(ही गोष्ट काल्पनिक आहे प्रत्यक्षात कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

शांताराम इंजिनिअरिंगची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला .त्याला खासगी क्षेत्रात नोकरी करायची नव्हती .खासगी क्षेत्रात पगार जास्त मिळत असला तरी असुरक्षितताही असते. मोठ्या कंपनीत काम करीत असताना बदल्याही होतात .त्याला सुरक्षितता व स्थैर्य पाहिजे होते.शिक्षकी पेशा त्याला आवडत होता .त्याला शिकवायला आवडत असे.शिक्षकी पेशात मान व आराम दोन्हीही असतात.सतत तरुण मुलामुलींबरोबर अापण असल्यामुळे मनही तरुण रहाते.  सरकारी क्षेत्रात  त्याला शिक्षकाची नोकरी  करायची होती .त्याकाळी साठ वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी इ. कॉलेजेस काढण्यासाठी खासगी क्षेत्राला परवानगी नव्हती.  शिक्षण हा धंदा झाला नव्हता . शिक्षण संस्था साखर कारखानदार व राजकारणी यांच्या हातात जाण्याचा तो काळ नव्हता

शिक्षणाचा विशेष  प्रसार झाला नव्हता .सरकारी कॉलेजेसही संख्येने फार कमी होती .मागणी जास्त शिक्षण संस्था कमी अशी परिस्थिती होती.कॉलेजमधील प्रवेश तुमच्या गुणवत्तेवर मिळत असे .गुणवत्ता महत्त्वाची होती.वाटेल तेवढी डोनेशन देऊन प्रवेश घेण्याचा तो काळ नव्हता . अर्थात आरक्षणाची पध्दत पहिल्यापासूनच होती.

प्राध्यापकाची नोकरीही गुणवत्तेवरच अवलंबून होती .आणि मला वाटते अजूनही तशीच परिस्थिती आहे .शांतारामने त्याकाळी कॉलेजमध्ये प्रवेश गुणवत्तेवर घेतला होता .लेक्चरर म्हणून त्याची निवडही गुणवत्तेवर झाली.एका खेडेगाववजा शहरात राजकीय प्रभावामुळे सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज नव्याने सुरू झाले होते.तिथे त्याची नेमणूक झाली होती .त्या काळी तरी आणि बहुधा हल्ली सुद्धा लेक्चररला प्राध्यापक म्हणून आदराने संबोधले जाते.विद्वान सर्वत्र पूज्यते या उक्तीप्रमाणे त्या काळी तरी प्राध्यापकाला मान व आदर सर्वत्र होता .हल्ली काय स्थिती आहे मला माहित नाही .

तर प्राध्यापक शांताराम या नव्या  शहरात नोकरीसाठी आला.मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे गाव विस्तारित खेडे होते .त्याचे स्वरूप अर्ध शहरी होते . विशेष हॉटेल्स नाहीत, रेस्टॉरंट्स नाहीत,राहण्याची किंवा जेवण्याची सोय व्यवस्थित नाही,अशी परिस्थिती त्या शहरात होती. कॉलेजवरही प्राध्यापकांसाठी क्वार्टर्स नव्हत्या.कुठे रहावे असा यक्ष प्रश्न शांताराम पुढे उभा होता .

सुरुवातीला  तो एका हॉटेलात उतरला.जेवण तिथेच घेतले पाहिजे अशी सक्ती होती.त्याला ना राहण्याची  खोली पसंत पडली, ना जेवण पसंत पडले .त्याने ती जागा थोड्याच दिवसात सोडली. कॉलेजने मोठ्या मिनतवारीने त्याला काही महिन्यांसाठी मुलांच्या हॉस्टेलमध्ये रूम दिली.तिथे मुलांच्या सहवासात राहणे त्याला विशेष पसंत पडत नव्हते .हॉस्टेल म्हणजे मुलांचा धांगडधिंगा आलाच .शांताराम  शांतताप्रिय व एकांतप्रिय होता. कॉलेजच्या कँटीनचे जेवणही त्याला पसंत पडले नाही .

नोकरी चांगली, पगार चांगला, मान चांगला, परंतु जेवण्याचे व राहण्याचे हाल अशी परिस्थिती होती .त्याचे आईवडील तो जिथे नोकरी करील तिथे येऊन राहू शकत नव्हते .ती दोघेही नोकरी करीत होती.

शिक्षण झाले ,चांगली तुझ्या मनासारखी नोकरी लागली, आता लग्न कर, म्हणून त्याची आई त्याच्या मागे लागली होती . मला एक दोन वर्षे नोकरी करू दे, मला पूर्ण स्थैर्य येउदे, म्हणजे मी लग्नाचा विचार करीन असे तो म्हणत होता .

कुठेही जागा भाड्याने देणे आहे अशी पाटी वाचली किंवा कुठेतरी जागा भाड्याने देणे आहे असे कळले की  तो लगेच तिथे जात असे.प्रत्येक ठिकाणी प्राध्यापक म्हणून त्याला आदराने वागविले जाई .परंतु जागा मात्र नाकारली जाई.त्याचे कारण एकच होते तो अविवाहित होता . अविवाहिताला मुला बायकांच्या चाळीत, सोसायटीत, बंगल्यात, राहण्यासाठी जागा देणे मालकांना संयुक्तिक वाटत नसे.जागा बघायला गेल्यावर पहिला प्रश्न असे लग्न झाले आहे का ?दुसरा प्रश्न नोकरी कुठे करता ?नियत व भाडे भरण्याची कुवत या दोन प्रश्नातून ओळखली जात असावी. अविवाहित एवढा धोकादायक का समजला जात होता,निदान त्या शहरात तरी विवाहिताला जागा देताना प्रथम क्रमांक होता. त्या काळी डिपॉझिट सिस्टीम नव्हती .फार फार तर एक महिन्याचे भाडे आगाऊ घेतले जात असे . जागा भाड्याने देण्यासाठी विवाहित सुरक्षित वाटावा अाणि अविवाहितापासून  असुरक्षितता वाटावी हे थोडे गूढच आहे. 

अविवाहिताला जागा देण्यास मालक कां कचरत असत ते त्यांचे त्यांनाच माहीत. परंतु त्या गावात तशी परिस्थिती होती एवढे मात्र खरे .ही स्थिती त्या काळी थोडी बहुत प्रातिनिधिक स्वरूपाची होती असे म्हणावयास हरकत नाही 

त्या शहरात महाराष्ट्रातीलच  सुप्रसिद्ध  नदी होती . नदीला पाणी भरपूर असे.इथे दोन नद्यांचा संगमही झाला होता .मनमोकळेपणाने फिरायला जाण्याची संगम हीच एक जागा त्या गावात होती.संगमावर  फिरायला गेलेला असताना त्याला त्याचा  शाळेतील एक मित्र भेटला .तो तिथल्या आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक होता .तो कॉमर्स शाखेमध्ये शिकवत असे.  बोलता बोलता तो एकटाच आहे त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरला गेली आहे असे बोलण्यात आले .निदान तीन चार महिने तरी ती परत येणार नव्हती .तेवढ्या काळासाठी तू माझ्याबरोबर राहायला येऊ शकतो असे त्याने सांगितले .किंबहुना येच असा आग्रह धरला.

शांतारामने आपला बाडबिस्तारा कॉलेजच्या हॉस्टेलमधून उचलून त्या मित्राकडे हलविला.त्या मित्राने एक घरगुती खानावळ लावली होती.शांताराम त्याच्याबरोबर तिथेच जेवायला गेला. त्याला ती खानावळ  एकूण ठीक वाटली.तीन चार महिन्यांची तर सोय झाली परंतु पुढे काय असा प्रश्न दत्त म्हणून त्याच्या पुढे होता .हा जागा भाड्याने देणे आहे असे कळले की तिथे जात असे . कधी जागा हवेशीर नाही. कधी पाणी व्यवस्थित येत नाही.कधी भाडे अवास्तव आहे. म्हणून शांताराम जागा नाकारत असे.तर कधी जागा पसंत पडे परंतु मालकांकडून काही ना काही कारण देऊन नाकारली जाईल.अविवाहित हे कारण होते याचा उल्लेख कधी मालक करी तर कधी करीत नसे .परंतु याच कारणास्तव त्याला जागा मिळत नसे हे तो जाणून होता .

शेवटी वैतागून आपल्याला मनासारखी जागा मिळावी, व्यवस्थित जेवण मिळावे, यासाठी लग्न करण्याचा विचार तो करू लागला !

एक दिवस तो त्याच्या मित्राला अविनाशला भेटण्यासाठी त्याच्या कॉलेजवर गेला होता.प्राध्यापकांच्या कॉमनरुममध्ये दोघेही गप्पा मारीत बसले होते.एवढ्यात एक मुलगी काही कामासाठी अविनाशकडे त्याच्या मित्राकडे आली.तिचे काम झाल्यावर ती निघून गेली. शांतारामला ती मुलगी आवडली.त्या मुलीशी ओळख व्हावी,त्या मुलीला वारंवार भेटावे, असे त्याला आतून तीव्रतेने वाटू लागले .त्या दिवशी घरी गेल्यावर त्याने अविनाशला खोदून खोदून त्या मुलीबद्दल विचारले .तिचे नाव काय? ती कोणत्या वर्गात शिकते? ती कुठे राहते? इत्यादी इत्यादी.

अविनाशने त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला,अरे तू तिच्यात त्या दृष्टीने इंटरेस्ट घेत आहेस का? असे विचारले .त्यावर शांताराम मिश्किलपणे हसला .

त्याच्या मित्राने अविनाशने त्याला हवी असलेली माहिती पुरविली .तिचे नाव शांता आहे, ती द्वितीय वाणिज्य  वर्षाला शिकत आहे,ती कुठे राहते  इत्यादी सर्व माहिती त्याने सांगितली .तिच्याबद्दल इतकी सर्व माहिती तुला कशी असे विचारता त्याने तिच्या वडिलांना मी चांगला ओळखतो असेही सांगितले. त्यानंतर काही ना काही कारणाने शांतारामच्या, अविनाशच्या  कॉलेजवरील चकरा वाढल्या .शांतारामच्या अविनाशच्या कॉलेजवरील चकरा वाढलेल्या पाहून अविनाशने  तुला तिची ओळख करून देऊ काय असेही विचारले .

कुणाला काय आवडेल ते सांगता येणे मोठे कठीण  आहे.ती लख्ख गोरी होती.उंची बेताची, ठेंगूमध्ये गणली गेली असती. तिचे केस काळेभोर आणि दाट होते.डोळे बारीक परंतु पाणीदार होते.ती कधी दोन शेपटे घालीत असे.तर कधी एकच घाली.बोलता बोलता लडिवाळपणे मान वेळावण्याची तिची पद्धत एखाद्याला आवडली असती तर एखाद्याला तो थिल्लरपणा बालिशपणा वाटला असता . बोलता बोलता शेपटा डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर व उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर फेकण्याची तिची स्टाइल पोरकटपणाची वाटत असे.परंतु शांतारामला तीच स्टाइल आवडली. त्यानेच तो घायाळ झाला. ती थोडे पोक काढून चालत असे .  तिचा आवाज थोडा किनेरा होता.काही असो शांतारामला ती आवडली एवढे मात्र खरे.

(क्रमशः)

१४/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel