(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

~६~

शेवटी एक दिवस त्यांनी या प्रश्नाची तड लावण्याचे ठरविले .त्याच दिवशी धीर करून सुनिताला मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगितले .सुनिता हसून म्हणाली मग सांगा की.मी तर तुमची सेक्रेटरी आहे. पुढे स्वर बदलून द्व्यर्थी अर्थाने ती म्हणाली तुमचे आज्ञापालन हे तर माझे कर्तव्य आहे.तुमच्या शब्दाबाहेर मी नाही .

त्यावर जगदाळे म्हणाले मला तुला जे काही विचारायचे आहे ते इथे ऑफिसात विचारता येणार नाही .आज आपण सेव्हन कलर्स रेस्टारंटमध्ये रात्री जेवायला जाऊया .मी तुला डिनरचे निमंत्रण देत आहे .तिथे मी बोलेन .

सुनीताने खुषीने हसत संमती दिली.मासा गळाला लागला होता .असे दोन्ही बाजूला वाटत होते.धीवर कोण व मासा कोण हे काळच ठरवणार होता .

रात्री दोघेही सेव्हन कलर्समध्ये डिनरला गेले .जगदाळेनी त्या दिवशी शोफर न घेता स्वतः ड्रायव्हिंग केले.सुनीताला तिच्या घरून लिफ्ट दिली .डिनरनंतर जगदाळेनी तिला प्रपोज केले.तिनेही विवाहाला संमती दिली .आनंदाने जगदाळेंचा चेहरा उजळून गेला.प्रेम, आनंद, इच्छापूर्ती, यानी जगदाळेंचा चेहरा उजळून गेला होता.अंतरात्म्याचा प्रकाश पडल्यामुळे  ते सुंदर दिसत होते.

डिनरनंतर सुनिता जगदाळेंच्या घरी गेली.त्यानी तिला थोड्याशा अधिकाराने हळुवार आवाजात घरी येण्याची विनंती केली होती. त्यांना तिला सरप्राइज गिफ्ट द्यायची होती .त्यांच्या राजवाडेवजा  घरात गेल्यावर ते तिला त्यांची तिजोरी असलेल्या खोलीत घेऊन गेले .ज्या खोलीत तिजोरी ठेवली होती ती एखाद्या स्ट्रॉंगरूम सारखी वाटत होती .त्यांनी कॉम्बिनेशन  फिरवून  तिजोरी उघडली.तिजोरी नोटा जडजवाहीर यांनी खच्चून भरली होती .बँकांचे लॉकर असताना त्यांनी एवढा माल घरात का ठेवला होता हाही एक प्रश्नच होता .अर्थात त्यांच्या राजवाडेवजा घराला सुरक्षा रक्षक होते.स्ट्राँगरूम व  तिजोरी तशी अभेद्य होती. तिजोरीतून त्यांनी एक पेटी काढली .ती पेटी उघडून तिच्यापुढे धरली.त्यात हिर्‍यांच्या पंधरावीस अंगठ्या होत्या .या सगळ्या तुझ्याच आहेत .अांगठ्याच काय तिजोरीसुद्धा तुझी आहे. मीच तुझा आहे असे म्हटल्यावर सर्व कांही ओघाने तुझेच झाले.तरीही तुला आवडणारी एक अंगठी  निवड .आजच्या दिवसाची आठवण आणून मला ती  तुझ्या बोटात माझ्या हाताने घालायची आहे .त्याला आपण एंगेजमेंट रिंग म्हणूया .

ते पुढे उत्साहाने म्हणाले,  या महिन्यात पंचवीस तारखेला माझा वाढदिवस येत आहे.त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी वाढदिवसाची पार्टी देणार आहे.यावर्षीची पार्टी जास्त भव्य व खास असेल.आलेल्या सर्व पाहुण्यांसमोर मी तुझ्या हातात ही रिंग पुन्हा एकदा घालीन.आपल्या  लग्नाची सर्वांसमोर वाच्यता  होईल.त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता .तिच्या होकाराने त्यांना निरतिशय आनंद झालेला स्पष्ट दिसत होता. 

सुनिताताने लाजत किंचित मान खाली घालून हसत संमती दर्शवली.ती खरेच लाजत होती की तो तिचा अभिनय होता ते तिचे तिलाच माहिती . हे सर्व चालू असताना ती तिजोरीचे कॉम्बिनेशन आठवीत होती .तिजोरीच्या कॉम्बिनेशनची घोकंपट्टी चालली होती .   

~ ७~                     

रात्री बारा वाजता कॅप्टन जगदाळे  स्वतः तिला पोचवण्यासाठी घरी गेले होते. तिला रात्री झोपण्यासाठी उशीर झाला होता.तिला झोप लागत नव्हती .ती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती .तिच्या स्वभावानुसार एकदा या गोष्टींचा तिने निर्णय लावल्याशिवाय तिला झोप येणार नव्हती.तिच्यासमोर तिला तीन मार्ग दिसत होते .

पहिला मार्ग असत्याचा फसवणुकीचा होता .ज्या मार्गावरून ती आत्तापर्यंत चालत होती.ज्या हेतूने ती कॅप्टन जगदाळे यांच्याकडे सेक्रेटरी म्हणून रुजू झाली होती .या मार्गावरून चालल्यास तिला जगदाळे यांची तिजोरी जमेल तेवढी साफ करावी लागली असती.जगदाळे यांचा विश्वास तिने संपादन केला होताच.त्याच विश्वासाचा फायदा घेऊन तिला जगदाळे यांच्या उद्योगातून जेवढा हात मारता येईल तेवढा मारायचा होता .सदानंदला तर तिने लग्न करावे नंतर  घटस्फोट घ्यावा आणि मोबदला म्हणून भरपूर  रक्कम  कॅप्टन जगदाळे यांच्याकडून वसूल करावी असे वाटत होते .तेवढ्या टोकापर्यंत जाणे सुनीताला पसंत नव्हते हा भाग निराळा .

दुसरा मार्ग सत्याचा होता .जगदाळे यांची झाली फसवणूक ती भरपूर झाली .अर्थात अजून तिने त्यांची कोणतीही आर्थिक फसवणूक केली नव्हती .परंतु फसवणूक करायची या उद्देशाने तिने सेक्रेटरी पद स्वीकारले होते.त्यांना ती कोण ,ती तिथे कशासाठी आली हे सर्व सांगावे .ती त्यांची फसवणूक करू इच्छित नाही हे स्पष्ट करावे .राजीनामा द्यावा आणि निघून जावे .त्यांनी  हे सर्व ऐकूनही तिला क्षमा केली तर सेक्रेटरी म्हणून राहावे परंतु  तिला त्यांच्याशी लग्न करायचे नाही हे स्पष्ट करावे .

तिला तिच्या डोळ्यासमोर आणखी एक तिसरा मार्ग दिसत होता .तो मार्ग आतापर्यंत तिच्या दृष्टीने अस्तित्वातच नव्हता .गेले काही दिवस तो अंधुक अस्पष्ट दिसू लागला होता .कॅप्टन जगदाळे  दिसायला कसेही असले तरी ती त्यांच्याजवळ सेक्रेटरी म्हणून  काही महिने काम करीत होती .सहवासाने त्यांच्या स्वभावाचे अनेक चांगले  पैलू तिला दिसू लागले होते.त्यांचा एवढा व्यवसाय सर्व दिशांनी  फैलावला असला तरी त्यांनी कधीही फसवणुकीचा गैरमार्ग स्वीकारला नव्हता. पैशावर भाळणाऱ्या मुली कितीतरी असतात.अशा मुलींच्या नादी, केवळ संबंध ठेवण्याच्या हेतूने  ,कॅप्टन जगदाळे कधीही लागले नव्हते .त्यांच्या ऑफिसातील मुलींचा गैरफायदा त्यांनी केव्हाही घेतला नव्हता .सुनिता त्यांची सेक्रेटरी होती .परगावी कॉन्फरन्ससाठी जावे लागे.ते तिच्यासाठी स्वतंत्र खोली बुक करीत असत.त्यांनी कधीही तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला नव्हता .त्यांचा स्पर्श सहज असे.त्यामागे गैर हेतू नसे .अशा गोष्टी स्त्रियांच्या सहज उपजतच लक्षात येतात .स्त्रियांना याबाबतीत सहावे इंद्रिय असावे .त्यांचे वर्तन त्यांचे चारित्र्य शुद्ध निर्मळ होते .

सुनीता सदानंद बरोबर राहून सतत फसवणूक करत होती.तिच्या अंतर्मनात आपण करतो हे बरोबर नाही चूक आहे अशी भावना तिला सतत टोचत असे . त्याची जाणीव तिला आतापर्यंत  नव्हती .

जगदाळे यांच्या सहवासात राहून प्रामाणिकपणा सचोटी यांचे महत्त्व तिच्या लक्षात येऊ लागले होते .अापण सत्याची कास धरली आहे,अापण प्रामाणिक आहोत ही भावना ,तुम्हाला सुखाने झोप घेवू देते .तुम्हाला तुमची सद्सदविवेकबुद्धी कुठेही टोचत नाही. हा मार्ग मन:शांतीचा आहे.ही गोष्ट प्रकर्षत्वाने तिच्या लक्षात आली.मनुष्याचे बाह्यरूप आपण लक्षात घेतो .व्यक्तीचे अंतरंगही जास्त महत्त्वाचे आहे .किंबहुना अंतरंगच जास्त महत्त्वाचे आहे.जगदाळे यांचे अंतरंग मोहक होते.ते शांत प्रेमळ सुस्वभावी होते.त्यांची निर्णयक्षमता दांडगी होती .कितीही बिकट प्रसंगात ते डगमगून जात नसत .त्यांच्या सहवासात कित्येक  महिने राहून ती त्यांच्या प्रेमात पडली होती.त्याची जाणीव तिला आताच होत होती .त्यांनी तिच्या बोटात अंगठी घातली तेव्हा ती खरेच लाजली होती .

ती असत्याचा पहिला मार्ग स्वीकारू शकत नव्हती.सदानंदाच्या नादी लागून आतापर्यंत झाले ते खूप झाले यापुढे तो मार्ग स्वीकारणे तिला अशक्य होते. हे तिच्या लक्षात आले होते. आंतून होणारी मनाची टोचणी व कॅप्टन जगदाळेंचा सहवास या दोन्ही गोष्टींनी ही किमया केली होती.  

दुसरा मार्ग स्वीकारायचा सर्व सत्य सांगायचे राजीनामा देऊन निघून जायचे.हाही मार्ग तिला ठीक वाटत नव्हता कारण तिला नकळत ती जगदाळेंवर प्रेम करू  लागली होती .त्यांना सोडून जाणे तिला आता शक्य नव्हते 

तिसरा सुरुवातीला न दिसणारा, नंतर अस्पष्ट व अंधूक दिसणारा, परंतु आता स्पष्ट व स्वच्छ दिसणारा, तिला रुचणारा मार्ग स्वीकारायचा तिने ठरविले . जगदाळेनी तिला मागणी घातलीच  होती. तिने त्याचा जरी स्वीकार केला असला तरी ती मनोमन डळमळीत होती.त्यांच्या योजनेचा एक भाग म्हणून तिने तो स्वीकार केला होता. परंतु तिचा होकार, जगदाळेंचा स्वीकार, हा योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात  ती तिच्या अंतरात्म्याने दिलेली साद होती हे तिला जाणवले.

आता अंतःकरणपूर्वक जगदाळेना होकार द्यायचा .सदानंद  व त्याची फर्म यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकायचे.जगदाळेना प्रामाणिकपणे ती कशासाठी आली होती,ती काय करणार होती ,हे सांगायचे .ती कशी बदलली आहे हेही सांगायचे .त्यांनी तरीही स्वीकार केला तरच त्यांच्याशी लग्न करायचे असे तिने निश्चित केले त्यानंतरच तिला शांत झोप लागली .

दुसऱ्या दिवशी तिने जगदाळेना मला तुमच्याजवळ काहीतरी विशेष बोलायचे आहे असे सांगितले .

*त्या दिवशी दोघेही पुन्हा रात्री डिनरला गेले.*

*सुनिताने तिचे मन मोकळे केले.*

*जगदाळे थोडा वेळ विचारात पडले.*

*त्यांनी हसून तिचा स्वीकार केला .*

*अशी ही एका लग्नाची गोष्ट * 

(समाप्त)

११/८/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel