(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

सतत आठ दहा दिवस संध्याकाळी त्या विशिष्ट पिंपळाखालून येताना त्याला "मी येऊं का ?"हा एकच प्रश्न कुणीतरी विचारीत होते.आवाज  स्त्री की पुरुषाचा ते निश्चित कळत नव्हते .आवाज कधी स्त्रीचा बारीक, किनेरा, मंजुळ, लाडिक,  असे तर कधी पुरुषाचा घोगरा, रांगडा, राकट असे .

आणि त्याला निर्णय घ्यायचा होता.आणखी दोन चार दिवस तसेच गेले .संजयचा निर्णय होत नव्हता .दुसरा एखादा असता तर त्याने त्या रस्त्याने जाणे बंद केले असते .भूत असो नसो ते आपल्याला अनुकूल असो नसो उगीच विषाची परीक्षा कशाला असे कोणीही म्हणाला असता .पिंपळाच्या झाडाखालून न येता आणखी थोड्या दुसऱ्या लांबच्या रस्त्याने येणे शक्य होते .संजयचा व्यायाम, द्रुत चाल, निसर्गरम्य परिसरातून अवगाहन,हे सर्व थोड्या लांबच्या रस्त्याने होऊ शकले असते.  ऑफिसची जीप होती त्यानेही जाता आले असते .परंतू संजय पळपुटा नव्हता .तो नुसता शरीराने पेहलवान नव्हता तर त्याचे मनही कणखर होते .त्याला माहीत होते की ते जे कुणी आहे ते त्याने परवानगी दिल्याशिवाय त्याच्या मागे येणार नाही .अन्यथा  त्याने मी येऊं का? म्हणून रोज विचारले नसते .

शेवटी एक दिवस त्याने निश्चय केला .मी येऊं का असे शब्द आल्याबरोबर त्याने~ हो ये~म्हणून सांगितले .आज आवाज  एका स्त्रीचा होता. लगेच पिंपळावरून कुणीतरी उडी मारल्याचा आवाज आला. 

संजयने कटाक्षाने मागे वळून पाहिले नाही .त्याला त्याच्या आईचे शब्द आठवत होते .जर लक्ष्मी असेल तर मागे पाहिल्यानंतर ती गुप्त होते .आपण मागे न पाहता तसेच चालत राहावे .घरातही तसेच मागे न पाहता यावे .लक्ष्मी आपल्या मागोमाग घरात येते .

त्याला त्याच्या आईचे आणखीही सांगणे आठवत होते .जर भूत असेल तर आपण मागे वळून पाहिल्यावर ते अक्राळविक्राळ रूप धारण करते ते आपल्याला दगा देण्याचा संभव असतो .त्याच्या अक्राळ विक्राळ भीतिदायक रूपामुळे आपण घाबरण्याचा संभव असतो .हा मन:शक्तीचा खेळ आहे .एकदा भुताने आपल्या मनावर कब्जा बसवला की मग ते काहीही करू शकते .यासाठी मागे न बघता येणे उत्तम.आपल्या कंपाउंडमध्ये शिरल्यावरही मागे वळून बघू नये . घरात शिरल्यावर मागे वळून बघायला हरकत नाही .घरात आपल्याला वास्तू पुरुषाच्या संरक्षणाचे कवच असते.

त्याला आईचे आणखी एक सांगणे आठवत होते.भूत वाटेल ते रूप घेऊ शकते.वाटेल तो आवाज काढू शकते .आपल्या नातेवाईकांपैकी कुणाचाही आवाज व रूप धारण करून ते फसवू शकते.आपल्या जिवलगांपैकी  कुणाचाही आवाज आला तरीही मागे वळून पाहू नये.  

कुणीतरी उडी मारल्याचा आवाज आला तरी संजय तसाच चालत राहिला .त्याच्या खांद्यावर एक लांबसडक हात पडला .तो हात एका स्त्रीचा होता .तिची बोटे लांबसडक होती .तिच्या बोटात  अंगठी होती .हात गोरापान होता .मनगटात बांगड्या पाटल्या  घातलेल्य होत्या.  ती स्त्री संजयला माझ्याकडे बघणार नाही का ?म्हणून विचारीत होती .तरीही संजय काही बोलला नाही.

ही लक्ष्मी नाही हे त्याने नक्की ओळखले .लक्ष्मीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला नसता.ही एखादी हडळ, लांवसट,चेटकीण, वांगी भूत, अशा एखाद्या स्त्री जातीतील भूत असावी असा तर्क त्याने केला.  

संजयने मागे वळून बघितले नाही .तिचा हात अल्लद पकडून खांद्यावरून दूर केला.तो तसाच चालत राहिला.दुसऱ्याच क्षणी एक आडदांड राकट तगडा माणूस त्याच्या पुढ्यात  वाट अडवून उभा होता .तो माणूस बोलू लागला .

संजय मी तुझ्या धैर्याची तारीफ करतो .आधी एखादा माणूस रात्रीचा या रस्त्याने जायला धजणार नाही .त्यात त्याला रात्री "मी येउं का?"म्हणून शब्द ऐकायला आल्यावर तो पळत सुटेल. पुन्हा कधीही या वाटेला येणार नाही .तू पळाला नाहीस. तू याच वाटेने रोज जात राहिलास.कधी मी स्त्रीचा आवाज काढीत होतो .तर कधी मी पुरुषाचा आवाज काढीत होतो .तरीही तू घाबरला नाहीस .तुझ्या धैर्याला मी दाद देतो.

तुला काय पाहिजे ते माग .

मी ब्रह्मराक्षस आहे .मी मागच्या मनुष्य जन्मात व्युत्पन्न ब्राह्मण होतो.माझ्या हातून अनुचित कर्म घडले .मला तू भूत योनीत जाशील असा शाप मिळाला .त्यावर मी क्षमायाचना केली .उ:शाप मागितला .जो कुणी तुला घाबरणार नाही. तू घाबरवण्याचा प्रयत्न केलास, तरीही घाबरणार नाही.असा मनुष्य तुला मुक्त करू शकेल असा मला उ:शाप मिळाला . मी अशा माणसाची आज कित्येक वर्षे वाट पाहत होतो.न घाबरणारा मनुष्य मला बहुधा भेटत नाही मला याच योनीत राहावे लागणार असे मला वाटू लागले होते .एवढ्यात तू मला झाडाखालून जाताना दिसलास. पहिले काही दिवस मी तुझे नुसते निरीक्षण करीत होतो .नंतर आज कित्येक दिवस मी तुला मी येऊं का म्हणून विचारीत होतो. तू काहीच उत्तर देत नव्हतास.मला तर तू भेरा,बेहरट आहेस की काय असे वाटू लागले होते.अजून कित्येक वर्षे मी असाच या पिंपळाच्या झाडावर राहणार असे वाटू लागले होते .एवढ्यात आज तू हो म्हणालास.माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला .

संजय आश्चर्य चकित होऊन ऐकत होता.एवढ्या स्पष्ट शब्दांत एखादे भूत एखाद्या मनुष्याजवळ बोलेल असे त्याला  कधीही वाटले नव्हते.अजूनही संजय काहीच बोलला नव्हता .आपल्यामुळे या भुताला मुक्ती मिळणार याचा त्याला अंतर्यामी आनंद वाटत होता.

त्याच्या बोलण्यावर शांतपणे संजय म्हणाला .मी काहीच केले नाही . तू मला रोज मी येऊं का? म्हणून विचारीत होतास.त्यावर मी फक्त होय. असे उत्तर दिले.  पुढे संजय म्हणाला तू आता झालास ना मुक्त, मग माझी वाट अडवून कां उभा आहेस ? बाजूला हो मला घरी जाऊ दे.त्यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला अजून मी मुक्त झालो नाही .उ:शाप देताना  मला आणखी एक अट घालण्यात आली होती.जो मला मुक्त करण्यासाठी सहाय्य करील त्याचे मी काहीतरी भले केले  पाहिजे .

पुढे तो ब्रह्मराक्षस म्हणाला, सांग तुझ्या साठी मी काय करू ?धनधान्य ,पैसाअडका, जमीनजुमला, सत्ता सामर्थ्य,  तुला काय हवे ?मी तुला काहीही देऊ शकतो .

त्यावर संजय म्हणाला या सर्वाने सुख शांती मिळेल का?मनुष्याला वरील सर्व गोष्टी आवश्यक आहेत .परंतु किती ते कुणीही सांगू शकत नाही .मनुष्याची हाव वाढतच जाते .प्रत्येक गोष्टीत आणखी आणखी आणखी याला कधीही अंत नाही.सुखशांती आतून आली पाहिजे .वरील गोष्टी बर्‍याच  वेळा अशांती निर्माण करतात.मनुष्याची हांव कधीही सुटत नाही .कदाचित यात त्यांचा भौतिक उत्कर्ष असेल परंतु आत्मिक उत्कर्ष तर नक्की नाही.मला तुझ्यापासून काहीही नको .मी आहे त्यात समाधानी आहे .

यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला काहीतरी तुला हवे असलेले दिल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही.

त्यावर संजय विचारात पडला .नंतर बऱ्याच वेळाने तो त्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला,मी बरेच दिवसांत कुस्ती खेळलेलो नाही.ज्युडो कराटे व कुस्ती या सर्वात मी प्रवीण आहे. तू तीन दिवस लागोपाठ माझ्याशी ज्युडो कराटे व कुस्ती खेळ.कोण जिंकतो व कोण हरतो याला महत्त्व नाही.माझे समाधान होण्याला महत्त्व आहे .बघ तुझी तयारी आहे का?माझ्याशी खेळ.माझे समाधान कर.मुक्त हो.

ब्रह्मराक्षस म्हणाला,मी व्युत्पन्न ब्राह्मण मला कुस्ती, ज्युडो, कराटे, यातील श्री सुद्धा माहीत नाही तर ज्ञ कुठून माहीत असणार?

यावर संजय म्हणाला मग तू तयारी कर. नंतर मला आव्हान दे .माझे समाधान कर.मुक्त हो .

ब्रह्मराक्षस ठीक म्हणाला आणि क्षणार्धात गुप्त झाला .

बरेच वर्षात संजयचा या विविध कुस्ती प्रकारांशी संबंध राहिला नव्हता.ब्रह्मराक्षस ज्या अर्थी ठीक असे म्हणाला त्या अर्थी तो नक्की तयारी करून येणार याची संजयला कल्पना आली. आपणही तोडीस तोड म्हणून टिकले पाहिजे यासाठी त्यानेही प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्या घरच्या मंडळीना याच्या डोक्यात एकदम हे वेड कुठून शिरले ते लक्षात येईना. जरी एकेकाळी तो या सर्वात प्रवीण असला, जरी त्याने याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असले,तरीही त्याचा या खेळांशी हल्ली काहीही संबंध उरला नव्हता .संजय रोज कसून मेहनत घेत होता. लढतीची तयारी करीत होता.

बहुधा  ब्रह्मराक्षसही तयारी करीत असावा. त्याची संजयला काहीच कल्पना नव्हती. केवळ अंदाज होता. 

नंतर असेच सहा महिने गेले .बहुधा तो ब्रह्मराक्षस या सर्वात प्रवीण होण्याचे प्रशिक्षण (ट्रेनिंग) घेत असावा.

ब्रह्मराक्षस भेटला त्याच्याशी काय बोलणे झाले वगैरे, काहीच संजय घरी बोलला नव्हता.घरातील सर्वांनी त्याला धनसंपत्ती वैभव न मागितल्याबद्दल वेड्यात काढला असता.भुताबरोबर मग तो ब्रम्हराक्षस कां असेना ,कुस्ती ज्युडो कराटे म्हणजे प्राणांशी गाठ. ही जगावेगळी मागणी ऐकून घरातील सर्वच या गृहस्थाला काय म्हणावे अशा विचारात पडले असते .

एका संध्याकाळी संजय घरी येत असताना तो ब्रह्मराक्षस त्याच्या पुढ्यात उभा राहिला.मी प्रशिक्षण घ्यायला गेलो होतो असे तो म्हणाला .मी आता तिन्हींमध्ये तरबेज झालो आहे .तुझे समाधान नक्की करू शकेन.चल केव्हापासून आपण सुरुवात करू या ?

संजयने ब्रह्मराक्षसाला या खेळात पंच लागतो हे तुला माहीत आहे का म्हणून विचारले .त्यावर तो होय म्हणाला .जर प्रेक्षक नसतील तर या खेळाला मजा नाही असेही संजय म्हणाला.पुढे संजय म्हणाला,मी इथे परगावाहून एक कुस्तीपटू आला आहे म्हणून जाहिरात करतो. नंतर उघड्या पटांगणात तीन दिवस लागोपाठ आपण कुस्ती ज्युडो कराटे खेळू.ब्रह्मराक्षस प्रथम कां कू करीत होता.एवढ्या जनसमुदायासमोर जायला तो बिचकत होता . शेवटी तो तयार झाला .

तीन दिवस ठरल्याप्रमाणे ज्युडो, कराटे व कुस्ती झाली.पंचक्रोशीतील लोक कधी पहायाला न मिळणारे कुस्तीचे प्रकार पाहायला जमले होते .तज्ज्ञ पंच बाहेरून मागविले होते.लढत अटीतटीची झाली .कुस्ती व ज्युडो यांमध्ये संजय जिंकला.कराटेमध्ये ब्रह्मराक्षसाचा विजय झाला .संजयच्या ऑफिसमधील  व धरणाच्या कामावरील सर्व कामगार लढत बघण्यासाठी आले होते .या निमित्ताने गावात जत्रा भरल्यासारखा उत्साह होता.

*संजयचे पूर्ण समाधान झाले.*

*जाता जाता ब्रह्मराक्षस संजयला एक थैली देऊन गेला .मी गेल्यावर थैली उघड असे त्याला सांगण्यात आले होते .*    

* ब्रह्मराक्षसाला मिळालेल्या उ:शापाप्रमाणे त्याला मुक्ती मिळाली .*

* ब्रह्मराक्षसाने भेट म्हणून दिलेली थैली मूल्यवान रत्नानी भरलेली होती.*

(समाप्त)

१०/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel