( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

कृषीनगर ते जुईनगर  हा रस्ता पूर्वी कच्चा धुळीचा होता.या रस्त्याने एखादी लाल परी दिवसांतून एखादेवेळा धुळीचा लोळ उठवत जात असे.खाजगी गाडय़ा मालवाहतूक करणारे ट्रक(रथ)या रस्त्याच्या वाटेला सहसा जात नसत.खाचखळगे खड्डे धूळ यामुळे प्रवासाला वेळ लागे.पेट्रोल डिझेल जास्त खर्च होई.गाडीचे कमी जास्त नुकसान होत असे.या रस्त्यावर अजून पेट्रोलपंप, गॅरेज,धाबा काहीही उभे राहिले नव्हते.त्यासाठी पुरेशी मागणी पाहिजे.तरच गुंतवणूक करणे परवडते.आसपासच्या गावात राहणारे नाइलाजाने या रस्त्याचा वापर करीत असत.मोटारसायकल्स, जीप, ट्रॅक्टर, याशिवाय दुसरी वाहने या रस्त्यावर दिसत नसत.त्यांची सर्व्हिसिंग दुरूस्ती इत्यादी कामांसाठी शहरात जावे लागे.

रस्ते सुधारणा मोहिमेखाली हल्लीच हा रस्ता पक्का झाला होता.रस्त्याला मध्ये दुभाजक नव्हता.रस्ता दुपदरी होता.दोन्ही बाजूचा कांही मीटरचा भाग कच्चा होता.कृषीनगरवरून एक व जुईनगरवरून एक असे दोन स्वतंत्र महामार्ग औरंगाबादला जात होते.कृषीनगर ते जुईनगर चांगल्या रस्त्याने जायचे झाल्यास  औरंगाबादला जाऊन नंतर जावे लागे.कृषीनगर ते जुईनगर हे अंतर सुमारे पन्नास किलोमीटर होते.औरंगाबादवरून हे अंतर एकशे पन्नास किलोमीटर होई.शिवाय औरंगाबाद शहरातून जाताना गर्दीमुळे, सिग्नल्समुळे, वेळ जाई .धूळखात खडबडीत रस्त्यावरून जावे हा पर्याय उपलब्ध होता.परंतु या पर्यायाचा कुणी विशेष वापर करीत नसे. बरेच मोटर मालक औरंगाबादवरूनच जाणे पसंत करीत.

कृषीनगर ते जुईनगर हा नवीन रस्ता जवळजवळ महामार्गासारखाच होता. ज्यांना औरंगाबादला जायचे नसे तिथे कांही काम नसे असे वाहनचालक या महामार्गाचा उपयोग करूं लागले होते.एसटीच्या बसेसची संख्याही वाढली होती.एकंदरीत या रस्त्याला बऱ्यापैकी रहदारी वाढली  होती.कृषीनगर व जुईनगर या दोन्ही नगरांचा विस्तार होत होता.जसा उभा विस्तार होत होता तसाच आडवाही विस्तार होत होता.कृषीनगर व जुईनगर या नगराना द्रुतगतीने जोडण्यासाठी चांगल्या पक्क्य़ा रस्त्याची गरज होती.त्यामुळे हा नवीन पक्का रस्ता करण्यात आला होता.          

पोलिस स्टेशन्स अर्थातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शहरामध्ये होती.पन्नास किलोमीटरच्या रस्त्यावर एकही पोलिस स्टेशन नव्हते.अपघात झाला किंवा आणखी कांही समस्या उद्भवली तर दोन्ही पोलिस स्टेशनना ती गोष्ट कळत असे.जिथून घडलेली घटना जवळ असेल तिथून पोलीस व्हॅन गरज असल्यास अॅम्ब्युलन्स इत्यादी पाठविले जात.जास्तीत जास्त अर्ध्या तासात मदत पोहोचत असे. सहा महिने व्यवस्थित गेले.कोणतीही दुर्घटना या काळात घडली नाही.या रस्त्यावरील रहदारीही वाढली होती. रात्रीही,मध्यरात्रीनंतर सुद्धा बिनधास्त या रस्त्यावरून वाहने जाऊ लागली होती.  

एक दिवस कृषी नगरपासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर शेतामध्ये एक व्यक्ती सापडली.तिचे हातपाय बांधले होते.तोंडात बोळा घातलेला होता.डोक्यावर बहुधा एक लहानसा फटका मारलेला असावा किंवा   शेतात फेकून देताना डोक्याला  जखम झाली असावी.सुदैवाने एका शेतकर्‍याला ती व्यक्ती सापडली.रात्रभर उघड्यावर माळरानावर पडलेला असल्यामुळे ती व्यक्ती रामदास महाले गारठून  गेला होता. एका मोटारीमधून लिफ्ट  घेऊन रामदास कृषीनगर पोलिस स्टेशनला पोहोचला.तिथे त्याने पुढील तक्रार नोंदवली.

कृषीनगरहून जुईनगरला रात्री दोनच्या सुमारास तो जात होता.जुईनगरला जात असलेली एक मोटार रस्त्यात बंद पडली होती.एक मुलगी रस्त्यात थांबून मदत करण्याची विनंती खाणाखुणामार्फत करीत होती.तिच्याबरोबर तिचा नवरा होता.बॉनेट उघडून तो दोष शोधण्याचा प्रयत्न करीत होता.त्यांना जवळच्या पेट्रोल पंपापर्यंत लिफ्ट हवी होती.तेथून त्यांनी मोटर मेकॅनिक पाठविला असता.मला त्यांची विनंती स्वीकारार्ह वाटली.मी त्यांना मोटारीत बसायला सांगून ड्रायव्हिंग सीटवर बसलो.त्या मुलीचा नवरा माझ्या शेजारी बसला.तर मुलगी मागच्या बाजूला बसली.गाडी सुरू करणार एवढय़ात माझ्या डोक्यावर एक फटका बसला.हा फटका त्या मुलीने मारला होता.ती मला फटका मारीत असल्याचे आरशात दिसले होते.मी फटका चुकवू शकलो नाही.  पुढचे कांहीच मला माहीत नाही.बहुधा मी बेशुद्ध झाल्यावर त्यानी माझे हातपाय बांधून शेतात टाकले असावे.तोंडात बोळा कां घातला कळत नाही.खरे म्हणजे मी बेशुद्ध झाल्यावर माझे हातपाय बांधण्याचीही गरज नव्हती.माझी मोटार घेऊन ते पसार झाले.त्यांची मोटार बिघडली ही केवळ हूल होती.

त्यावर पोलिस इन्स्पेक्टर म्हणाला तुम्ही शुद्धीवर आल्यावर ओरडून, रस्त्यावर येऊन,पोलिसांना सतर्क केले असते.त्यांना तुमची मोटार गायब करण्यासाठी कदाचित पुरेसा वेळ मिळाला नसता.तुम्ही असे करू नये म्हणून हातपाय बांधून, तोंडात बोळा घालून, तुम्हाला निर्दयपणे शेतात   उघड्यावर फेकण्यात आले.तुमचा मोबाईलही काढून घेण्यात आला.जवळच तो मोबाईल फेकून दिलेला आढळला.  

रामदासने त्याच्या मोटारीचा नंबर मेक इत्यादी सर्व माहिती दिली.सर्व पोलिस स्टेशन्सना   ती माहिती कळविण्यात आली.मोटारीचा किंवा त्या दोन भामट्यांचा पत्ता लागला नाही.

पंधरा दिवसांनी पुन्हा अशीच एक मोटार पळवण्यात आली.त्यावेळी मोटार अडविणारी मुलगी होती. त्या मुलीबरोबर दुसरे कोणी नव्हते.तिने मोटार बिघडल्याचे कारण सांगितले.रात्रीचे अकरा वाजले होते.तिने मदत मागितली.या वेळी मोटार अपहरण केलेली व्यक्ती सुभाष जुईनगरहून कृषीनगरला जात होता.मोटारीतील मोबाइल व महत्त्वाचे सामान घेण्यासाठी ती मुलगी तिच्या मोटारीत गेली .सुभाष ती येण्याची वाट पाहत होता.एवढ्यात त्याच्या डोक्यावर कुणीतरी एक फटका मारला.त्याला बांधून शेतात टाकण्यात आले. बेशुध्द झाल्यावरचे अर्थातच त्याला कांहीही आठवत नव्हते. बहुधा तिच्या मोटारीतून तिच्याबरोबर आलेले चोर शेतात लपलेले असावेत.त्यांनी काळोखातून अकस्मात मला न कळता येवून माझ्यावर हल्ला केला असावा.त्या चोरीचाही कांही तपास लागला नाही.   

अशाच प्रकारे दोन मोटारी त्या रस्त्यावर चोरीला गेल्या.दोन्ही बाजूच्या पोलिस स्टेशनना वरून सक्त ताकीद देण्यात आली.त्या रस्त्यावर नियमित पोलिस गस्त ठेवावी असेही हुकूम सोडण्यात आले.साधारण दर दोन तीन तासाच्या अंतराने एक पोलिस जीप त्या रस्त्यावर रात्री गस्त घालीत असे.गस्त घालण्याची वेळ निश्चित नसे.

असे असूनही पुन्हा एक मोटार चोरीला गेली.सर्व मोटारी खासगी मालकीच्या होत्या.मोटार चोरण्याची पद्धत एकाच प्रकारची होती.एखादी मुलगी हातवारे करत  मदत मागत असे.नंतर शेतात लपलेले तिचे साथीदार येऊन कार्यभाग साधत असत.कधी एखादा तरुण किंवा एखादा वयस्क हातवारे करून मदत मागत असे.गस्तीच्या वेळा बदलूनही कांही उपयोग झाला नाही.त्या रस्त्यावर एखाद्या मुलीने किंवा आणखी कुणीही मदत मागितल्यास गाडी थांबवू नये अशाप्रकारे निवेदन सर्व वर्तमानपत्रात,बातम्यांमध्ये व समाजमाध्यमांमध्ये देण्यात आले.

त्या रस्त्यावर कुणीही आपली गाडी थांबवत नाहीसा झाला.अगदी रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून जोरजोरात हातवारे केले तरीही गाडी जोरात येताना पाहून थांबणार नाही असा अंदाज आल्यावर मदत मागणारा बाजूला चपळाईने होत असे.पळविलेल्या मोटारींचा कांहीही तपास लागला नाही.अशी मोटार पळवल्यावर त्याची दोन प्रकारे विल्हेवाट लावली जाते.

कांही तासांत एखाद्या गॅरेजमध्ये तिचे सर्व भाग सुटे केले जातात.ओळख पटेल असे मोटारीचे सर्व भाग व कागदपत्र नष्ट केले जातात.ते सुटे भाग सेकंड हँड मार्केटमध्ये विकण्यात येतात.   

दुसरा मार्ग म्हणजे एखाद्या आडबाजूला गुदामात   किंवा गॅरेजमध्ये गाडीचा रंग बदलण्यात येतो.गाडीची नंबरप्लेट बदलण्यात येते.खोटे कागदपत्र तयार करण्यात येतात.नवीन ओळख नवीन आयडेन्टिटीनिशी ती गाडी परराज्यांत विकण्यात येते.

कुणी मदतीसाठी थांबत नाही असे पाहिल्यावर वेगळाच मार्ग अवलंबिण्यात आला.दोन गाड्यांची टक्कर झाली आहे. अपघात झाला आहे. असे दृश्य उभे करण्यात आले.अपघातामुळे रस्ता बंद झाला होता.येणार्‍या  गाडीला थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते.पिस्तुलाच्या धाकावर त्यांना गप्प करण्यात येवून त्यांचे हातपाय बांधण्यात आले तोंडात बोळा घालण्यात आला .नंतर नेहमीच्याच पध्दतीने त्याची मोटार पळवण्यात आली.

महिन्यातून एखादी दुसरी मोटार पळविण्याचा कार्यक्रम सुरूच राहिला.चोरण्याच्या पध्दतीत लहानमोठे फरक केले गेले.कधी फटका मारून,कधी क्लोरोफार्मचा रुमाल नाकावर दाबून,कधी दिवसा, कधी संध्याकाळी, कधी रात्री, कधी पहाटे,अशा वेळा बदलून,मोटारी पळविण्यात येत होत्या.कधी रस्त्यात मोटार आडवी टाकून,कधी अपघाताचा भास निर्माण करून,कधी मोटार बिघडली आहे मदत पाहिजे असा बहाणा करून,कधी रस्त्यात खिळे टाकून गाडी पंक्चर करून,मोटारी पळवण्यात लुटण्यात येत होत्या.    

या रस्त्यावर वाटमारी होते.गाडय़ा पळविण्यात येतात.ही बातमी सर्वत्र पसरल्यामुळे लोक शॉर्टकट टाळू लागले.शक्यतो रात्रीचा त्या रस्त्याने कुणी प्रवास करीत नाहीसा झाला.या बाबतीत विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला.~कडक उपाययोजना करीत आहोत.यानंतर अशा घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.~अशा प्रकारचे स्टँडर्ड नेहमीच्या साच्यातील उत्तर देण्यात आले.

जरी आसपासच्या परिसरात या चोरीचा गवगवा झालेला असला तरी लांबून दूरवरून येणाऱ्या गाडीवाल्याला त्याची अर्थातच काही माहिती नसे.गुगल मॅपवर पाहून तो शॉर्टकट म्हणून या रस्त्यावर बिनधास्त गाडी घालत असे.एखादवेळी तो सहीसलामत सुखरूप रस्ता पार करी.कांही दुर्दैवी गाडीवाले त्या टोळीचे बळी होत.    

कृषीनगर व जुईनगर या दोन्ही शहरात लहान मोठी अनेक   गॅरेजेस होती.त्या गॅरेजवर कडक लक्ष ठेवण्यात आले.गॅरेज मालकांची चौकशीही करण्यात आली.कुठेच कांही धागादोरा लागत नव्हता. जणूकांही चोरलेल्या गाडय़ा हवेत विरून गेल्या किंवा भूमातेने गिळून टाकल्या होत्या. 

पोलीस गस्त वाढविण्यात आली होती.त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा अक्षरात दोन तीन भाषांमध्ये चालकांनी काळजी घेण्याबद्दल पाट्या लावण्यात आल्या होत्या.मोटारी चोरण्याचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी चोर्‍या  होतच राहिल्या.

चोरीची आणखी एक नवीन पद्धत अवलंबण्यात आली.मोटार चोरण्याऐवजी मोटार   थांबवून मोटारीतील वस्तू पैसा लुटण्यात येऊ लागला.

गस्त घालणारी पोलिस व्हॅन केव्हां येणार ते बरोबर चोरट्यांना कळत असे.वेळ टाळून बरोबर चोरी केली जात असे. दरोडा घातला जात असे.ज्याप्रमाणे एकेकाळी (हलींचे माहित नाही) चंबळचे खोरे डाकूंचे म्हणून समजले जात असे त्याप्रमाणेच हा रस्ता स्टेट हायवे नं एकोणतीस,धोकादायक समजला जाऊ लागला.

*चोरांना पकडण्यासाठी एखाद्या खंबीर हुशार इन्स्पेक्टरची गरज होती.*

* यावेळी इन्स्पेक्टर सुधाकर अमरावतीला कार्यरत होते.*

*त्यांची बदली कृषीनगरला केवळ या कामासाठी करण्यात आली.*

*आतापर्यंत  इन्स्पेक्टर सुधाकरनी विविध गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे केला होता.*

*याचा तपासही त्यांच्या खात्यावर आणखी एक यशस्वी तपास म्हणून नोंदला जाणार होता.*  

(क्रमशः)

२१/७/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel