( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)  

सुधाकरांची डिपार्टमेंटमध्ये बेधडक(डेअर डेव्हील) इन्स्पेक्टर म्हणून ख्याती होती.गेली दहा वर्षे ते पोलीस सेवेत कार्यरत होते.अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा त्यांनी हुषारीने तपास केला होता.सुधाकरानी एकदा एखादी केस आपल्या हातात घेतली की तिची यशस्वी सोडवणूक ही होणारच अशी त्यांची ख्याती होती.    

एकदा त्यांनी ठरविले की ठरविले.त्यांचा निश्चय दृढ होता.

त्या निश्चयाचा मागे बुद्धिमत्ता, तर्कशुद्ध विचारसरणी,अनुभव, साहस,कठोर परिश्रम सर्व कांही होते.

सुधाकरांची वज्रमूठ आता खुनी इसमावर निश्चित पडणार होती. 

सुधाकरानी प्रथम ते तीनही फोटो संगणकावर अपलोड केले .त्याचबरोबर या बाई हरवल्या आहेत मिसिंग म्हणून कुठे तक्रार करण्यात आली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.सर्व पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग हरवली आहे या सदरात तिचे तीन चेहरे दिसणार होते.त्यांतील एखादा चेहरा तिच्या प्रत्यक्ष चेहऱ्याशी जुळणारा असता, एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये तो चेहरा पाहण्यात आला असता,तिथेच हरवली आहे अशी त्या बाईबद्दल मुलीबद्दल तक्रार करण्यात आली असती, तर लगेच सुधाकराना त्या पोलिस स्टेशनमधून  तसे कळवण्यात आले असते.यामध्ये बरेच जर तर होते.शेवटी कोणत्याही गुन्ह्याचा शोध लागताना कांहीतरी दैवाचा भाग असतोच.शिवाय विविध अंदाज, निर्णयक्षमता, विविध पर्याय लक्षात घेण्याची कुवत, अशा अनेक गोष्टी असतात.

पेटीवरील लेबल,तो शिक्का,ते पुसट नाव, सुदाम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असे होते. राज्यामध्ये ज्यांची नोंद केली आहे अशा सर्व कंपन्यांची लिस्ट उपलब्ध होती.त्याचबरोबर भारतातील सर्व राज्यांतील कंपन्यांचीही  यादी उपलब्ध होती.इंटरनेट,संगणक, त्यांतील सुधारित आवृत्त्या,यामुळे बऱ्याच गोष्टी सुलभ झाल्या आहेत.उदाहरणार्थ अशा अशा नावाच्या कंपन्यांची एकूण संख्या किती आहे असे विचारताच ती यादी, पत्त्यासह उपलब्ध करून दिली जाते. संगणकाने लगेच भारतात एकूण पांच "सुदाम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी" या नावाच्या कंपन्या आहेत असे दर्शविले.बरेली, कलकत्ता,इंदूर, हैदराबाद आणि चेन्नई याठिकाणी या नावाची कंपनी होती.या पांच कंपन्यांमध्ये कोणत्या तरी एका कंपनीत या लोखंडी पेटीची निर्मिती झाली होती.त्या पांचही शहरातील प्रमुख पोलिस हेडक्वार्टरला मेल पाठवण्यात आला.त्यामध्ये त्या स्त्रीचे तीनही फोटो पाठविण्यात आले.ही स्त्री हरवली आहे अशी नोंद एखाद्या पोलीस स्टेशनला आहे का?अशी विचारणा करण्यात आली.सुधाकरचे दैव जोरावर होते.बरेली अंतर्गत "अनकही" या गावच्या पोलिस स्टेशनमध्ये तशी नोंद होती.ही माहिती मिळाल्यानंतर त्या लोखंडी पेटीचा फोटो पाठविण्यात आला. सोबत लेबलाचाही फोटो पाठविण्यात आला होता.अशा प्रकारच्या लोखंडी पेट्या "सुदाम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी"त बनवल्या जातात का?अशी विचारणा करण्यात आली.त्यावर तेथील पोलिसांनी चौकशी करून होय असे उत्तर पाठविले. तेथील कंपनीतील ऑफिसरला लोखंडी पेटीचा फोटो व लेबलचा फोटो दाखवण्यात आला.त्याने होय ही पेटी आमच्याच कंपनीतील वाटते असे उत्तर दिले.  

सर्व तयारीनिशी सुधाकर  वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन दोन पोलिसांसह बरेलीला रवाना झाले.तिथे गेल्यावर स्थानिक पोलिसांना घेऊन सुधाकर त्या कंपनीत पोहोचले.त्यानी तिथे निर्माण झालेल्या पेट्या पाहिल्या. ज्या पेटीमध्ये ती स्त्री दादर स्टेशनला मिळाली होती तशाच प्रकारच्या पेटय़ा तिथे बनविल्या जात होत्या.त्यांच्या जवळच्या पेटीवर असलेला शिक्का(लेबल) व तेथील सर्व प्रकारच्या पेट्यांवर असलेले शिक्के जुळत होते.जरी पोलिस स्टेशनने तशा प्रकारचा रिपोर्ट पाठवला होता तरीही प्रत्यक्ष ते सर्व पाहिल्यावर,स्वतः खात्री करून घेतल्यावर,सुधाकरांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.खुनी इसम आता हाताच्या अंतरावर होता.खुनी इसम आता त्यांच्या पकडीतून सुटणार नव्हता.

विशिष्ट प्रकारच्या पेटय़ा कुठे पाठवल्या जातात त्याची सुधाकरानी चौकशी केली.त्या यादीमध्ये अनकही गावाजवळील एका गावाचे नाव होते.सुधाकर त्या गावात म्हणजेच कृष्णनगर गावात सर्व तयारीनिशी पोहचले.त्यांनी विशिष्ट प्रकारच्या पेट्या कोणा कोणाला विकल्या आहेत त्याची यादी पाहिली.त्या यादीमध्ये अनकहीजवळील एका गावाचे नांव होते.सर्व मंडळी आता अनकही गावाला पोहोचली.त्या मुलीबद्दल हरवली आहे म्हणून ज्यांनी तक्रार नोंदवली होती त्यांच्या घरी सर्व  मंडळी पोचली.

रामजी नावाच्या एका म्हाताऱ्याने त्यांचे स्वागत केले.त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारींबद्दल विचारणा केली.माझी मुलगी हरवली आहे.मीच तक्रार केली.असे रामजीबाबा म्हणाले.  माझी मुलगी कुठे आहे?म्हणून त्यांनी विचारले. तिच्या मृत्यूबद्दल त्यांना सुधाकरानी अगोदर सांगितले नाही.खात्री झाल्यावरच त्यांना सांगावे असे त्यांनी मनात ठरविले होते. चौकशी करता रामजीबाबांच्या मुलीचा शेजारच्या गावांतील एका मुलाशी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलीला अनेकदा माहेरी पाठवण्यात आले.दरवेळी पैशाची मागणी केली जात होती.रामजीबाबांना सासरच्यांची मागणी पुरी करणे शक्य नव्हते.तरीही जमेल तेवढी त्यांची मागणी ते पूर्ण करीत होते.मुलाला मोटारसायकल दिली. मुलगा कृष्णनगर शहरात नोकरीला होता .त्याला तिथे फ्लॅट घ्यायचा होता.त्यासाठी तो पांच लाख रुपये मागत होता.ती मागणी पुरी करणे रामजीबाबाना शक्य नव्हते.पुढे मुलीचा छळ होत असल्याबद्दलची माहिती त्या गावांतील रामजीबाबांच्या मित्राकडून कळली. तिला मारझोड होऊ लागली.उपाशी ठेवण्यात येऊ लागले.रामजीबाबांना हे सर्व सांगताना रडू येत होते .मुलीच्या आई सीताबाई तर हमसून हमसून रडत होत्या.

एक दिवस सासरच्या मंडळींकडून निरोप आला.तुमची मुलगी पळून गेली आहे.माझ्या मुलीचे त्यांनी नक्की कांही बरे वाईट केले.आम्ही येथील पोलिसांत हरवल्याबद्दल तक्रार दिली.त्या अगोदर तिचा छळ होत असल्याबद्दलही तक्रार दिली होती.पोलिसांकडून विशेष कांही कार्यवाही झाली नाही.तुम्ही त्यांच्या घरी जा माझ्या मुलीचा कांही ना कांही तपास लागेल.रामजीबाबांना सुधाकरने अजूनही सत्य वस्तुस्थिती सांगितली नाही.

सर्व मंडळी प्रथम सुधाच्या सासरी पोहोचली.त्यांची चौकशी करता प्रथम त्यांनी मुलगी पळून गेली.तिची चालचलवणूक चांगली नव्हती.गावातील मुलाशी तिचे चोरटे संबंध होते.तो मुंबईला नोकरी करतो.त्याच्याबरोबर ती पळून गेली असावी.असा अंदाज सांगितला.तिच्या नवऱ्याला घेऊन   सुधाकर पेटी विक्रेत्याकडे पोहोचले.विक्रेत्याने यालाच पेटी विकली म्हणून ओळखले.मुलीच्या सासरच्याना पकडून पोलिसी हिसका दाखवताच सर्व जण पोपटासारखे पटापटा बोलू लागले. प्रथम त्यांनी मुलगी पाय घसरून पडली.तिच्या डोक्याला मार लागला.त्यांत तिचा मृत्यू झाला.खुनाचा आरोप आमच्यावर येईल म्हणून आम्ही तिला पेटीत घालून दादर स्टेशनला क्लोकरूममध्ये पेटी ठेवून आलो.अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.खोलात जावून चौकशी करता,थोडा आणखी पोलिसी हिसका दाखवताच,मुलीला मारहाण करताना वर्मी लागून तिचा मृत्यू झाला.खून केल्याचा आरोप येईल,शिक्षा होईल या भीतीने,पेटी विकत आणून त्यात तिला कोंबून ठेवण्यात आले असे सांगितले.नंतर आणखी चौकशी करता बेशुध्द  झाल्यावर तोंडावर उशी दाबून तिला ठार मारले हे शेवटी कबूल केले. मुंबईचे तिकीट काढून मुलीचा नवरा व त्याचा मित्र मुंबईला गेले.दादर स्टेशनच्या क्लोकरूममध्ये त्यांनी ती बॅग ठेवली.तसेच ते परत आले.क्लोकरुमची पावती त्यांनी गाडीतच फाडून बाहेर फेकून दिली.वगैरे सर्व हकिगत सांगितली  

पेटीत प्रेत सापडेल. बेवारशी निनावी म्हणून त्याची विल्हेवाट लावण्यात येईल अशी त्या सर्वांची कल्पना होती.केवळ पेटीच्या आधारे त्यावर असलेल्या शिक्क्यांमुळे आपला गुन्हा उघड होईल.चौकशी करीतआपल्यापर्यंत पोलिस पोहोचतील याची त्यांना कल्पना नव्हती.रामजीबाबांनी हरवल्याची तक्रार केलेली असल्यामुळे गोष्टी सुलभ झाल्या.समजा त्यांनी तक्रार नोंदविली नसती तरीही पोलिस इन्स्पेक्टर सुधाकर, पेटी व त्यांत असलेले लेबल यांच्या साहाय्याने अनकही गावापर्यंत पोहोचले असतेच.विशिष्ट प्रकारची पेटी कुणा कुणाला विकली याची चौकशी करून ते शेवटी सुधाच्या सासुरवाडीला नक्कीच पोचले असते.हरवल्याची तक्रार दिल्यामुळे गोष्टी सुलभ झाल्या.जिथे गुन्हा घडला ते गाव अनकही पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत होते.तिथे म्हणजे अनकही गावात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन अहवाल, मुद्देमाल लोखंडी पेटी,फोटो सर्व पुरावे अनकही पोलिस स्टेशनला सुपूर्त करण्यात आले.मुलीचे काय झाले ते शेवटी रामजीबाबांना कळले.त्यांचा अंदाज होताच.तो खरा ठरला.त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही.बरेली कोर्टात खटला चालला.दीर्घकाळ खटला चालल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा करण्यात आली.

*सासू व सासरे यांना पांच वर्षे,नणंदेला सात वर्षे, गुन्हा लपवण्यामध्ये मदत केली म्हणून नवर्‍याच्या मित्राला  एक वर्ष, तिच्या नवऱ्याला आजीवन कारावासअशी शिक्षा ठोठावण्यात आली.*

*केवळ एक पेटी व तिचे लेबल याच्या आधारे पोलीस गुन्हेगारापर्यंत पोचले.*

*गुन्हा छपून राहात नाही.*

*गुन्ह्य़ाला लवकर किंवा उशिरा वाचा ही फुटतेच.या उक्तीची प्रचीती आली.

(समाप्त)

३०/५/२०२१©प्रभाकर  प्रभाकर 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel