( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

चोरांना पकडण्यासाठी एखाद्या खंबीर हुशार इन्स्पेक्टरची गरज होती.

यावेळी इन्स्पेक्टर सुधाकर अमरावतीला कार्यरत होते.

त्यांची बदली कृषीनगरला केवळ या कामासाठी करण्यात आली.

आतापर्यंत  इन्स्पेक्टर सुधाकरनी विविध गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे केला होता.त्यासाठी त्यांनी कोणतेही धोके स्वीकारले होते.कांही वेळा गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.त्यातून ते सहीसलामत बचावले होते.त्यांना लाच देऊन खरेदी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.लांच देण्याचा प्रयत्न करणारे  जाळ्यात सापडून त्याना शिक्षा झाल्या होत्या.     

या केसचा तपासही त्यांच्या खात्यावर आणखी एक यशस्वी तपास म्हणून नोंदला जाईल अशी आशा होती.   

सुधाकरनी चार्ज घेतल्यावर त्या रस्त्याची व्यवस्थित पाहणी केली. त्यासाठी त्या रस्त्यावरून त्यांनी दोन तीन चकरा मारल्या.मधे मधे उतरून ते दोन्ही बाजूचे निरीक्षण करीत होते.स्वतःशीच कांही गोष्टींची नोंद घेत होते. आतापर्यंत कोणत्या ठिकाणी लूट केली गेली, मोटारी पळविल्या गेल्या,ती सर्व माहिती गोळा केल्यार त्या जागांचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्यावर त्यांनी त्याचा त्यांच्या वैयक्तिक उपयोगासाठी,एक तक्ता (चार्ट) बनविला.या चार्टवरून आणि केलेल्या निरीक्षणांवरून त्यांनी पुढील निष्कर्ष काढले.

१) त्यांच्या असे लक्षात आले की कृषीनगर व जुईनगर या दोन्ही शहरांपासून पंधरा ते पस्तीस किलोमीटर एवढय़ा अंतरात सर्व घटना घडल्या होत्या.या दोन्ही शहरांच्या बाजूच्या पंधरा किलोमीटरमध्ये एकही घटना घडली नव्हती.घटना न घडण्याचे एक कारण पुढील प्रमाणे असू शकते.

यदा कदाचित लूटमार केलेल्या व्यक्तीने किंवा लूट केली जात आहे हे लक्षात आलेल्या  आणखी कुणी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला तरी ते आपल्याला पकडायला येईपर्यंत आपल्याला "नौ दो ग्यारह" होता यावे. हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून एखाद्या व्यक्तीला फेकून देताना ते त्याचा मोबाइल काढून घेत असत.त्यामुळे संपर्क साधणे कठीण होते.तरीही एखादा आपल्याला बंधनातून मुक्त करून घेण्यात यशस्वी झाला,त्याने रस्त्यावर येऊन एखादी गाडी थांबविण्यात यश मिळविले,त्याला सर्व हकिगत सांगून ,त्याने त्याचा मोबाईल वापरून पोलिस स्टेशनशी संपर्क साधला,तरी पोलिस सतर्क होऊन तपास सुरू करीपर्यंत आपल्याला पाेलिसांना सापडणार नाही अशा प्रकारे मुद्देमाल लपविता यावा.तसे शक्य झाले नाही तर मुद्देमाल तसाच सोडून स्वतःला लपविता यावे.घटना पाहणारा दुसरा कुणी नसेल याचीही काळजी ते घेत असत.तरीही एखाद्याने ती घटना पाहिली आणि पोलिसांना कळवले तरी स्वत:ला लपविता यावे एवढा अवधी मिळेल याची काळजी ते घेत असत.  

२)दुसरा निष्कर्ष त्यांनी असा काढला की या दोन्ही शहरातील गॅरेजेसचा बहुधा यामध्ये सहभाग नसावा.कारण घटनेपासून अंतर जेवढे दूर तेवढा जास्त वेळ मोटार गॅरेजमध्ये नेण्यासाठी लागणार. याचाच अर्थ माळरानावर कुठेतरी हे सर्व काम करण्यात येत असावे.तरीही त्यांनी दोन्ही शहरांतील सर्व गॅरेजेसची कसून चौकशी केली होती.त्यांना कांहीही संशयास्पद सापडले नव्हते.      

३)तिसरा निष्कर्ष त्यांनी असा काढला की या चोरांजवळ पोलिस जीप गस्त घालण्यासाठी येत आहे,तरी सावधान याचा इशारा कोणत्यातरी यंत्रणेमार्फत मिळत असावा.गस्त घालण्याच्या वेळा निश्चित नव्हत्या.त्या सतत बदलण्या येत असत.तरीही चोर्‍या, लूटमार, होतच होती.     

४)लुटलेला माल शहरात न नेता तो दुसरीकडेच कुठेतरी एखाद्या  माळरानावरील एखाद्या  गुप्त ठिकाणी ठेवण्यात येत असावा.कारण अंतर जेवढे जास्त दूर तेवढा तो माल किंवा पळविलेली मोटार शहरात नेण्यासाठी लागणारा वेळ जास्त.पोलिस गस्त घालीत असताना सापडण्याची शक्यता जास्त.

गस्त घालण्यासाठी पोलिस येत आहेत हे एखादा पोलीस कळवीत नसेल ना असा त्यांना प्रथम संशय आला. 

त्यांनी प्रथम दोन्ही पोलिस स्टेशनमधील पोलिसांची त्यांच्या लक्षात येणार नाही अशा पध्दतीने बारकाईने चौकशी केली.त्यांचे मोबाइल नंबर सुधाकरांजवळ होतेच.मोबाइल कंपनीमार्फत व लँडलाइन बीएसएनएल कंपनीची होती त्यामार्फत त्यांनी कॉल रेकॉर्ड तपासले.शक्य असेल तिथे संभाषण  मिळाले तर त्याचेही निरीक्षण केले.

एखादा पोलिस गुन्हेगाराना जीप येत असल्याबद्दलची माहिती देत असेल असा कोणताही पुरावा त्यांच्या हाती लागला नाही. 

पोलीस जीप गस्तीसाठी निरनिराळ्या वेळी जात होती.त्यामुळे गस्तीची वेळ टाळून लूट करणे शक्य नव्हते.जीप गस्त घालण्यासाठी येत आहे सावधान हे त्यांना कळत होते.

दोन्ही शहरांच्या बाहेर कुठेतरी सीसीटीव्ही बसविले गेले असावेत. रात्री घटनांची प्रत्येक क्षणी  नोंद होऊन ती तात्काळ गुन्हेगारांना कळत असली पाहिजे.यासाठी त्यामध्ये इन्फ्रारेड यंत्रणा असली पाहिजे.त्यामुळे पोलीस जीप दिसताच किंवा आणखी एखादे वाहन दिसताच त्याची लगेच माहिती गुन्हेगारांना कळत होती.त्याप्रमाणे ते आपली योजना आखत होते.अश्या  निष्कर्षावर शेवटी येणे भाग होते.

जवळच्या परिसरात कुठे सीसीटीव्ही बसविले असतील तर त्यांची निश्चित जागा, संख्या, कळावी यासाठी एक नवीनच उपकरण पोलीसाना उपलब्ध झाले होते.त्याचा वापर करून त्यांनी दोन्ही शहरांच्या बाहेर कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत हे शोधून काढले.सीसीटीव्ही बसविण्यासाठी झाडांचा वापर करण्यात आला होता.

त्यांनी ते सीसीटीव्ही काढून घेतले नाहीत.त्यामुळे गुन्हेगार सावध झाले असते.त्यांनी लुटमार कदाचित काही काळासाठी,किंवा कायमची बंदही केली असती.गुन्हेगार सापडणे महत्त्वाचे होते.  

मोटार पळविल्यावर ती कुठे नेली जाते ते माहीत करून घेण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली.दोन्ही बाजूला पोलिसांचे चेकनाके होतेच.मोटार ट्रक टेम्पो कोणतेही वाहन तेथून जाताना वाहन चालकाला किंवा आणखी कुणालाही न कळता त्या वाहनाला चिप बसविली जाईल अशी व्यवस्था केली.ही व्यवस्था दोन्ही बाजूना करण्यात आली.दुसऱ्या शहरात वाहन शिरताना ती चिप काढून घेण्यात येत असे.चिपमुळे वाहनाचे स्थान (लोकेशन)क्षणोक्षणी मॉनिटरवर कळत असे.समजा वाहन चोरीला गेले.रस्ता सोडून ते भरकटले.तर ते नक्की कुठे गेले ते कळणार होते.  

जवळजवळ पंधरा दिवस तसेच गेले.कुणालाही कळू न देता चिप बसविण्याचे व काढून घेण्याचे काम चालूच होते.रस्त्यावर जाणारे वाहन नक्की कुठे आहे थांबले की सतत गतिमान आहे हे कळत होते.एकही वाहन रस्ता सोडून भरकटले नाही.

पंधरा दिवसांनी त्यांच्या प्रयत्नाला यश आले.एक मोटार अडविण्यात आली.थोड्याच वेळात रस्ता सोडून ती मोटार जाऊ लागली.मॉनिटर करणाऱ्यांनी ती माहिती लगेच सुधाकरना कळवली.

सुधाकर सुदैवी होते.यावेळी मोटारीचे निरनिराळे भाग मोकळे केले जात नव्हते.नवीन रंग काढून, नेमप्लेट बदलून, नवीन आयडेन्टिटी निर्माण करून, ती मोटार परराज्यात विकली जाणार होती.ज्या ठिकाणी मोटार रस्ता सोडून भरकटली तिथे सुधाकर  पोहोचले.बरोबर पोलीस स्टाफ होताच.आसपास तपास करता हातपाय बांधून तोंडात बोळा घालून फेकून दिलेला एक माणूस सापडला.

पळविलेली मोटार कुठे आहे ती जागा त्यांना चिपमुळे कळत होती. त्या रस्त्यावर माळरानावर एक गॅरेजसदृश्य घर होते.त्याठिकाणी ती मोटार गेल्याचे लक्षात येत होते.

आणखी पोलिस सुधाकरनी बोलवून घेतले.जिथे मोटारींचे रंगकाम चालले होते तेथे धाड घातली.तेथील सगळ्या लोकांना ताब्यात घेण्यात आले.तिथेच अगोदर लुटण्यात आलेला मुद्देमालही ठेवण्यात आला होता.कांही मालाची त्यांनी विक्री केली होती तर कांही माल तिथेच गोदामात पडून होता. 

त्या घराला सील ठोकण्यात आले.तिथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.सर्वांना घेऊन सुधाकर कृषीनगर पोलिस स्टेशनमध्ये आले.गुन्हेगारांना परस्परांशी कोणत्याही मार्गाने संदेशवहन करता येणार नाही अशी तजवीज करण्यात आली.प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली.संपूर्ण रॅकेट सापडले.गुन्हेगारांचा म्होरक्याही सापडला.निरनिराळ्या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

कोर्टासमोर थोडक्यात ही केस पुढीलपणे मांडण्यात आली.

कृषीनगर ते जुईनगर हा रस्ता नवीन झाल्यावर गुन्हेगाराच्या मनात एक कल्पना आली.त्याने कांही सहकारी जमविले.माळरानावर एक झोपडी घेऊन त्याचे रूपांतर त्याने गोडाऊनमध्ये केले. पोलिसांनी किंवा आणखी कुणी चौकशी केली तर तो म्युनिसिपल कर चुकवण्यासाठी असे करतो असे सांगे.गोडाऊनमधे तो कांही माल दाखविण्यासाठी ठेवीत असे.त्याचा खरा धंदा त्या गोडाऊनच्या मागच्या बाजूला चाले.आपल्या योजनेत त्याने एक तरुण मुलगी व एक वयस्क गृहस्थही सामील करून घेतला होता.रस्त्यावर गाडी बंद पडली आहे आणि एक मुलगी किंवा म्हातारा मनुष्य मदत मागत आहे हे पाहिल्यावर कुणीही मोटारवाला आपली मोटार थांबवीत असे.बाजूच्या काळोखामध्ये झुडपांमागे साथीदार लपलेले असत. मुलगी किंवा म्हातारा मोटारवाल्याला बोलण्यात गुंतवून ठेवीत असे.साथीदार चोरपावलांनी येऊन त्या मोटार मालकाचा बंदाेबस्त करीत.हात पाय बांधून, मोबाइल काढून घेऊन, मालकाला काळोखात शेतात फेकले जाई.नंतर मोटार गॅरेजमध्ये नेऊन तिची विल्हेवाट लावली जात असे.आयडेंटिटी बदलून तिची विक्री दुसऱ्या राज्यात केली जाई किंवा तिचा पार्टन पार्ट मोकळा करून ते पार्ट जुन्या बाजारात विकले जात.   जर दोघांहून जास्त लोक मोटारीमध्ये असले तर ती मोटार न लुटता ते जाऊ देत.पाठोपाठ चुकून एखादी मोटार येत असेल तर ती अडवण्याची व्यवस्था केली जाई.

यामध्ये दहा पंधरा लोक गुंतलेले होते.  

झाडावर इन्फ्रारेड सीसीटीव्ही बसविलेले होते.ते झोपडीमधील कंट्रोल रूमला महाजालामार्फत(इंटरनेट)

जोडलेले होते.मोटार,टेम्पो,ट्रक, पोलिस जीप, काय येत आहे,कोणत्या दिशेने येत आहे ते लगेच कळत असे.त्यानुसार मोटार कुठे अडवायची त्याचे नियोजन करण्यात येत असे.रात्री रहदारी तुरळक असते.रात्री बारा ते चार या काळात सामान्यतः दोन चार वाहने जातात असे आढळले होते.या काळात वाहन लुटले जात असे. मोटार पळविली जात असे. 

काटेकोर नियोजन करून त्याने सर्व योजना आंखली होती.तो त्या योजनेप्रमाणे काम करीत होता.

*आवश्यक ते सर्व फोटो पुरावे कोर्टासमोर हजर करण्यात आले.*

* नेहमीप्रमाणे बरेच दिवस कोर्टात केस चालली.गुन्हेगारांना कमी जास्त मुदतीच्या शिक्षा व दंड झाला.*

*परराज्यात ज्या मोटारी विकण्यात आल्या होत्या  त्यातील कांही सापडल्या. त्या त्यांच्या मालकांच्या हवाली करण्यात आल्या.लुटीचा कांही मालही सापडला.*

*"कृषीनगर राज्य महामार्ग नं एकोणतीस केस" म्हणून ही ओळखली जाते.*

*इन्स्पेक्टर सुधाकरांच्या नावावर आणखी एक केस यशस्वी केस म्हणून जमा झाली.*  

(समाप्त)

२२/७/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel