(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

अशोक स्वप्नातून दचकून जागा झाला .सुहासिनी आपल्याजवळ जे काही बोलली त्याचा परिणाम म्हणून तर आपल्याला स्वप्न पडले नाही ना असे त्याला एकदा वाटत होते तर स्वप्नात खरेच सौदामिनी आली होती असा त्याला अंतर्यामी विश्वास वाटत होता .

तो किती तरी वेळ विचार करीत होता .सौदामिनी अजून या जगात अस्तित्वात आहे यावर त्याचा  विश्वास बसत नव्हता .दुसऱ्या दिवशी तो सुहासिनीला घेऊन एका डॉक्टरांकडे गेला.सुहासिनीने तिला प्रत्यक्ष सौदामिनी दिसली व ती काय बोलली ते सांगितले.डॉक्टरांनी तिचे बोलणे खरे मानले नाही.त्यानी सुहासिनी व अशोक यांना पुढील स्पष्टीकरण दिले.सुहासिनीला तुमच्याशी विवाह केल्यावर कुठेतरी अंतर्यामी आपली सवत आपल्यावर लक्ष ठेवून तर नाही ना असे वाटत होते.ती आपल्याला स्वीकारणार नाही  असेही वाटत होते.त्याचा परिपाक म्हणून तिला बेडरुममध्ये खुर्चीत सवत बसलेली दिसली .

तुमचे मन स्वच्छ होते .तुमच्या मनात कुठलाही संशय नव्हता .त्यामुळे तुम्हाला काहीही दिसत नव्हते .काही स्वप्न पडत नव्हते.काल तुमच्या पत्नीने सवत दिसल्याचे तुम्हाला सांगितले त्याचा तुमच्या मनावर खोल परिणाम झाला परिणामी रात्री तुम्हाला तुम्ही सांगितले तसे स्वप्न पडले .हे सर्व मनाचे खेळ आहेत .भूत बित सर्व झूट आहे .

सुहासिनी म्हणाली, लग्न झाल्यापासून माझ्या मनात कधीही माझ्या सवतीबद्दलचे   विचार आले नाहीत .असे असूनही मला तिचे दर्शन कसे झाले?

डॉक्टर म्हणाले ,अंतर्मनात जे खेळ चालतात ते बहिर्मनाला कळत नाहीत.कधीतरी अकस्मात ते उफाळून बहिर्मनात येतात .त्यावेळी आपल्याला त्याची जाणीव होते.मी जे बोललो ते तुम्ही खरेच आत्मसात केले असेल तर तुम्हाला पुन्हा सौदामिनी दिसणार नाही .मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो .सर्व काही ठीक होईल .निष्कारण घाबरून जायचे कारण नाही .

डॉक्टरांनी जे काही सांगितले त्यावर सुहासिनीचा अजिबात विश्वास बसला नव्हता.सौदामिनी आपल्याला भेटली, आपल्याशी बोलली, ती आपल्यावर लक्ष ठेवून आहे, याबद्दल तिची शंभर टक्के खात्री होती .

अशोकचेही मन डळमळीत झाले होते.असेच काही दिवस गेले .आपल्याला  झाले ते सर्व भास होते,तो सर्व मनाचा खेळ होता , याबद्दल सुहासिनीची जवळजवळ  खात्री पटली होती.

आणि ती घटना घडली .मुले व्यवस्थित झोपली ना हे पाहण्यासाठी सुहासिनी मुलांच्या खोलीत रात्री अकरा वाजता गेली होती .मुलांच्या खोलीत नाइट लॅम्प लावलेला होता .त्या प्रकाशात एक आकृती मुलांकडे टक लावून पाहात असलेली  तिला दिसली .थोड्याच वेळात तिच्या लक्षात आले ती तिची सवत होती.  

ती तशीच आपल्या खोलीत परत आली .तिने पाहिलेली घटना अशोकला सांगितली.दोघेही आता चिंतीत झाली . सौदामिनी शेवटी भूत होती.आपल्या मुलीचे मालिनीचे व्यवस्थित व्हावे म्हणून ती अरुणला तिच्या सवतीच्या मुलाला काही इजा तर करणार नाही ना असे त्यांना वाटू लागले होते .

डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे सौदामिनीचा भिंतींवरील फोटो हटविण्यात आला होता.वारंवार तो पाहिल्यामुळे सुप्त मनात निरनिराळे विचार येतात व त्यामुळे निरनिराळे भास होतात, स्वप्ने पडतात,असे डॉक्टरांचे मत होते .

मालिनी सुहासिनीच्या हातात सुरक्षित आहे. सौदामिनी इतकीच सुहासिनी तिची काळजी घेत आहे . याची खात्री पटल्याशिवाय सौदामिनी पुढील गतीला जाणार नाही .याबद्दल दोघांचीही मनोमन खात्री पटली होती .आपण ज्याप्रमाणे एखाद्या मनोचिकित्सकाकडे गेलो, त्याप्रमाणेच एखाद्या भगताकडे जावे असे त्यांना वाटत होते.

शेवटी त्यांनी विचारविनिमय करून काहीच करायचे नाही असे निश्चित केले .जर आपण प्रामाणिक असू,जर आपण योग्य असू,जर आपल्या मनात खोट नसेल,तर त्याची खात्री सौदामिनीला नक्की पटेल असा विश्वास त्यांनी मनोमन बाळगला.उगीचच घाबरून काही करण्याचे कारण नाही .असे उचललेले पाऊल योग्य असेलच असे नाही .कदाचित त्याचा सौदामिनीवर विपरीत परिणाम होईल .

अरुणला ती काहीही करणार नाही असा विश्वास सुहासिनीने बाळगला .मुले आपसात मिळून मिसळून होती .सख्या बहीण भावाप्रमाणे दोघांचेही वर्तन होते .  ती खेळत होती. ती भांडत होती. ती पुन्हा एक होत होती.त्यांची मने स्वच्छ होती.सुदैवाने शेजारी पाजारी दोघांचेही नातेवाईक निर्मळ होते .मुलांच्या मनात उगीचच विष कालविण्याचे काम त्यांनी केले नाही .

एक दिवस सौदामिनीने पुन्हा सुहासिनीला दर्शन दिले.ती काहीही न बोलता स्मित करून अंतर्धान पावली.सत्य व भास यापैकी आपण कुठे आहोत तेच  सुहासिनीला कळत नव्हते.

एक दिवस सौदामिनी  अशोकच्या स्वप्नात पुन्हा आली होती. सुहासिनी स्वभावाने अतिशय चांगली आहे.तिला मुलांची आवड आहे .ती मालिनीकडे तिच्या मुलाप्रमाणेच ,अरुणप्रमाणेच पाहील.अशी खात्री अशोकने सौदामिनीला स्वप्नात दिली.

अरुणच्या सुरक्षेबद्दल सुहासिनीला नाही म्हटले तरी आंतून भीती वाटत होती.

दोघांनाही सौदामिनीचे अस्तित्व मधून मधून जाणवत असे.दोघेही त्यामुळे अस्वस्थ होत असत .दोघेही जाणीवपूर्वक तो विषय टाळीत असत .सुहासिनीला खरोखरच मुलांची आवड होती. अरुण व मालिनी यात ती कोणताही भेदभाव करीत नसे.सौदामिनीच्या दर्शनाअगोदर ती जशी वागत होती तशीच ती नंतरही वागत होती .सौदामिनी भेटली म्हणून मालिनीची जास्त काळजी घेण्याच्या काही प्रश्नच नव्हता . 

आणि तो दिवस उजाडला .मालिनीला एकाएकी खूप ताप भरला .डॉक्टरांनाही तापाचे निदान होत नव्हते .तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले .डॉक्टर सर्व प्रकारची काळजी घेत होते .सुहासिनी दिवसरात्र मालिनीच्या जवळ होती .तिची देखभाल करीत होती .स्वतःच्या मुलीची काळजी घेणार नाही एवढी तिची काळजी घेत होती.सहवासाने तिचा लळा लागला होता . सुहासिनी मुळातच प्रेमळ होती .मालिनी बरी झाली .हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्ज मिळाला .तिच्याबरोबरच सुहासिनी परत घरी आली.

घरी आल्यावर ती मालिनीची काळजी सर्व प्रकारे घेत होती .जवळजवळ तीन महिन्यांनी मालिनी पूर्वींसारखी खेळती हिंडती फिरती  झाली.

त्यानंतर एक दिवस सौदामिनीने सुहासिनीला पुन्हा दर्शन दिले.ती म्हणाली,मालिनीला बरे करण्यासाठी चाललेली तुझी धावपळ मी पाहात होते.तुला मदत करावी, तुझे काम कमी करावे, असे मला सदैव वाटत असे.परंतु माझ्या मर्यादांमुळे मला तुला मदत करता येत नव्हती . मी घेणार नाही एवढी तू मालिनीची काळजी घेतलीस .मला आता मालिनीची चिंता नाही .मी आता सुखाने पुढील मार्गाला जात आहे.मी आता तुला पुन्हा दर्शन देणार नाही .तुमचा संसार सुखाचा होवो .मी खरेच गेल्याची निशाणी म्हणून माझ्या फोटोफ्रेमची काच तडकलेली तुला आढळून येईल.एवढे बोलून सौदामिनी अदृश्य झाली .

सुहासिनीने धावत जावून पेटीतील फोटोफ्रेम काढून बघितली.तिची काच खरेच तडकली होती .

सुहासिनीचे मन आता पूर्ण शांत स्थिर झाले होते. त्यानंतर सौदामिनी सुहासिनीला कधीही भेटली नाही .

त्यानंतर जवळजवळ एक वर्षाने , कसले तरी  संमेलन एका सभागृहात  होते.  अशोक तिथे गेला होता. त्याला तिथे डॉक्टर (मनोचिकित्सक ) भेटले ,त्यांनी सहज अशोकला सुहासिनीबद्दल विचारले.अशोकने मालिनीचे आजारपण, तिची सुहासिनीने केलेली सेवा सुश्रुषा, सौदामिनीने दिलेले दर्शन,तिने पुन्हा दिसणार नाही असे दिलेले आश्वासन   याबद्दल सर्व काही त्याने सांगितले.

त्यानंतर आजतागायत सौदामिनीने सुहासिनीला दर्शन दिले नाही असेही सांगितले.

डॉक्टर मिश्कीलपणे हसले .ते म्हणाले हा सर्व डोलारा सुहासिनीने निर्माण केलेला होता .सुहासिनीने सवती मत्सराबद्दलही बरेच ऐकलेले होते .ती स्वतः एका मुलीची सावत्र आई झाली.ती तिच्या मुलीशी अतिशय चांगले वागत होती.ती मुद्दाम चांगली वागत नव्हती.तो तिचा स्वभावच होता .मालिनी व अरुण यांच्यामध्ये ती भेदभाव करीत नव्हती .तिच्या मनात खोलवर कुठेतरी आपली सवत दुसर्‍या योनीत असेल ,ती आपल्यावर लक्ष ठेवीत असेल,ती आपल्याशी वाईट तर वागणार नाही ना ?अशी भावना असावी .

आपली सवत सौदामिनी आपल्यावर लक्ष ठेवून आहे ,आपण तिच्या मुलीशी कसे वागतो ते ती पहात आहे, असे काहीतरी तिच्या सुप्त मनात असावे.तिने फोटो पाहून त्याप्रमाणे  साक्षात सवत निर्माण केली.त्यांच्यामध्ये संभाषण झाले .सौदामिनी  आपल्यावर नजर ठेवून आहे.ती आपली परीक्षा पाहात आहे असा भास तिला होता होता .सौदामिनी ही तिची निर्मिती होती. जेव्हा मालिनी खूप आजारी पडली, जेव्हा सुहासिनीने  तिची  स्वतःच्या मुलींपेक्षा जास्त जिवापाड सुश्रूषा केली ,जेव्हा ती त्यातून पूर्ण बरी झाली .तेव्हा आपण सौदामिनीच्या परीक्षेत उतरलो, अशी तिची तिनेच आपल्या मनाची खात्री करून घेतली.

स्वनिर्मित सौदामिनीचे तिला पुन्हा दर्शन झाले .सौदामिनीने सुहासिनीला तू परीक्षेत पास झालीस तूच आता मालिनीची आई आहेस असे सांगितले. तुझ्या  हातात मालिनी सुरक्षित आहे याची मला खात्री पटली असेही सांगितले.तुला मी आता पुन्हा दर्शन देणार नाही. मी पुढील गतीला जात आहे, असेही सांगितले .

मनाचे खेळ अगम्य आहेत .मनाची शक्ती अफाट आहे .एकाला जे आभास वाटते तेच दुसर्‍याला सत्य असू शकते.हा सगळा सुप्त व प्रगट मनाचा खेळ आहे.

सुहासिनीच्याच मनाने सौदामिनी अस्तित्वात आहे. तिला गती मिळाली नाही. असे ठरविले होते त्यामुळे तिच्यापुरती ती होती.आता ती पुढील गतीला गेली आहे असे सुहासिनीने ठरविले.त्यामुळे सौदामिनी पुढील गतीला गेली आहे .आता ती सुहासिनीला कधीही दर्शन देणार नाही.

हा सर्व मनाने रचलेला डोलारा होता. आता तो संपला आहे.

अशोकला डॉक्टरनी सांगितलेले बरेचसे समजल्यासारखे वाटले .

*सुहासिनीला सौदामिनी खरेच भेटली की नाही याबाबत तो संशयात आहे.*

* त्याचप्रमाणे सौदामिनी आपल्या स्वप्नात खरेच आली होती की नाही याबाबतही तो संभ्रमात आहे .*

*सत्य काहीही असो.कदाचित दोन्हीही सत्य असू शकतील .*

*काहीजणाना अंतिम सत्य एकच असले पाहिजे असे ठामपणे वाटते .माझे मत थोडे वेगळे आहे.किंवा निराळ्या दृष्टीने हे मत बरोबर आहे .*

*प्रत्येकाचे सत्य  निरनिराळे असू शकते हेच अंतिम सत्य आहे असे मला वाटते .*

*सत्य एकच असले पाहिजे हा आग्रह बरोबर वाटत नाही .*

*सुहासिनीपुरता प्रश्न पूर्णपणे सुटला आहे यातच समाधान व आनंद आहे .*   

(समाप्त)

२०/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel