( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)  

समुद्रकिनाऱ्याजळून सागरी  हमरस्ता (कोस्टल हायवे) गेला होता.त्यावरून फिरत असताना त्यांना एक टेकडी दिसली.

ही टेकडी गावाबाहेर बरीच लांब होती.बंदराच्या गर्दीपासून दूर सुमारे दहा किलोमिटर अंतरावर ती होती. त्या टेकडीवर एक टुमदार हवेली बांधलेली होती. त्या हवेलीला व कम्पाऊंडच्या फाटकाला भक्कम कुलूप लावलेले होते.टेकडीवर झाडी होती.त्या झाडीत बंगला लपलेला होता.टेकडीला तारांचे कुंपण घातले होते.त्या कुंपणाच्या फाटकाला   एक भक्कम कुलूप लावलेले होते. सागरकिनारा रस्त्याने जाताना बंगला अस्पष्ट दिसत असे.चटकन त्याची जाणीव होत नसे.एका बाजूला टेकडी व त्यावर बंगला होता. दुसर्‍या  बाजूला समुद्र किनारा  होता.चौकशी करता उस्मान शेठ नावाच्या एका श्रीमंत माणसाने सुट्टीत येथे येऊन राहण्यासाठी हा बंगला बांधला आहे असे कळले.त्याने टेकडीचा परिसर विकत घेतला.प्रथम बंगला बांधला.कांही झाडे अगोदरच होती. कांही नंतर लावली.अशी माहिती कळली.आणखी कांही माहिती मिळेल या आशेने सुधाकरनी त्या टेकडीला,बंगल्याला प्रदक्षिणा घालायचे ठरवले.येथे आपल्याला कांहीतरी मिळेल असे त्यांची मनोदेवता त्याना सांगत होती.बंगल्याच्या पाठीमागे टेकडीचा थोडा कडय़ासारखा तुटलेला भाग होता.त्याच्या पलीकडे आणखी एक डोंगर होता.त्या डोंगरावरून टेकडी,निरनिराळ्या  वाड्या व  समुद्र दिसत असे.त्या जागेवरून सर्व प्रदेश प्रेक्षणीय व आकर्षक दिसत असे.सुधाकर त्या टेकडीवर एका झाडाखाली बसले होते व सर्व नजारा डोळ्यात साठवून घेत होते. टेकडीकडे बंगल्याकडे पाहात असताना ते केसचा विचारही करीत होते.इतक्यात त्यांना लांबून दोन माणसे चालत येताना दिसली.आपण कुणाच्या लक्षात  येवू नये म्हणून ते तिथेच जवळ असलेल्या दोन झुडपामागे लपले.ते तिथे आहेत हे  लांबून कुणाच्या लक्षात येण्यासारखे नव्हते.ती दोन माणसे पायवाटेने चालत बंगल्याच्या मागच्या बाजूला आली.ती कुठे जात आहेत ते सुधाकर पाहात होते.त्यांच्याकडे पाहत असता असता ती एकदम अदृश्य झाली.सुधाकरानी क्षणभर डोळे चोळले.बंगला असलेल्या टेकडीवर ती माणसे चढताना दिसतील असे त्यांना वाटत होते किंवा टेकडीला वळसा मारून पुढे जातील.परंतु तसे कांहीही न होता ती माणसे टेकडीच्या मागे चालता चालता अदृश्य झाली होती.

या सगळ्याच गोष्टी संशयास्पद होत्या.टेकडीच्या मागे जवळ जावून निरीक्षण केले पाहिजे असे सुधाकरानी ठरविले.

सुधाकर सावधपणे ती माणसे जिथे अदृश्य झाली होती तिथे गेले.तिथेही तारांचे कुंपण होते. सर्वत्र दाट हिरवळ उगवलेली हाेती.टेकडीवर जणूकांही  हिरवळ मुद्दाम शोभा म्हणून लावली आहे असे वाटत होते."सुंदर हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालींचे" ही कविता त्याना आठवली.सुधाकरांचा पोशाख व फिरत असतानचा आवेश टुरिस्टसारखा होता. ते पोलिसात आहेत असा कुणालाही संशय येणे शक्य नव्हते.मध्येच हिरवळ कृत्रिम आहे असा त्याना संशय आला. जवळ जाऊन त्यांना निरीक्षण  करायचे होते.मध्ये तारांचे कुंपण होते.इथे लक्षात येणार नाही असा दरवाजा कुंपणात होता.तो उघडून सुधाकर आंत गेले. जवळ जाऊन निरीक्षण करता ती कृत्रिम हिरवळ असून ती दरवाजावर बेमालूमपणे चिकटवलेली आहे असे लक्षात आले.

तिथे एक छोटासा दरवाजा होता.तो दरवाजा उघडून भुयारात जाता येत होते.दरवाजा इतर कुणाच्या लक्षात आला नसता.एरवी सुधाकरांच्याही लक्षात आला नसता.त्या दरवाजालाही एक कळ होती.ती चटकन लक्षात येत नव्हती.ती विशिष्ट प्रकारे दाबल्यावर दरवाजा उघडत असे .त्यांनी तिथे दोन माणसे अदृश्य होताना नुकतीच पाहिली होती.गुप्त दरवाजाचा संशय त्यांना आला होता.कळ दाबून हळूच दरवाजा उघडून सुधाकर भुयारात  शिरले.त्यांनी आपले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हातात घेतले होते.कोणताही धोका वाटल्यास त्यांना त्याचा उपयोग करता येणार होता. आपण हे साहस उगीचच अनाठायी करीत नाहीना असा विचार त्यांच्या मनात आला.निदान एखादा पोलीस आपल्याबरोबर हवा होता.तो बाहेर थांबला असता.कांही धोका झाल्यास त्याने पोलिस फोर्स आणून आपली सुटका केली असती.आता ते सुधाकर नव्हते.गुलछबू प्रशांत होते. मनात आलेला विचार झटकून सुधाकर भुयारातून पुढे चालत गेले.भुयारात अस्पष्ट प्रकाश होता.पायर्‍या चढत जावे लागत होते.ते भुयार त्या टुमदार बंगल्यामध्ये जात होते.बंगल्यातून बोलण्याचा आवाज येत होता.  

सुधाकरना एकूण सर्व रॅकेट लक्षात आले होते.ते गुपचूप आल्या वाटेने परत आले.तो चोरदरवाजा इतका बेमालूम होता कि डोंगरावर सर्वत्र हिरवळच उगवली आहे असे वाटत असे.त्या हिरवळीत तो दरवाजा सफाईदारपणे लपवला होता.

टेकडीवर ते बसले होते त्या झाडावर त्यांनी इन्फ्रारेड सीसीटीव्ही बसविला.हा कॅमेरा बसविताना कोणालाही कसलाही संशय येता कामा नये याची काळजी त्यांनी घेतली.आता त्या गुप्त दरवाजातून तिथे येणारे जाणारे सर्व दिसणार होते.होणार्‍या  सर्व घटना लक्षात येणार होत्या.त्यावर काढलेले फोटो,फिल्म,नेट मार्फत कंट्रोल रूममध्ये दिसणार होती.कसलीही संशयास्पद हालचाल लगेच लक्षात येणार होती. कंट्रोलरुममध्ये कॅमेर्‍यामधील प्रक्षेपणाद्वारे त्या दरवाजातून दोन मुली आंत जाताना दिसल्या.त्या मुली गुंगीमध्ये असाव्यात,कसल्या तरी अमलाखाली असाव्यात,असे वाटत होते.त्या पडू नयेत म्हणून त्यांना धरून नेले जात होते. 

असेच चार सहा दिवस गेले.पोलिस फोर्स घेऊन बंगल्याला वेढा घालावा आणि आंत असलेल्या सर्वांना अटक करावी असे राहून राहून सुधाकरना वाटत होते.त्या बंगल्यात मुलीना ठेवल्याची खात्री पटली होती.वासंती व हरवलेल्या मुली तिथेच सापडणार याबद्दल सुधाकरांची खात्री होती.सुधाकराना संपूर्ण रॅकेट ताब्यात हवे होते.

शिरगाव एक उत्तम बंदर होते.तिथे गलबते,स्वयंचलित जहाजे,धक्क्याला लागत असत.मोटारबोटी स्पीड बोटी होत्या.कुणालाही कळू न देता पोलिसांनी सर्वत्र सक्त नजर ठेवली होती.हाय फाय दुर्बिणीतून बंगल्यावर नजर ठेवली होती.चुकीचे एकच पाऊल आणि संपूर्ण रॅकेट निसटले असे व्हायला नको होते.

एक दिवस बंगल्यातून मुली बोटीच्या धक्क्यावर जात असलेल्या दिसल्या. त्या वेळीही त्या अर्धवट गुंगीत होत्या.एकाचवेळी सर्वांना अटक करण्यात आली.त्यामध्ये बोट,बोटीचा कप्तान,बोटीतील नोकरवर्ग,अर्धवट  गुंगीत असलेल्या मुली, बंगल्यातील नोकरचाकर,सर्व जण होते.या मुलीमध्ये वासंतीही होती.

तिने पुढील हकिगत सांगितली.

ती सागर किनाऱ्यावर रात्री दहा वाजता एकटी फिरत होती.किनाऱ्यावर तुरळक माणसे होती.तिच्या मागून एक जीप आली. समुद्राच्या गर्जनेमुळे जीप येत असल्याचे तिच्या लक्षात आले नाही.  तिच्या कांही लक्षात येण्याअगोदर तिला बलपूर्वक जीपमध्ये खेचून घेण्यात आले.नंतर तिच्या नाकावर  क्लोरोफॉर्मचा रुमाल दाबून धरण्यात आला. पुढे काय झाले ते तिला अर्थातच माहीत नव्हते.ती त्या टेकडीवरील बंगल्यातच शुद्धीवर आली.ती कुठे आहे हे तिला कळत नव्हते.ती शहराच्या इतकी जवळ आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती.तिला ठार मारण्याची भीती दाखविण्यात येत होती.त्याचप्रमाणे तिच्यावर अत्याचार करण्याची धमकीही देण्यात येत होती.या धमकीच्या दहशतीच्या जोरावर तिच्याकडून तिच्या घरी फोन करण्यात येत होते.ती सर्व कांही आलबेल आहे.मी अकस्मात मालवणला मैत्रिणींबरोबर गेली आहे वगैरे गोष्टी सांगत असे.प्रत्यक्षात ती शिरगावपासून हाकेच्या अंतरावर बंदिस्त होती.तिची व्यवस्थित सुटका झाल्याबद्दल रावसाहेब चव्हाणानी सुधाकरचे विशेष आभार मानले.रावसाहेब चव्हाण हे एक बडे प्रस्थ होते.त्यांची मुलगी पळवण्यात आली असे त्यांच्या लक्षात आले असते तर तिच्या शोधासाठी त्यांनी आकाशपातळ एक केले असते.ते टाळण्यासाठी तिच्याकडून ती व्यवस्थित असल्याबद्दलचा फोन केला जात होता.        

त्या सर्वांच्या स्वतंत्रपणे जबान्या घेण्यात आल्या.मुंबईच्या शेठलाही अटक करण्यात आली.विमानमार्गे परदेशात पळण्याच्या प्रयत्नात तो होता.

पाेलिसांनी सरकारी वकिलांमार्फत कोर्टासमोर पुढीलप्रमाणे केस मांडली:

मुली पळविण्याचे व त्यांची निरनिराळ्या प्रकारे विल्हेवाट लावण्याचे हे एक मोठे रॅकेट आहे.त्याचा प्रमुख उस्मान शेठ आहे.तो मुंबईला असतो.आपल्या हस्तकांमार्फत तो सर्व काम करीत असतो.आपल्या धंद्याला सोयीचे पडावे म्हणून त्याने शिरगाव येथे एका टेकडी विकत घेऊन त्यावर  बंगला बांधला.या बंगल्याला पुढच्या बाजूने मोटारीचा रस्ता होता.फाटक,पोर्च,सर्व थाटमाट, होता.मुंबईच्या एका धनिकाने विश्रांतीसाठी हा बंगला बांधला आहे असा एकूण थाट होता.उस्मान शेट आपल्या कबिल्यासह अधूनमधून येथे येऊन राहतही असे.या सर्वामागे कुणालाही कसलाही संशय येऊ नये असा विचार व व्यवस्था होती.

बंगला बांधल्यावर गुप्तपणे त्यातून एक भुयार बांधण्यात आले.हे भुयार पाठीमागच्या बाजूला उघडत असे.डोंगराच्या मागच्या बाजूला  नैसर्गिक व कृत्रिम हिरवळ लावण्यात आली होती.यामध्ये एक छुपा दरवाजा होता.हा दरवाजा इतका बेमालूम होता की तो कोणाच्याही लक्षात येत नसे.बहुतेक सर्व बेकायदेशीर व्यवहार या छुप्या दरवाजातून होत असे.

मुलींना नाना प्रलोभने दाखवून कोणत्या ना कोणत्या मार्गाने वश करण्यात येत असे.साम बल दाम दंड भेद सर्व मार्ग वापरले जात असत  त्यांना गुंगीचे औषध देऊन किंवा क्लोरोफॉर्म देऊन या बंगल्यात आणले जात असे.एकदा मुली बंगल्यात आल्या की त्यांची सुटका नसे.त्यांना सतत गुंगीमध्ये ठेवण्यात येई.गुंगीत असतानाच त्यांना बोटीत नेण्यात येई.कांहीवेळा आंतरराष्ट्रीय सागर हद्दीत परदेशी बोट असे.त्यात त्या मुलींना चढवून परदेशी नेण्यात येई.तिथे त्यांना धनिकांना विकण्यात येत असे.त्यांचा वापर जबरदस्तीने  विवाह करण्यासाठी,वेश्या व्यवसायासाठी,अनैसर्गिक कृत्यांसाठी केला जात असे.

ज्याप्रमाणे मुलींची परदेशात विक्री केली जात असे.त्याचप्रमाणे देशांतर्गतही कोचीन,हैदराबाद, कोलकाता, सिमला, शिलाँग,मुंबई, दिल्ली,अशा विविध शहरात विक्री केली जात असे.किंवा त्यांना अनैतिक धंद्याला लावण्यात येई.

उस्मानशेट सकट तीस चाळीस जण एकूण आरोपी होते.बंगल्यात काम करणारे नोकर,मुलींना फूस लावून त्यांना गुंगीचे औषध देऊन किंवा क्लोरोफॉर्मचा वापर करून बंगल्यात आणणारे दलाल,मोटारचालक, बोटचालक,आणि सर्वात शेवटी परंतु पहिल्या नंबरवर उस्मान शेट,अशी ही टोळी होती.

प्रथम खटला स्थानिक कोर्टात, तेथून हायकोर्टात, शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेला.काहींना जामीन मिळाला. काहींना मिळाला नाही.उस्मान सेठचा पासपोर्ट व्हिसा सर्व जप्त करण्यात आले होते.त्याने एकदा अयोग्य मार्गाने परदेशी पळण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी त्याच्यावर स्वतंत्र खटला भरण्यात आला.त्याचा जामीनही रद्द करण्यात आला.

*जवळजवळ आठ दहा वर्षे हा खटला निरनिराळ्या कोर्टात चालला.*

*उशिरा न्याय म्हणजे न्याय नाकारणे होय हे तत्त्व कितीही जण सांगत असले,सर्वांना ते मान्य असले, तरी प्रत्यक्षात व्यवहारात असंख्य अडचणींमुळे न्याय उशिरा मिळतो.*

*शंभर अपराधी सुटले तरी चालेल परंतु एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये हे तत्त्व कितपत बरोबर आहे याची शंका येऊ लागते.*

*निरपराध्याला शिक्षा होणार नाही परंतु अपराध्याला लवकर शिक्षा होईल अशी कांहीतरी न्यायव्यवस्था पाहिजे.*

*अशी परिस्थिती आपल्या देशात कधी निर्माण होईल तो सुदिन होय.*

(समाप्त)

५/८/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel