(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

अशोक बॅचलर्स पार्टीला जाणार होता .अर्थातच त्याला घरी यायला उशीर होणार होता .आपल्या मुलांना अरुण व मालिनीला त्यांच्या बेडरूममध्ये झोपवून सुहासिनी  तिच्या बेडरूममध्ये आली .तिने खोलीत येऊन दिवा लावला .समोर खुर्चीवर सौदामिनीला पाहताच ती दचकली.भिंतीवर टांगलेल्या  सौदामिनीच्या फोटोकडे आणि खुर्चीवर बसलेल्या सौदामिनीकडे  आलटूनपालटून  आणि किंचित घाबरून सुहासिनी पहात राहिली. 

मला बघून तुला आश्चर्य वाटत असेल.मी अजून या जगात आहे.मी केव्हाही आणि कुठेही जाऊ शकते.तुमच्या कल्पनेप्रमाणे मी हे जग सोडून गेलेली नाही .मला माझ्या मुलीची काळजी आहे .मालिनीच्या संरक्षणासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे .तिची देखभाल व्यवस्थित होत आहेना तेच पाहण्यासाठी मी येथे आले आहे.

सुहासिनी तिला बसलेल्या शॉकमधून अजून बाहेर आली नव्हती.तिच्या अंगाची थरथर अजून थांबली नव्हती .ती तशीच विस्फारित नेत्रांनी सौदामिनीकडे पहात होती.सौदामिनीला जाऊन जवळजवळ दोन वर्षे झाली होती.मालिनी दोन वर्षांची असतानाच सौदामिनीचा अपघाती मृत्यू झाला होता.ती शाळेत शिक्षिकेची नोकरी करीत होती .स्कूटरवरून घरी येताना तिला एका रिक्षाने कट मारला होता.बेशुद्धावस्थेत तीन चार दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यावर तिचा मृत्यू झाला होता.त्यानंतर तिचे अस्तित्व केव्हाही कुणालाही जाणवले नव्हते.आणि आज अकस्मात  समोर खुर्चीवर ती बसलेली  दिसत होती.

सौदामिनीच्या  मृत्यूनंतर अशोक सैरभैर झाला होता. त्यावेळी मालिनी केवळ दोन वर्षांची होती .तिचा व्यवस्थित प्रतिपाळ करणे त्याच्या आई वडिलांमुळेच शक्य झाले होते .सौदामिनीच्या मृत्यूनंतर ते येथेच येऊन राहिले होते .तिच्या मृत्यूनंतर वर्षभराने अशोकचे आई व बाबा त्याला पुन्हा लग्न कर म्हणून आग्रह करू लागले होते .अशोक  लग्नाला नाही नाही म्हणत होता. 

मालिनीच्या संगोपनासाठी तू विवाह कर असा त्यांचा आग्रह होता. मी विवाह करणार नाही .मला सौदामिनीशी प्रामाणिक राहायचे आहे.विवाह करून मी सुखी होणार नाही.मी विवाह केल्यास माझी पत्नी व मी यांच्यामध्ये सौदामिनी येत राहील.आम्ही कोणीच सुखी होणार नाही असे तो म्हणत असे. सुरुवातीला जरी कितीही म्हटले तरी आयुष्य  एकट्याने काढणे कठीण आहे.पुरुषाला स्त्रीची व स्त्रीला पुरुषाची साथ पाहिजे.

शेवटी मालिनीचा प्रतिपाळ नीट व्हावा, आईवडिलांचाआग्रह,त्यांचे सांगणे पटले, म्हणून तो लग्नाला तयार झाला होता .इतरांच्या आईना पाहून मालिनी त्याला माझी आई कुठे आहे म्हणून सतत  विचारीत असे .ती देवाघरी गेली म्हणून सांगितल्यावर ती परत केव्हा येणार? हा तिचा पुढचा प्रश्न असे .देवाघरी गेलेला मनुष्य परत येत नाही हे त्या एवढ्याशा पोरीला समजावून सांगणे कठीण होते . दिवसेंदिवस तिच्या प्रश्नांना उत्तरे देणे त्याला जड जात होते. शेवटी मालिनीचा प्रतिपाळ नीट व्हावा, आईवडिलांचा आग्रह,त्यांचे सांगणे पटले म्हणून अशोक लग्नाला तयार झाला होता.

सुहासिनीच्या व अशोकच्या लग्नाला तीन चार महिने झाले होते.आपली देवाघरी गेलेली आई परत आली म्हणून मालिनी खूष होती.सुहासिनीही मालिनीवर आपली मुलगी असल्याप्रमाणेच प्रेम करीत होती.सुहासिनीला मुळातच मुलांची आवड होती .मालिनी गोड लाघवी मुलगी होती.

सुहासिनीही अशोकप्रमाणेच अकाली जोडीदार गमावलेली व्यथित,दु:खी  मुलगी होती .

सुहासिनी व अनुराग यांचा विवाह सुमारे सहा वर्षांपूर्वी झाला होता.अनुराग  एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर होता .वर्ष दीड वर्षात त्यांच्या मुलाचा, अरुणचा जन्म झाला होता.तीन वर्षांपूर्वी त्याचे विमान लँडींग करीत असताना एक छोटासा अपघात झाला होता.जगाच्या दृष्टीने जरी तो अपघात छोटा होता तरी त्या अपघाताने सुहासिनीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले होते .त्या धक्क्यातून सावरायला तिला जवळजवळ सहा महिने लागले होते.मी एकटीने हिमतीने अरुणला वाढवीन मोठा करीन अशी शपथ तिने घेतली होती. ऑफिस सांभाळून ती अरुणचा प्रतिपाळ  व्यवस्थित करीत होती .त्याला सांभाळण्यात तिच्या आईवडिलांचे मोठे सहाय्य झाले होते. 

सुहासिनीही लग्नाला तयार नव्हती .दुसऱ्या पुरुषाबरोबर अायुष्य काढायचे ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती.अरुणला एकटा वाढवीन ही तिची जिद्द होती. इतर मुलांचे बाबा पाहून ,माझे बाबा कुठे गेले ?ते केव्हा येणार ?असे अरुण वारंवार विचारीत असे. त्याच्या बाबाविषयींच्या एकेका प्रश्नाला उत्तर देणे मोठे कठीण झाले होते.डोळ्यातील अश्रू लपवीत  तिला ते उत्तर द्यावे लागत होते .तरीही अरुण तिला आई तू रडतेस कां?म्हणून मधूनच विचारीत असे. तिचेही आई वडील  तिने पुन्हा लग्न करावे म्हणून आग्रही होते.

एका मध्यस्थामार्फत सुहासिनी  व अशोक यांची भेट घडवून आणण्यात आली .दोघेही परस्परांना जवळजवळ चार पाच महिने भेटत होते .शेवटी परस्परांच्या जबाबदाऱ्या स्वीकारून,परस्परांचे स्वभाव बरेचसे जुळतात असे पाहून,त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता .

अरुणने अशोकचा बाबा म्हणून  स्वीकार केला होता.तर मालिनीने सुहासिनीचा आई म्हणून  स्वीकार केला होता.अरुणचे वडील व मालिनीची आई ,मुलें फार लहान असताना गेलेली असल्यामुळे , अरुणला वडिलांची व मालिनीला आईची आठवण मुळीच नव्हती .  अशोकच्या मांडीवर कित्येक वेळा अरुण आणि सुहासिनीच्या मांडीवर मालिनी बसत असत.दोघांनाही आई वडील मिळाले होते .अरुण बहिणीवर खूष होता तर मालिनी भावावर खुष होती.

लहान मुले किती लवकर एकमेकात मिसळतात. मोठ्यांनाच परस्परांशी जमवून घ्यायला दीर्घकाळ लागतो.मनावर पूर्व संस्कारांचे जेवढे ओझे कमी तेवढा मनुष्य जास्त लवचिक असतो.दोघेही परस्परांशी खेळत असत. भांडत असत.परस्परांची तक्रार हिरीरीने आईजवळ व बाबांजवळ करीत असत.

त्यांना न ओळखणाऱ्या लोकांना हे एक चौकोनी आदर्श कुटुंब वाटे.आई वडील सावत्र आहेत,भावंडे सावत्र आहेत, याचा कुणालाही संशय येत नसे .

असे सर्व छान सुंदर व्यवस्थित चाललेले असताना सुहासिनी  व अशोकच्या बेडरूममध्ये अकस्मात सुहासिनीला, सौदामिनी खुर्चीवर बसलेली दिसली होती .पूर्वीच्या आठवणी येऊ नयेत म्हणून अशोकने आपली जुनी जागा विकून हा नवीन अलिशान फ्लॅट घेतला होता.तरीही नवीन फ्लॅटमध्ये सौदामिनी बरोबर आली होती .

मृत्यू पावलेल्या सौदामिनीला समोर खुर्चीवर प्रत्यक्ष बसलेली पाहून,सुहासिनी गोंधळून गेली होती .एका बाजूला तिला भीती वाटत होती .दुसऱ्या बाजूला तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .सौदामिनी  रागाने आपल्या मुलाला काही करणार तर नाही ना अशीही भीती तिला वाटत होती .

शेवटी सुहासिनीने शांततेचा भंग केला .सुहासिनीने सौदामिनीला तू येथे कां आलीस? तुला काय पाहिजे? म्हणून विचारले.

सौदामिनी म्हणाली माझ्या अपघाती मृत्यूनंतर मला माझ्या मुलीसाठी येथेच राहावे लागले.मुलीचा प्रतिपाळ व्यवस्थित होत आहे ना हे मला पाहायचे होते.अशोक व त्याचे आई वडील माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घेताना पाहून मला आनंद होत होता .मी निघून जाणार होते. एवढ्यात अशोकच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.माझ्या मुलीला सावत्र आई येणार हे पाहून मी दुःखी झाले.तू आपल्या मुलाकडे जास्त लक्ष देशील.माझी मुलगी दुर्लक्षित राहील.कदाचित तिचा छळ होईल असेही मला वाटत होते.माझे तुझ्यावर लक्ष होते .

सौदामिनी  बोलत असताना अशोक खोलीत आला .त्याला पाहून सौदामिनी अंतर्धान पावली .अशोकने सुहासिनीला  तू कुणाशी बोलत होतीस असे विचारले.त्यावर तिने तुमच्या पहिल्या पत्नीशी सौदामिनीशी असे उत्तर दिले. तुला भास झाला असेल,सौदामिनीचा मृत्यू झाला आहे,ती आता कशी येऊ शकेल? असे अशोकने तिला विचारले .त्यावर सुहासिनी म्हणाली ,तुमच्या बायकोला तुमच्या मुलीची काळजी वाटत होती .तुम्ही तिचे पालन व्यवस्थित करीत आहात का? तुम्ही दुसरे लग्न करणार आहात का? तिला सावत्र आई आणणार  आहात का ?हे सर्व पाहायचे होते.तुम्ही दुसरे लग्न केले. मालिनीला सावत्र आई आणली. सावत्र आई, मालिनीला त्रास देत नाही ना हेही तिला पाहायचे होते.ती तुमच्यावर व माझ्यावर लक्ष ठेवून होती .तिचा जीव तिच्या मुलीत गुंतलेला असल्यामुळे ती येथे अडकून पडली होती .त्या संदर्भातच ती माझ्याशी बोलत असताना तुम्ही अकस्मात आलात आणि ती अंतर्धान झाली .

अशोक आपल्या पत्नीकडे आश्चर्याने पाहात होता.

तिच्या डोक्यावर काही परिणाम तर झाला नाही ना असा त्याला संशय येत होता .

आपली पूर्वपत्नी आपल्यावर लक्ष ठेवून असेल यावर त्याचा विश्वास नव्हता.

हे सर्व कमकुवत मनाचे खेळ आहेत असे त्याला ठामपणे वाटत होते . 

दुसऱ्या दिवशी आपल्या पत्नीला मनोचिकित्सकाकडे घेऊन गेले पाहिजे असे त्याने मनोमन ठरविले .

त्याच रात्री त्याची पूर्वपत्नी सौदामिनी त्याच्या स्वप्नात आली .

तिने सुहासिनीला भास झाला नाही. मी खरेच तिला भेटले.मी तुझ्यावर लक्ष ठेवून होते .

माझा जीव माझ्या मुलीत अडकला होता.आणि अजून अडकलेला आहे .

सुहासिनी मालिनीची पूर्ण काळजी घेईल, तिला आपल्या स्वतःच्या मुलींसारखीच वागवील, याची मला खात्री पटल्याशिवाय मला गती मिळणार नाही.असे तिने सांगितले .

*अशोक स्वप्नातून दचकून जागा झाला .*

*सुहासिनी आपल्याजवळ जे काही बोलली त्याचा परिणाम म्हणून तर आपल्याला स्वप्न पडले नाही ना असे त्याला एकदा वाटत होते *

*तर स्वप्नात खरेच सौदामिनी आली होती असा त्याला अंतर्यामी विश्वास वाटत होता .*

(क्रमशः)

२०/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel