(ही कथा काल्पनिक आहे नाव गांव किंवा आणखी  कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आईला घेऊन येथे यायचे. एक महिनाभर रहायचे. योग्य औषधोपचार करायचे.आणि त्याचप्रमाणे हे पाणी औषधी कां आहे?औषधी गुणधर्मामागे कोणते रहस्य आहे? या झऱ्याचा ज्या तलावात उगम होतो तिथपर्यंत जाता येते का?  तो तलाव आणखी जास्त औषधी आहे का? हे पाणी नेऊन  शहरात त्याचा औषध म्हणून वापर करता येतो का?  या सर्वाचे संशोधन करायचे असे मी माझ्या स्वभावानुसार ठरविले.

करवंद येथील वैदूने आईला बरे होण्यासाठी इथे निदान एक महिना कदाचित जास्तही राहावे लागेल असे सांगितले होते .मला दीड दोन महिने रजा मिळणे जरा कठीणच होते .मी एका  विश्वविद्यालयात  प्राध्यापक म्हणून काम करीत होतो .मी रजेवर गेल्यास माझा  विषय शिकविण्यासाठी पर्यायी योजना होणे जरा कठीणच होते . त्या उप्पर मी रजेवर गेल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. तेव्हां उन्हाळ्याची सुटी लागल्यावर नंतरच आईला घेऊन तिथे जाणे योग्य ठरले असते.मी करवंद  गावाचा शोध घेण्याला नाताळमध्ये गेलो होतो.  

शेवटी सुटी लागल्यावर मी आईला घेऊन करवंद गावाकडे प्रयाण केले . मदतीला बरोबर दोन नर्सेस एक सैपाकी व पत्नी यांनाही घेतले होते.तेथे जवळजवळ दीड महिना तरी रहावे लागणार होते .माझा केवळ आईवर उपचार एवढाच हेतू नव्हता .जर आईला बरे वाटले असते तर या झर्‍याचे पर्यायाने तलावातले पाणी औषधी का आहे त्याचाही शोध मला घ्यायचा होता .या सगळ्यासाठी वेळ लागणार होता .

करवंद बुद्रुक गावातील झोपडीवजा हॉस्पिटल मी अगोदरच  येणार असे सांगून रिकामे राहील असे पाहिले होते.तर अशा प्रकारे शेवटी आम्ही करवंद बुद्रुक येथे दाखल झालो.त्या वैदूने जांभळाच्या  लाकडाचे टब बनविले होते.टब झऱ्याच्या पाण्याने भरून सकाळ संध्याकाळ आईला त्यामध्ये अर्धा तास पडून राहावे लागे. नंतर झर्‍याच्या पाण्यानेच  स्नान घातले जाई. वैदू त्यांच्या जवळील आणखीही काही औषधे टबमध्ये घालत असे .पण हा केवळ देखावा असावा असा माझा अंदाज होता .पाण्यामध्ये जबरदस्त औषधी गुणधर्म असले पाहिजेत .आईला पिण्यासाठी पाणी त्याच झर्‍याचे दिले जात होते .

इतरांसाठी तेथे आणखी दोन झरे होते .त्यातील पाण्याचा वापर इतर सर्व कामांसाठी केला जात असे .या झऱ्याचा वापर केवळ औषध योजना म्हणून करीत असत .

जे पाणी औषध म्हणून वापरले जाई त्याला एक विशिष्ट वास येत होता .झर्‍याजवळ गेल्यावर वाहत्या पाण्यालाही विशिष्ट वास येत होता .हा वास कसला ते मला ओळखता येत नव्हते .आईच्या म्हणण्यानुसार हा वास काहीतरी कुजल्यानंतर जसा येतो तसा होता .प्रथम तर आई या पाण्यात अर्धा तास पडून राहायला तयार नव्हती. याला कारण पाण्याला येणारा तो विशिष्ट वास होता.शेवटी अौषध म्हणून  आई त्या पाण्यात सकाळी अर्धातास व संध्याकाळी  अर्धा तास पडून राहण्याला, टबबाथ घेण्याला तयार झाली. पिताना सुद्धा तोंड वेडेवाकडे करीत आई मोठ्या कष्टाने ते पाणी पीत असे.तिला पूर्ण बरे व्हायचे होते . बरे होण्याची ही शेवटची आशा होती .

आम्ही येथेआलो त्यावेळी आईची परिस्थिती बिकट होती. तिला संधीवातामुळे काहीच हालचाल करता येत नव्हती .सर्व सांधे आखडून गेले होते .कुणाच्या आधाराशिवाय ती दोन पावले सुद्धा टाकू शकत नव्हती.काही वेळा तर तिला उचलून न्यावे लागे. हाताची बोटे आखडल्यामुळे ती स्वतःच्या हातांनी जेवू शकत नव्हती.तिला भरवावे लागे.किंबहुना तिची बहुतेक सर्व कामे नर्सेसना करावी लागत होती .सांधे आखडल्यामुळे ती विशेष हालचाल करू शकत नव्हती.

अौषध योजना सुरू झाल्यावर तिच्या प्रकृतीत आश्चर्यजनक फरक पडू लागला .आठ दिवसांत ती दुसऱ्याच्या आधाराने हळूहळू चालू लागली .स्वतःच्या हाताने चमच्याने जेवू लागली.आणखी थोड्या दिवसांत ती कुणाच्याही आधाराशिवाय चालू लागली .चमच्याशिवाय बोटानी तिला जेवता येऊ लागले.काही दिवसांतच ती स्वतः टबमध्ये बसू व उठू लागली.तिचे तिला कपडे काढता घालता येऊ लागले.झोपडी बाहेर येऊन खुर्चीमध्ये ती बसू लागली .हळूहळू नर्सेसना विशेष काम उरले नाही . आईमधील सुधारणा पाहून आम्ही सर्वच प्रोत्साहित व आश्चर्यचकित झालो .आपण अगोदर इथे का आलो नाही असे आम्हाला वाटू लागले .आईला झपाटय़ाने बरे वाटत असल्यामुळे अाम्हा सर्वांचा मूड पिकनिकला आल्यासारखा झाला. या गावाचा शोध आपल्याला अगोदरच का लागला नाही म्हणून  असे आम्हाला वाटू लागले . महिना दीड महिन्यांमध्ये आई पूर्वीसारखी पूर्ण बरी होणार याची आम्हाला खात्री पटली.प्रथम आम्ही झऱ्याच्या पाण्याबद्दल संशयी होतो.  झर्‍याचे पाणी औषधी आहे यावर आता आम्हा सर्वांचा नि:संशय विश्वास बसला .

पाणी औषधी आहे याची खात्री पटल्यावर मी माझ्या दुसऱ्या कामाला सुरुवात केली .औषधी पाण्याचे रहस्य काय ते मला शोधून काढायचे होते . जर डोंगरातून  झरा पडत असता,तर पृथ्वीच्या पोटातील खनिजे व इतर अवशेष त्या पाण्यामध्ये विरघळतात आणि त्यामुळे पाणी औषधी बनते असे मानता आले असते.इथे एका तलावातून या झर्‍याचा उगम होत होता.अर्थात तलावाला आतून असलेल्या  झर्‍यामध्ये भूगर्भातील असंख्य अवशेष विरघळतात आणि त्यामुळे पाणी औषधी बनते असे म्हणता आले असते.पाण्याला येणार्‍या  विशिष्ट वासामुळे मला वेगळाच संशय येत होता.

मी तलावाला भेट देण्याचे ठरविले .एक दिवस मी तलावाच्या दिशेने सकाळी उठून चालू लागलो .अर्धा एक तास अधूनमधून थांबत थांबत उभा चढ चढून गेल्यावर मी तलावापाशी आलो.दूरवर बसून मी तलावाचे निरीक्षण करीत होतो .सर्वसाधारणपणे कोणत्याही तलावाच्या आसपास पक्षी आढळून येतात .येथे पक्षी अभावानेच होते .सर्वत्र सामसूम होती.येथे काहीतरी धोकादायक आहे असे प्राण्यांना वाटत असावे. कदाचित त्यांचा तसा अनुभव असावा. त्या दिवशी मी तलावाजवळ गेलोच नाही .लांब अंतरावरून फक्त लक्ष ठेवून होतो .त्या तलावाजवळ असे काही भीतीदायक असावे कि त्यामुळे तिथे कुणीही जिवंत प्राणी फिरकत नव्हता.ते भीतीदायक काय ते मला शोधून काढायचे होते .पाणी औषधी असण्याचा त्याच्याशी कदाचित संबंध असण्याचा संभव होता .

दुसऱ्या दिवशी मी तलावाजवळ जाऊन निरीक्षण करण्याचे ठरविले .मी तलावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. एवढ्यात उंचावरून एक पक्षी तळ्याच्या काठी येऊन बसला .तलावाच्या आसपास जिवंतपणाची ही पहिलीच खूण मी पाहिली .तळ्याचा आकार साधारण अर्धा ते पाउण चौरस किलोमीटर असावा. पक्षी पाणी पित असताना व चोचीने अंगावर पाणी उडवत असतांना एकाएकी तो त्या तळ्यामध्ये ओढला गेला आणि नंतर अदृश्य झाला .त्याला तळ्यांमध्ये कुणी ओढले ते मला लांबून कळले नाही .मी जवळ जाऊन स्तब्धपणे पाहात होतो.कुठेही कसलीही हालचाल दिसत नव्हती .सर्व काही शांत शांत होते .पक्षाचा कुठेही मागमूस दिसत नव्हता .

तिसऱ्या  दिवशी मी पुन्हा तलावावर जाण्यासाठी निघणार एवढ्यात मोठा गलका झर्‍याच्या दिशेने ऐकू आला. मी धावतच तिकडे गेलो .कड्यावरून झर्‍याच्या प्रवाहाबरोबर  काही हाडे खाली पडली होती .ती हाडे प्रचंड झिजलेली होती.ती हाडे माणसाची होती .तलावात केव्हातरी एक माणूस मृत्यू पावला होता.त्याच्या सर्व अवयवांचे त्या तलावात पूर्ण विघटन झाले होते.हाडेही हळूहळू झिजत गेली होती .आज कोणत्याही कारणाने असो ती प्रवाहाबरोबर वाहत आली होती .

माझ्या मनात एक विलक्षण कल्पना आली .

(क्रमशः)

१५/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel