(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

बरेच दिवस इंजिप्तला जावे भव्य पिरॅमिड्स पाहावे असे मनात होते.इजिप्तमधील स्फिंक्सबद्दल बरेच ऐकले व वाचले होते.चेहरा मानवी व शरीर सिंहाचे अशा या भव्य पौराणिक आकृती आहेत. जन्माला येऊन एकदा तरी त्या पाहाव्यात असे अनेकानी त्यांच्या प्रवास वर्णनात लिहिले होते.शेवटी योग जुळून आला .मी एकटाच एका प्रवास कंपनीबरोबर इजिप्तला येऊन पोंचलो .गीझाचा स्फिंक्स पाहण्यासारखा आहे असे सर्वच सांगत होते .आमचा मुक्काम कैरोमधील एका फाइव्हस्टार हॉटेलमध्ये होता.नाईल म्हणजेच नील नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेल्या वाळवंटात हा स्फिंक्स आहे .कैरो मधून बसने या प्रसिद्ध पुतळ्यापर्यंत पोचता येते .इजिप्तला गेलो आणि उंटांवर बसलोच नाही असे होऊ नये म्हणून आम्ही  उंटावरून त्या भव्य जगप्रसिद्ध पुतळ्यापर्यंत जायचे ठरविले होते.

बसची चांगली सोय असतांना उंटावरून जाणाऱ्या आम्हाला काही जणांनी उंटावरचे शहाणे असेही संबोधिले .बरेच जण बसने पुतळ्याकडे रवाना झाले होते.आम्ही उंटावरील शहाणे अर्थात काहींच्या म्हणण्या प्रमाणे,उंटावरून निघालो  होतो .एकूण पाच उंट होते.यापूर्वी एकदा चौपाटीवर उंटावर बसलो होतो.एका फेरीतच हाडे खिळखिळी झाल्यासारखे वाटले होते .स्फिंक्सपर्यंत जाताना किती त्रास होतो ते पाहावे .नाहीतर येताना बसने यावे असा विचार आम्ही केला होता.

तर पांच उंट एका रेषेत जात होते.सर्वत्र वाळूचा समुद्र पसरला होता .बसचा रस्ता लांबून होता .आमचे उंटचालक सरळ रेषेतील जवळच्या रस्त्याने निघाले होते .वाळवंटातील जहाजाबद्दल जसे ऐकले होते तसेच वाळवंटातील वादळाबद्दलही ऐकले होते.जहाजात तर आम्ही होतोच. वादळाचाही अनुभव येईल असे मनातही आले नव्हते.यावा अशी इच्छाही नव्हती. परंतु नेहमी सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे होते असे थोडेच आहे . थोड्याच वेळात हवेत फरक पडू लागला .दूरवर वाळूचे लोट दिसू लागले .बहुधा चक्रीवादळ असावे.वाळू चक्राकार फिरत त्यांचे स्तंभ उभे राहात होते .हे दृश्य फारच प्रेक्षणीय होते.ते स्तंभ आपल्याकडे येवू नयेत म्हणून आम्ही मनोमन प्रार्थना करीत होतो .उंटाना एकाएकी काय वाटले माहित नाही परंतु ते सैरावैरा धावू लागले.मी प्रवासी असा एकटाच एका उंटावर  होतो.मी व उंट चालक असे दोघेच होतो. 

वाळूचे वादळ जवळ येऊ लागले .मी उंटावरुन खाली केव्हा पडलो ते मला कळले नाही .वाळूतील वादळात उंट वाळूमध्ये तोंड खुपसून बसतात असे ऐकले होते.वाळूत तोंड खुपसणे मला शक्य नव्हते . शर्ट डोक्यावर टाकून, चेहरा संपूर्ण झाकून,गुडघ्यात मान घालून, मी बसलो होतो. अर्धा एक तासात वादळ शांत झाले .वादळाला तोंड देता देता माझी दमछाक झाली होती.मी घाबरून गेलो होतो .माझा शेवट मला  जवळ दिसू लागला होता.डोळ्यात वाळू जाऊ नये म्हणून मला खूप प्रयत्न करावे लागले होते .वाळवंटातील वादळात वाळूचे एका बाजूचे ढीग नाहीसे होतात दुसरीकडे नवे निर्माण होतात असे मी वाचले होते.वाळूच्या ढिगाखाली मी गाडला जाऊ नये अशी देवाजवळ प्रार्थना करीत होतो.देवाने माझी प्रार्थना ऐकली होती.

सूर्य पूर्ण क्षमतेने आकाशात चमकू लागला.अंगातून घामाच्या धारा चालल्या होत्या .मी एकाच जागी बसून होतो .शरीराला तापलेल्या वाळूचे खालून व उन्हाचे वरून चटके बसत होते .वाळवंटात मी दिशाहीन झालो होतो .उंटचालक मला शोधीत  बरोबर येईल असा माझा कयास होता. मी एकाच जागी सर्व बाजूंनी चटके सोशीत उभा होतो .सर्वत्र वाळूचा समुद्र पसरलेला दिसत होता .मी चारी दिशांना आपल्याला कुणीतरी सोडवायला येईल म्हणून पहात होतो.  जीवनाचा,जिवंतपणाचा  कुठेही काहीही मागमूस दिसत नव्हता . आपल्यालाच आपला मार्ग शोधला पाहिजे या विचारावर मी शेवटी आलो.त्या अथांग पसरलेल्या वाळूच्या समुद्रात कोणती दिशा पकडावी आणि चालायला  सुरुवात करावी ते मला कळत नव्हते .नील नदीच्या पश्चिम तटावर मी आहे एवढे मला ज्ञात होते.पूर्व दिशेने चालू लागलो तर केव्हांना केव्हा मोटाररस्ता किंवा नील नदी मिळेल आणि माझी सुटका होईल अशा विचाराने मी पूर्व दिशेने चालू लागलो .चालता चालता माझा उंट चालक किंवा आणखी कुणी भेटता तर प्रश्नच नव्हता. 

आज बहुधा  माझे सर्व अनिष्ट ग्रह एकाच राशीत आले असावेत.कुठेही काहीही मला दिसत नव्हते.माझ्याजवळ अन्न नव्हते. पाणीही नव्हते.अन्नाशिवाय आपण कांही दिवस राहू शकतो असे ऐकून होतो .भूक लागल्यावर मला काही तासही खाल्ल्याशिवाय राहणे अशक्य होत असे.पाण्याशिवायतर  एक दिवसही राहणे मुश्किल आहे .वाळवंटात तर अशक्यच आहे . येणाऱ्या  प्रचंड घामावाटे पाण्याची वाफ होऊन तुमच्यातील जलअंश झपाट्याने नाहीसा होतो.डिहायड्रेशन होते.मेंदूचे नियंत्रण हळूहळू  सुटू लागते.वाटेल ते आभास होऊ लागतात असे ऐकून होतो.चार्ली चॅप्लिनच्या एका सिनेमात, सोन्याच्या शोधासाठी जात असताना वाळवंटात हरवल्यामुळे ,अन्न पाण्याशिवाय  राहावे लागल्यामुळे,काय काय आभास होउं लागतात ते फार उत्कृष्ट रीतीने व विनोदी पद्धतीने दाखविले आहे .त्याची आठवण मला  होऊ लागली होती.

मी पूर्णपणे खचून गेलो होतो .आता मला प्रथम पाणी हवे होते .माझ्याकडील सर्व मूल्यवान गोष्टी मी पाण्याच्या एका घोटासाठी द्यायला तयार झालो असतो.वाळवंटातून पाय ओढत ओढत  मी  चाललो होतो .एवढ्यात मला समोर जलाशय दिसू लागला.नील नदी जवळच आहे याची मला खात्री पटली.एखादा मैल मी चाललो की नील नदीच्या काठी पोचेनच  याची मला खात्री  वाटू लागली .सर्व ताकद गोळा करून थकलेला भागलेला दमलेला मी जिवाच्या कराराने पाय ओढत चालत होतो . 

मी जसा चालत होतो तशी नील नदी तेवढीच पुढे जात होती.माझे मेंदूवरील मनावरील नियंत्रण जरी सुटू लागले होते तरी अजूनही थोडे नियंत्रण आहे असे मला वाटत होते.मृगजळाबद्दल मी खूप ऐकून होतो.त्याचाच अनुभव मी आता घेत आहे हे माझ्या लक्षात आले.

एवढ्यात मला उजव्या बाजूला जवळच एक तलाव दिसू लागला .मी त्या तलावाच्या काठी पोचलो. तलाव पाण्याने भरलेला होता .वाऱ्याबरोबर मंद लाटा पाण्यावर उठत होत्या.पाणी स्फटिकासारखे स्वच्छ होते .आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात दिसत होते .मधूनच उठणाऱ्या पाण्याच्या लहरींबरोबर आकाशातील ढगांचे दृश्य डुचमळत होते. आकाशातून जाणारे पांढरे ढग पाणी स्थिर असेल तेव्हा  मंद गतीने जाताना पाण्यात दिसत होते. दुर्दैवाने पाण्यापर्यंत मी पोचू शकत नव्हतो.काठाला उतार नव्हता.चारी बाजूंनी सुमारे दहा फूट उंच सरळ ताशीव कडा होत्या.पाणी वर ओढून घेण्याचे माझ्याजवळ कांहीही  साधन नव्हते.पँट काढावी. तलावाच्या काठावर उपडे पडावे.पँट पाण्यात बुडवावी, ओली पँट तोंडात पिळून आपली तृषा  भागवावी, असा विचार करून मी पँट काढली, उपडा झोपलो, पॅन्ट तलावात सोडली,दुर्दैवाने पँट पाण्यापर्यंत पोचू शकली नाही. पॅन्टला शर्टाची गाठ मारून मी पँट पाण्यात सोडून पाहिली.तरीही पँट पाण्यापर्यंत  पोचली नाही . 

तहान भागवण्याची माझी शेवटची आशा संपुष्टात आली होती.तलावात उडी मारावी आपली तहान भागवावी असा विचार मी केला.मला पोहता चांगले येत होते .कुठे ना कुठे कपार असेल त्यांत मी आश्रय घेऊ शकलो असतो.दहा फूट सरळ ताशीव कडा चढून वर कसे यायचे ते नंतर पाहता आले असते.माझे नियंत्रण सुटलेले नाही .अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मी विचार करू शकतो ,हे माझ्या लक्षात आले आणि मला आणखी हुरूप चढला 

मी पाण्यात उडी मारली . एक प्रदीर्घ दारुण किंकाळी माझ्या तोंडून बाहेर पडली.पाणी वगैरे काहीही नव्हते. वादळामुळे वाळवंटात पडलेला तो एक खड्डा होता .वाऱ्याबरोबर हलणारे पाणी, स्फटिकासारखे पाणी, आकाशातील ढगांचे प्रतिबिंब, वगैरे सर्व मृगजळ होते. उंचावरून खाली आपटल्यामुळे माझा पाय मोडला होता.पाठीच्या मणक्यातूनही कळा येत होत्या. बहुधा पाठीच्या मणक्याला इजा पोचली असावी.

आता या खड्ड्यातून बाहेर पडणे शक्य नव्हते.कुणी येऊन मला सोडवील अशीही आशा नव्हती. बसने स्फिंक्स बघायाला  गेलो असतो तर उत्तम झाले असते.असे माझ्या मनात येत होते.आता अशा विचारांचा काहीही उपयोग नव्हता .माझा जवळ आलेला शेवट मला दिसू लागला होता.  वाळवंटातील जहाजावरून जाण्याचा, एक खास अनुभव घेण्याचा, माझा विचार प्राणघातक  ठरला होता.

आता पश्चाताप करून काहीही उपयोग नव्हता .माझ्या बरोबरच्या इतर उंटावरच्या  प्रवाशांची काय अवस्था झाली होती देवाला माहीत.खड्ड्यात तडफडत मरण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता.हताश होऊन उताणा पडून मी मृत्यूची वाट पाहू लागलो. 

मला खड्डय़ाच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचा पायरव ऐकू आला .मी आशेने खड्ड्याच्या कडेकडे पाहात होतो. मी ज्या उंटावरून जात होतो तोच उंट मालकासह काठावर उभा होता .माझी सुटका आता निश्चित होती.मी बेशुद्ध झालो असतो तरी हॉटेलवर जाऊन माझ्या शुश्रूषेची व्यवस्था झाली असती.मी मनोमन देवाचे आभार मानले .

उंट मालक उंटावरून वाकून खड्ड्यात पाहात होता.एवढ्यात कडेची वाळू खचली.उंट त्याच्यावरील मालकासह माझ्या अंगावर येवून कोसळला .मला किंकाळी मारण्यालाही वेळ मिळाला नाही.

*   *   *   *   *   *   

सकाळचे आठ वाजले होते .नेहमी पहाटे सहालाच उठणारे बाबा अजून कां उठले नाहीत म्हणून मधुकर चिंतीत झाला होता.

बाबांच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडून तो आत शिरला .

*बाबा शांतपणे झोपले होते .*

* त्याने बाबांना हाक मारली .*

*पहिल्या हाकेसरशी उठणारे बाबा अजून उठत कां नाहीत म्हणून त्याने बाबांना हलविण्याचा प्रयत्न केला .*

*बाबांचे शरीर त्याला थंडगार लागले .*

*बाबा इहलोक सोडून अनंतात केव्हाच विलीन झाले होते.*

२९/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel