(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

पुढे ते ज्योतिषाचार्य म्हणाले .पहा विचार करा एवढे सर्व तुम्ही पेलू शकाल का ?मुळात तुमचा याच्याशी संबंध काय?ते तुमचे लांबचे चुलत चुलत नात्यातील कुटुंब.ते तुमच्या स्वप्नात आले एवढाच संदर्भ .नीट विचार करून पाउल उचला .कदाचित तुम्हालाही धोका संभवतो .

ज्योतिषाचार्यांना हरिभाऊंनी पुढे विचारले,असा मृत्युंजयाचा सतत पाठ किती काळ करावा लागेल?ज्योतिषाचार्य म्हणाले ते सांगता येणार नाही . वाडा जळला त्यावेळी जे मृत्यू पावले त्या प्रत्येकाची पत्रिका वेगळी असणार.प्रत्येकाचे भविष्य वेगळे असणार .जर त्यांच्या पत्रिका मिळाल्या तरच किती काळ लागेल ते सांगता येईल .कदाचित सहा महिने नाही तर सहा वर्षे किंवा आणखीही दीर्घ काळ लागू शकतो .

ज्योतिषाचार्यांचा  निरोप घेऊन हरिभाऊ घरी परत आले .त्यांनी किती खर्च येईल त्याचा विचार केला .चौवीस तास सतत मृत्यूंजय मंत्राचा घोष करायचा म्हणजे  निदान तीन गुरुजींची आवश्यकता आहे.हल्लीच्या काळात अगोदर भटजी मिळणे मुष्किल त्यात व्युत्पन्न  दशग्रंथी म्हणजे आणखी कठीण .प्रत्येक गुरुजी साठी पंचवीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दर महिन्याला खर्च येणार.दर वर्षी वीस लाखांपर्यंत खर्च येणार असे गृहीत धरून चालले पाहिजे .असा खर्च किती काळ करावा लागेल त्याची मर्यादा नाही .एखादा रईसच ही गोष्ट करू शकतो.आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही .

असेच आठ पंधरा दिवस गेले . हरिभाऊनी आपल्याला काही करता येणार नाही असे निश्चित केले .त्या रात्री पुन्हा अण्णासाहेब हरिभाऊंच्या स्वप्नात आले .ते म्हणाले ज्यावेळी वाड्याला आग लागली आणि वाडा जळाला त्यावेळी आमचा एक जवळचा नातेवाईक बाहेर होता .माझा सख्खा पुतण्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता .तो शिक्षण पुरे झाल्यावर तिथेच कायम राहण्याचे म्हणत होता.जर त्याचा पत्ता  मिळाला, आणि जर तो चांगले पैसे मिळवीत असला, तर तो खर्च करू शकतो . त्याचे नाव अरविंद इनामदार. आमचे पूर्वीचे नाव जोशी कदाचित तो जोशी हे आडनाव लावत असेल.तीच एक आम्ही मुक्त होण्याची आशा आहे .तुमची अडचण मी समजू शकतो .तुम्हाला इच्छा खूप आहे परंतु इतके पैसे तुम्ही खर्च करू शकत नाही . अरविंद मिळाल्यास सर्व प्रश्न सुटेल . आणि हरिभाऊ स्वप्नातून जागे झाले .

या अरविंदला कसा शोधून काढायचा असा त्यांच्यासमोर प्रश्न होता .तेवढ्यात त्यांच्या पत्नीने तिचा चुलतभाऊ अमेरिकेत राहतो त्याची आठवण करून दिली .त्याचा पत्ता व फोन नंबर हरिभाऊंच्या पत्नीला माहीत होता .आता सर्वच गोष्टी सोप्या झाल्या . अमरला(पत्नीचा चुलतभाऊ ) फोन करायचा, त्याला समस्या सांगायची, तो कसेही करून अरविंदला शोधून काढील .

अमरला फोन झाला. त्याला समस्या सांगण्यात आली. त्याने टीव्ही, वर्तमानपत्रे ,सोशल मीडिया, यावर अरविंद इनामदार उर्फ अरविंद जोशी,मूळ घर कोकणात हिम्मतपूर येथे, यांच्याशी  महत्त्वाचे काम आहे तरी त्यांनी अमुक अमुक नंबरवर कॉन्टॅक्ट करावा अशी जाहिरात दिली.असे आवाहन केले.अरविंदच्या पाहण्यात ते आवाहन आले .अरविंदने अमरला फोन केला. अमरने हरिभाऊंचा नंबर त्याला दिला. अरविंदचा फोन आल्यावर हरिभाऊनी त्याला सर्व समस्या सविस्तर सांगितली . खर्चाचा अंदाज दिला.हरिभाऊ आपल्याला गंडवीत तर नाही ना हे पाहण्यासाठी अरविंद स्वतः हिम्मतपूरला आला.त्याने सर्व परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली समजून घेतली .स्वतः अण्णासाहेब अरविंदच्या स्वप्नात आले त्यांनी काही कौटुंबिक गोष्टी सांगून अरविंदची त्यांच्या सत्यतेबद्दल खात्री पटविली .अरविंदची परिस्थिती उत्तम होती. तो अपेक्षित खर्च सहज करू शकत होता .त्याने खर्चाला मान्यता दिली .

या सर्व धडपडीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला होता .सर्व बंदिस्त आत्मे मुक्त झाले हे कसे ओळखणार ? ज्योतिषाचार्यांकडे हरिभाऊ व अरविंद गेले.त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला .तेही विचारात पडले .त्यांनी काही जुन्या अत्यंत जीर्ण झालेल्या पोथ्या काढल्या .त्यातील काही पाने वाचली . नंतर ते म्हणाले ,सर्व आत्मे मुक्त झाल्याचे दोन घटनांवरून लक्षात येईल .

हल्ली आपल्याला जळक्या चौथर्‍याचे दगड नवीन बांधलेल्या चौथर्‍यासारखे दिसतात .ते दगड एकदम जुने दिसू लागतील एवढेच नव्हे तर कांही चिरे घसरून खाली पडतील.

दुसरी घटना रात्री बाहेरूनच लक्षात येईल .हल्ली रात्री बारा वाजता सर्व वाडा उभा राहिलेला भासमान होतो .त्यात दिवेही लागलेले असतात .हा भास होण्याचे जेव्हा थांबेल तेव्हां सर्व आत्मे मुक्त झाले असे नि:संशय समजावे. त्यानंतर मृत्युंजय पाठ थांबविण्यास हरकत नाही .

आसपासच्या पन्नास साठ गावात फिरून तीन दशग्रंथी ब्राह्मण शोधून काढण्यात आले.त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना देण्यात आली .ज्योतिषाचार्यांकडूनच एक शुभ मुहूर्त काढण्यात आला .आणि त्या मुहूर्तावर मृत्यूंजय पाठाला सुरुवात झाली. 

अरविंद दर महिन्याला गुरुजींची दक्षिणा पाठवीत होता .अखंड मृत्युंजय मंत्राचा घोष चालू होता . 

एकेक आत्मा जसा मुक्त होत होता, तसा चौथऱ्याचा रंग बदलत होता.तो हळूहळू जुनाट दिसू लागला होता .नेहमी निरखून पाहणार्‍याच्याच ही गोष्ट लक्षात येत होती.  

बाहेरुन रात्री बारा वाजता वाड्याकडे पाहिले असता सर्व वाडा प्रकाशाने  उजळून गेलेला भासमान होत असे .एक एक आत्मा मुक्त होऊ लागल्याबरोबर वाड्यातील एकेक भाग प्रकाशमान होण्याचे बंद होत गेले.

सुमारे सात वर्षे सर्व आत्मे मुक्त होण्यासाठी लागली .अगदी काटेकोरपणे बोलायचे झाल्यास सहा वर्षे अकरा महिने आणि सात दिवस या मुक्ती प्रकरणासाठी लागले. 

या काळात सुदैवाने कुठल्याही गुरुजींना काहीही धोका पोहोचला नाही .त्याचप्रमाणे आजारपण किंवा आणखी काही अन्य कारणाने पाठामध्ये खंड पडला नाही .

नुकतीच हरिभाऊना देवाज्ञा झाली. 

हिम्मतपूर मधील लोक अजूनही त्या जळक्या चौथर्‍याबद्दलच्या कहाण्या सांगतात.या गोष्टीला दहा वर्षे झाली  .

यानिमित्ताने अरविंद इथे येऊ जाऊ लागला .तो त्याची पत्नी व मुले यांना हिम्मतपूर आवडले .

अरविंदला वडिलोपार्जित जागा म्हणून त्या चौथऱ्यावर घर बांधायचे होते .त्याच्या पत्नीने त्याला कडवा विरोध केला .

शेवटी गावात एक जागा विकत घेऊन तिथे अरविंदने घर बांधले .गावातून वाहणाऱ्या वासिष्ठी नदीकाठी हे घर आहे .

आता गावात वीज आली आहे .अरविंदने घराच्या देखभालीसाठी एक माळी कुटुंब कायमचे आउटहाउसमध्ये ठेवले आहे .

जेव्हा कधी अरविंद येथे येतो तेव्हा तो त्याच्या बंगलीच्या गच्चीमध्ये उभा राहून वाहणाऱ्या  वाशिष्ठी नदीकडे पाहात असतो .

गच्चीत उभे राहून वाशिष्ठी नदीच्या पात्राकडे पाहणे हा त्याचा आवडता छंद आहे.

नदीच्या पात्राकडे पाहात असताना त्याला टीव्हीवर पाहिलेली त्याच्या नावाची आवाहन करणारी जाहिरात आठवते .     

त्यानंतरच्या पुढच्या सर्व घटना आठवतात .

*आपले आप्त दुर्दैवाने जळितकांडामध्ये सापडले आणि अधांतरी लटकत राहिले .*

*त्यांच्या मुक्तीला आपण कारणीभूत झालो याबद्दल त्याला आनंद व अभिमान वाटतो.*

*हिंमतपूर गावात तुम्ही गेल्यास तुम्हाला कुणीही जळका चौथरा व अरविंदरावांचा बंगला दाखवील.*

(समाप्त )

२५/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel