरात वाचायला दिली .नंतर कॅप्टन जगदाळेना टोपी कशी घालावी याबद्दलची त्याची कल्पना सांगितली.

सुनिताला कल्पना एकदम आवडली .

तीही जगदाळेंबद्दल बरेच काही ऐकून होती. 

त्यांची श्रीमंती, त्यांचा धनाढ्य खानदानी कारभार ,इत्यादी इत्यादी .

*जर कल्पनेप्रमाणे सफलता मिळाली तर चांगलेच घबाड हाती लागणार होते .*

*अर्थात त्यात धोकाही होता .धोका काय सर्वत्रच आहे.*

*रस्ता ओलांडायचा म्हटला तरी अपघाताचा धोका आहेच की?*

*कल्पना राबवून पाहायला हरकत नाही .सफलता मिळाली तर उत्तमच नाहीतर केव्हाही  राजीनामा देता येईलच !*

(क्रमशः)

११/८/२०२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel