(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

असंच एक गाव होतं .नाव होतं हिम्मत नगर .गाव तसा मोठा होता .ब्राह्मण भंडारी कोळी तेली तांबोळी सुतार कुणबी थोडक्यात बारा  बलुतेदार गावात होते .एकेकाळी स्वातंत्र्यपूर्व काळात  ब्राह्मणांचा मोठा दरारा होता . बहुतेक सगळ्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या .पंचवीस तीस ब्राह्मण कुटुंबांपैकी तिघे चौघे स्वतः जमीन कसत असत .बाकी सर्वांच्या जमिनी कुळांकडे होत्या .ब्राह्मणांच्या कुटुंबातील माणसांची  संख्या वाढत गेली .येणाऱ्या  उत्पन्नात कुणाचेच नीट भागेना . हळूहळू  एकेक जण शहराकडे गेला.शिकला सावरला संपन्न झाला तिथेच स्थिर झाला.  प्रत्येक कुटुंबातील एखादा एखादा गावात कसाबसा जगत होता .कूळ कायदा आला आणि सर्व जमिनी कसणाऱ्यांच्या, कुळांच्या , मालकीच्या झाल्या.तग धरून राहिलेल्या  कुटुंबांनी शहरात स्थलांतर केले . घराकडे कुणाचेच लक्ष राहिले नाही .गावातील लोकांनी घराचे दगड चिरे वासे लाकूड लांबविले .दोन चार पावसाळ्यात घर जागच्या  जागी आडवे झाले.सर्व सामान कुसले किंवा चोरीला गेले . फक्त चौथरा शिल्लक राहिला . गावात असे पाचपंचवीस चौथरे ओसाड होते .घराभोवतालची झाडेही बेवारस होती .कुणीही यावे आणि आंबे फणस जांभळे काढून घ्यावीत .विचारणारा हटकणारा कुणीही नव्हता .इतर जातीतही खेडेगावातून शहराकडे माणसांचा ओघ चालूच होता.कारण एकच गावात भागत नाही .खाणार्‍या  तोंडांची संख्या वाढली 

या अनेक ओसाड चौथर्‍यांमध्ये एक चौथरा विलक्षण होता.तो जळित चौथरा म्हणून ओळखला जात असे .त्या चौथऱ्याचे कंपाऊंड जसेच्या तसे होते .एकही चिरा एकही दगड कुणीही काढून नेला नव्हता .चिरा काढण्याची कुणाचीही हिंमत नव्हती .एखाद्याने हिंमत केली तर तो वेडा होई, जिवंत रहात नसे, त्याचे काही तरी अशुभ होई,अशी अफवा होती . काहींना तसा अनुभव आला होता असे म्हणतात . त्या चौथर्‍या सभोवतालच्या कंपाउंडमधील झाडावरीलआंबे फणस जांभूळ जागच्या जागी पिकत गळून पडत कुसत आणि मातीत मिळून जात . वानर पोपट इतर पक्षी झाडावरची पिकी फळे खात असत. परंतु एकाही माणसाला कम्पाउंडच्या आत जाऊन फळे चोरण्याची खाण्याची हिंमत नव्हती.यदा कदाचित तसे केल्यास त्या माणसाचे काही तरी बरेवाईट होत असे.कधी तो तापाने आजारी पडे. कधी तो मानेवर भूत बसल्यासारखे वेडेचार सुरू करी.थोडक्यात त्या चौथऱ्याच्या कम्पाउंडच्या आत जाण्याची कुणाचीही हिंमत नव्हती.

खूप खूप वर्षांपूर्वी तो वाडा हसता खेळता नांदता होता.जमीनदारांचा वाडा म्हणून तो ओळखला जाई.प्रत्यक्ष पेशव्यांकडून त्यांना सारा वसुलीचे अधिकार मिळालेले होते .पुढे जमीनदारी गेली तरीही कांही जमिनी त्यांच्या ताब्यात होत्या . त्या वेळचे जमीनदार अण्णासाहेब अत्यंत शूर कर्मठ व उदार म्हणून ओळखले जात .गाव म्हटले माणूस म्हटला की कुठे ना कुठे मतभेद दुष्मनी आलीच.एके रात्री वाडय़ाच्या पुढील मागील दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या गेल्या .वाड्यातील सर्व मंडळी गाढ झोपेत होती .वाड्याला चारी बाजुनी आग लावण्यात आली. जुना वाडा कापरासारखा जळून गेला .त्यातील आठ दहा माणसंही त्याबरोबरच जळून गेली. अकस्मात जळून मृत्यू झाल्यामुळे असो किंवा आणखी काही कारणामुळे असो आतली माणसे  गतीला जाण्याऐवजी त्या वाड्याच्या म्हणजे  चौथऱ्याच्या परिसरातच बंदिस्त झाली .तेव्हापासून रोज मध्यरात्री तो वाडा सर्वार्थाने जिवंत होऊ लागला .  

रात्री अकरानंतर त्या रस्त्यावरून जाण्याची कुणाचीही हिम्मत नव्हती .रात्री बाराला वाडा जसाच्या तसा उभा राहतो. त्यात माणसाची जाग असते.मंत्रघोषाचे आवाज ऐकू येतात अशी अफवा होती . तू पाहिले का ? तू अनुभव घेतला का? असे विचारल्यास कुणीही  हो म्हणत नसे. जावून पाहू या का असे कुणी विचारल्यास कुणीही बरोबर यायला तयार नसे.जो तो म्हणे उगीच विषाची परीक्षा कशाला?बाकीच्या ओसाड पडलेल्या घरांचे सामान चोरीला गेले झाडावरील आंबे फणस चोरीला जात असत.परंतु या जळित वाड्याच्या जळित चौथऱ्याच्या एकाही चिर्‍याला हात लावण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. 

तर या वाड्यातील आत्मे बंदिस्त झाले होते .त्यांना मुक्ती हवी होती .ती कशी मिळणार केव्हा मिळणार कुणालाही काहीही कल्पना  नव्हती .

गावातील नांदत्या चौथर्‍यामध्ये एक चौथरा होता. एक घर होते.या वाड्यातील माणसांचे त्या घराशी नाते होते.चुलत चुलत का होईना परंतु नाते होते .हल्ली तिथे हरिभाऊ राहात असत . एके दिवशी रात्री हरिभाऊंच्या स्वप्नात अण्णासाहेब आले.त्यांनी ते व त्यांचे कुटुंबीय जे त्या रात्री वाड्यात होते  ते सर्व जळून मेले आणि आता अतृप्त आत्मे म्हणून ते तिथे वावरत आहेत.आम्हा सर्वांना सुटका हवी आहे तरी तुम्ही प्रयत्न करा म्हणून त्यांनी विनंती केली.हरिभाऊ दचकून जागे झाले.त्यांनी अण्णासाहेबांना कधी पाहिलेही नव्हते .तरीही त्यांनी अण्णासाहेबांना अण्णासाहेब म्हणून बरोबर ओळखले .

दुसऱ्या दिवसापासून हरिभाऊना एकच चिंता सतावू लागली.काय करावे? कुणाला विचारावे? एकदा त्यांना वाटे आपला काय संबंध? अापण या भानगडीत उगीच कशाला पडायचे?परंतु हरिभाऊ मृदू मनाचे होते .त्या आत्म्यांना सद्गती मिळावी अशी त्यांची इच्छा होती .आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना सतत वाटत असे.काय केले पाहिजे असा विचार करताना  त्यांना एका प्रसिद्ध ज्योतिषाची आठवण झाली .हा ज्योतिषी प्रश्न कुंडली मांडून बरोबर उत्तर देत असे .जन्मवेळ  बरोबर दिल्यास तो पत्रिका करून सर्व भूत भविष्य तंतोतंत वर्तवीत असे.  त्या ज्योतिषाचार्यांना भेटण्याचे हरिभाऊनी ठरविले.या ज्योतिषाचार्यांवर हरिभाऊंचा भरवसा होता. त्यांना त्यांचा चांगला अनुभवही आला होत। 

ते ज्योतिषी पंच्याहत्तर एेशी किलोमीटर अंतरावरील गावात राहत होते.त्यांच्याकडे जाऊन हरिभाऊ धडकले.त्यांना हरिभाऊनी सर्व स्वप्न व्यवस्थित सांगितले. त्याचबरोबर अण्णासाहेब, त्यांचा वाडा, तो जळल्याबद्दलची सविस्तर  ऐकीव हकीगत, त्यांचे त्या कुटुंबाशी असलेले नाते वगैरे सर्व हकिगत सांगितली.त्या ज्योतिषाचार्यांनी प्रश्न कुंडली मांडतो, विचार करतो मला काही पोथ्या  पाहाव्या लागतील, संदर्भ हुडकावे लागतील, तुम्ही दहा दिवसांनी या असे सांगितले.खात्रीलायक उत्तर मिळाल्यास तसे सांगेन किंवा केवळ अंदाज सांगेन,असे म्हणून त्यांना निरोप दिला .

दहा दिवसांनी फोन करून हरिभाऊ पुन्हा त्या ज्योतिषाचार्यांकडे गेले .ज्योतिषाचार्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. त्यांनी अडकलेल्या कुटुंबाला मुक्ती देण्याचा मार्ग सापडला आहे म्हणून सुरुवातीलाच सांगितले.मात्र मार्ग कठीण आहे. भरपूर पैसा लागेल.मी उपाय सुचवतो तो कसा अंमलात आणता येईल ते तुम्ही पाहा असे सांगितले .

त्यांनी सुचविलेला उपाय खरेच भयंकर होता .

दशग्रंथी, बहुशिक्षित, चार वेदांचे पठन केलेले, व्युत्पन्न ब्राह्मण हे काम करू शकतील .त्या ब्राह्मणांचे जीवन धोक्यात येईल .कदाचित त्याना मृत्यू स्वीकारावा लागेल .त्या ब्राह्मणाना सर्व कल्पना अगोदर दिली पाहिजे .ते स्वखुशीने येण्याला तयार झाले पाहिजेत. या कामासाठी निदान निदान तीन ब्राह्मण पाहिजेत . चार मिळाले तर उत्तम .

अश्या व्युत्पन्न ब्राम्हणाने शुचिर्भूत होऊन त्या चौथऱ्यावर जावे .बरोबर शंकराची पिंडी न्यावी. स्वतः भोवती पाण्याचे मंडल करावे.असे केल्यास दुष्ट आत्मे त्या पाण्याच्या मंडलाच्या आत येऊ शकणार नाहीत.

नंतर मृत्युंजय  मंत्राच्या पठणाला सुरुवात करावी .हा मंत्रघोष अखंडित चौवीस तास सुरू राहिला पाहिजे .एका व्युत्पन्न ब्राह्मणाची जागा दुसरा व्युत्पन्न ब्राह्मण घेईल.मंत्रघोषामध्ये कोणत्याही परिस्थितीत  खंड पडता कामा नये . खंड पडल्यास तोपर्यंत केलेले सर्व श्रम निष्फळ ठरतील एवढेच नव्हे तर अश्या  ब्राह्मणांच्या जिवाला धोका संभवतो .

यासाठी पैसा भरपूर खर्च होईल .त्या तीन ब्राह्मणांचे कुटुंब पोसावे लागेल. त्या कुटुंबाची सर्वार्थाने जबाबदारी घ्यावी लागेल .मुलांचे शिक्षण मुलींची लग्ने इत्यादी इत्यादी .

पुढे ते ज्योतिषाचार्य म्हणाले .पहा विचार करा एवढे सर्व तुम्ही पेलू शकाल का ?मुळात तुमचा यांच्याशी संबंध काय?ते तुमचे लांबचे चुलत चुलत नात्यातील कुटुंब.ते तुमच्या स्वप्नात आले एवढाच संदर्भ .नीट विचार करून पाउल उचला .कदाचित तुम्हालाही धोका संभवतो .

(क्रमशः)

२४/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel