~मधुसूदन~

तिला आणखी काही तरी मला सांगायचे होते परंतु तेवढ्यात घडाळ्याचा गजर झाल्यामुळे मी स्वप्नातून  जागा झालो .

मी रोज रात्री माझी आई स्वप्नात येईल आणि  त्या रात्री अपुरे राहिलेले तिचे मनोगत पूर्ण करील म्हणून वाट पाहत होतो .मी रोज आतुरतेने झोपत असे परंतु ती स्वप्नात येत नसे. ती स्वप्नात न येता प्रत्यक्ष मनुष्यरूप धारण करून जरी मला भेटली असती तरी चालले असते.मला असे वाटू लागले की आपण त्या टेकडीवर गेले पाहिजे. ती तिथे मला नक्की भेटेल . तीन चार रात्री तशाच गेल्या तरीही माझी आईं माझ्या स्वप्नात आली नाही .अंतर लांब असले तरी वेळ काढून शक्य तितक्या लवकर टेकडीवर जाण्याचे मी निश्चित केले.

मी माझ्या ओळखीच्या एका आर्किटेक्टला बोलाविले. टेकडीचा चारी बाजूंनी घेतलेला फोटो त्याला दाखविला .एकूण किती एकर क्षेत्रफळ आहे तेही त्याला सांगितले . टेकडीचे स्वरूप कसे असावे असे मला वाटते ते त्याला सांगितले .

मी टेकडीचे तीन भाग कल्पिले होते.एका भागात हापूस आंब्यांच्या कलमांची बाग असावी, दुसर्‍या  भागात काजूची बाग व  तिसऱ्या  भागात जंगली झाडे असावीत .टेकडीच्या माथ्यावर एक हनुमान मंदिर असावे .मंदिराला जाण्यासाठी अर्थातच रस्ता असावा .सर्व टेकडीवर चारी बाजूनी रस्ता गेलेला असावा ज्यामुळे मोटारीने सर्वत्र व्यवस्थित फिरता येईल .एक छानपैकी रिसॉर्ट व स्वतःला राहण्यासाठी टुमदार बंगला असावा.

माझ्या मनातील चित्र त्याला प्रत्यक्षात उभे करायचे होते.त्याने प्रत्यक्ष टेकडीला भेट द्यावी आणि नंतरच आपली योजना कागदावर उतरवावी असे मी त्याला सांगितले.दोनच दिवसात तो टेकडी पाहण्यासाठी रवाना झाला .विसूला फोन करून मी त्याला आर्किटेक्ट येत आहे त्याला सर्व मदत कर असे सांगितले. 

त्या रात्री पुन्हा आई माझ्या स्वप्नात आली .या वेळी बाबा व माझी भावंडे मला भेटण्यास आली होती .त्या सर्वांना पाहून मला खूप आनंद झाला .आई  म्हणाली,"या जगात शाश्वत असे काहीही नाही हे मला माहीत आहे .तुला भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे अपघाताने आम्ही या योनीमध्ये राहिलो .आम्हाला भेटलास आमची इच्छा पूर्ण झाली .तू सुखात आहेस तुला चांगले आई वडील मिळाले हे पाहून आम्हाला आनंद होत आहे. तुझी पत्नी,आमची सूनबाई  हिला पाहून व नातवंडांना पाहून आम्हाला परमानंद झाला.त्यांच्याशी बोलता आले असते तर आनंद झाला असता.परंतु आम्हालाही आमच्या मर्यादा आहेत .आम्ही त्यांना भेटू शकत नाही. त्यांच्या स्वप्नात जावू शकत नाही.त्यांच्याशी बोलू शकत नाही .आम्ही फक्त त्यांना पाहू शकतो.आम्हाला त्यातच समाधान मानून घेतले पाहिजे."   

"आता आम्ही फार काळ  या योनीमध्ये राहू असे मला वाटत नाही .आम्ही सर्व टेकडीवर भटकत होतो .आता तू टेकडी विकसित करीत आहेस ही फार चांगली गोष्ट आहे .मी नेहमीच हनुमानाची उपासना करीत आले .शनिवारचा उपवास केला.हनुमान दर्शनाशिवाय तोंडात पाणी घेतले नाही.तीच उपासना तुझ्या  रक्तामध्ये आली आहे.तू टेकडीच्या माथ्यावर हनुमान मंदिर बांधीत आहेस ही फार चांगली  गोष्ट आहे ."

"टेकडी हिरवीगार करण्याचे तुझे स्वप्न छान आहे.आमच्यामुळे टेकडीवर दहशत निर्माण झाली .आम्ही सर्व टेकडी उजाड व भकास  केली.सभोवतालच्या टेकडय़ा हिरव्यागार असताना आपणच असे उजाड कां ?याचे वैषम्य टेकडीला वाटत आले आहे .ते मला जाणवले आहे .परंतू कुणाचाच कशाला इलाज नव्हता .आम्ही आत्तापर्यंत उन्हात पावसात राहिलो .आम्ही जरी या योनीमध्ये असलो तरीही आम्हाला आसरा असावा असे वाटते .समुद्राच्या बाजूला टेकडीच्या पायथ्याला तू आमच्यासाठी एक छोटेसे घर बांध.आमची वेळ येईपर्यंत आम्ही त्यात राहू .टेकडीवर येणाऱ्या जाणाऱ्यांना रिसॉर्टमध्ये राहणाऱ्यांना मंदिराला भेट देणाऱ्यांना आमचा त्रास होणार नाही .यथावकाश आम्ही घर सोडून गेलो तरी ते आमचे स्मारक म्हणून राहील. तू यशस्वी हो.आनंदी रहा. तुझ्या आई वडिलांवर हल्लीप्रमाणेच सुखाची सावली धर".

बाबानी मला आशीर्वाद दिला.भावंडानी माझा निरोप घेतला.आणि सर्वजण अदृश्य झाले .मी स्वप्नातून जागा झालो.  

~टेकडी ~

कधीतरी माझे भाग्य उजळेल असे मला कधीही वाटले नव्हते .त्यादिवशी तिघेजण येथे बसून बोलत होते त्यातील एका बाबाने मला विकत घेतले आणि तेव्हापासून भाग्य उजळण्याला सुरुवात झाली.यापूर्वी जो कुणी येथे येण्याचे धाडस करीत असे त्याला गडगडत पायथ्याला जावे लागे.माणसांच्या बाबतीत हे जितके खरे होते तितकेच प्राण्यांच्याही बाबतीत खरे होते .त्यामुळे सर्व प्राणी मला वळसा घालूनच जात असत .माझ्यावरील आकाशात एकही पक्षी उडत नसे .कोणतेही गवत उगवत नसे.

आजूबाजूला जीवन फुलताना विस्तारताना दिसत असे .माझ्या इथे मात्र काहीही नसे.त्या दिवसापासून माझ्या आश्रयाला आलेले ते अतृप्त आत्मे शांत झाले.त्यांनी त्रास देण्याचे सोडले .आता ते कुणालाही माझ्या अंगाखांद्यावर खेळू बागडू नाचू फिरू देत होते.

थोड्याच दिवसात माझ्यात आमूलाग्र बदल होऊ लागला . माझ्या पायथ्याला समुद्र किनाऱ्यालगत एक सुंदर संगमरवरी घर उभे राहिले . माझ्या अंगावर फिरणारे अतृप्त आत्मे त्या घरात राहू लागले .नंतर एके दिवशी मी पाहते तो ते सर्व आत्मे कुठेतरी निघून गेले होते .बहुधा  ही माणसे सद्गती की काय म्हणतात ती त्यांना मिळाली असावी .

माझ्या माथ्यावर हनुमानाचे एक सुंदर मंदिर उभे राहिले .एखाद्या सापाच्या वेटोळ्यासारखा सुंदर डांबरी रस्ता माझ्या अंगाभोवती तयार झाला . समुद्राकडे तोंड करुन एक बंगली मध्यावर बांधण्यात आली. त्या बंगलीत, त्या आत्म्यांचा ,तो लाडका बाबा त्याच्या पत्नी मुलांसह अधूनमधून  रहाण्यासाठी येण्याला सुरुवात झाली. काजूची बाग व अांब्यांची बाग यांच्यामध्ये  समुद्राकडे तोंड करून एक रिसॉर्ट बांधण्यात आले .तिथे  माणसांची खूप गजबज असते .

एका बाजूला कलमांची बाग, दुसर्‍या  बाजूला काजूची बाग, तर तिसर्‍या  बाजूला निरनिराळ्या वृक्षांचे घनदाट जंगल उभे राहिले. टेकडी एखाद्या रंगी बेरंगी वृक्षांनी अाच्छादिलेल्या  पिरॅमिड सारखी दिसू लागली .

जवळजवळ दोन ते तीन वर्षे  विकास काम चालले होते . देखभाल तर अजूनही चाललेली असतेच .त्या लाडक्या बाबाजवळ खूप पैसा असावा .  माझ्यावर त्याचे निरतिशय प्रेम असावे. मी हिरवीगार व्हावी म्हणून त्याने अतोनात पैसा खर्च केला .

आता वानर माझ्या अंगाखांद्यावर खेळतात .

गुरेढोरे मुक्तपणे फिरतात .

पक्षी आकाशातून उडतात. झाडावर येऊन बसतात. घरटी बांधतात. सकाळी त्यांची किलबिल  चाललेली असते .ते संगीत ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात .

* एके काळी मी इतर टेकड्यांकडे असूयेने पाहात असे.*

*आता इतर माझ्याकडे असूयेने पाहतात.* 

*मी इतकी सुंदर,इतकी देखणी ,इतकी आकर्षक, झाले आहे की सर्वजणी माझा हेवा करतात .*   

* कित्येक वर्षे मी जी अवहेलना सहन केली, मी जे दुःख भोगले, त्याचा पुरेपूर वचपा आता निघत आहे .*

* आता माझे नावसुद्धा बदलले आहे. पूर्वी मला भुतांची टेकडी म्हणून म्हटले जात असे.*

* हल्ली माझा उल्लेख हनुमान टेकडी म्हणून केला जातो*.

* ज्याचा शेवट गोड ते नेहमीच गोड .*

(समाप्त)

१९/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel