हणमंतराव समुद्रावर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक घेण्यासाठी आले होते.या समुद्र किनाऱ्याला अलीकडेच पाचपंचवीस बंगले उभे राहिले होते .मुंबईतील रईसानी जागा घेऊन इथे बंगले बांधले होते.हा समुद्र किनारा अजून बऱ्याच जणांना  माहिती झाला नसल्यामुळे इथे अजून गर्दी झाली नव्हती. त्यामुळे समुद्र किनारा स्वच्छ होता .येथे संध्याकाळी थोडी बहुत गर्दी होत असे पण ती नगण्य  स्वरूपाची होती.हातातील काठी गरगर फिरवित तर कधी टेकीत हणमंतराव झप झप चालले होते . हणमंतराव निवृत्त झाल्यावर त्यानी इथे हा बंगला बांधला होता .ते कधी इथे तर कधी मुंबईला राहात असत .

चालताना त्यांना दूरवर किनार्‍यावर काहीतरी पडलेले दिसले.डोळे किलकिले करून त्यांनी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला .परंतु नीट काही दिसत नव्हते .बहुधा  भरतीबरोबर समुद्रातून एखादा लाकडाचा ओंडका किनाऱ्यावर येऊन पडला असावा किंवा एखादा मनुष्य आरामशीर  वाळूवर आडवा झाला असावा असे वाटत होते.नेहमीपेक्षा अंतर थोडे दूर होते तरीही जवळ जाऊन काय आहे ते बघावे अशी जिज्ञासा हणमंतरावांच्या मनात निर्माण झाली .थोडे चालल्यावर त्यांना मनुष्यच आडवा आहे याची खात्री पटली  . तो मनुष्य काहीही हालचाल करीत नव्हता. एखादे प्रेत तर किनाऱ्याला येऊन लागले नाही ना असा विचार हणमंतरावांच्या मनात आला .एखादे प्रेत असेल तर आपण निष्कारण पोलिसांच्या चक्रात सापडू त्यापेक्षा  इथूनच परत फिरावे असा विचार त्यांच्या मनात आला. परंतु जर धुगधूगी असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे असाहि विचार त्यांच्या मनात आला आणि ते त्या मनुष्याच्या दिशेने वेगाने चालू लागले.

जवळ गेल्यावर त्यांना तो मनुष्य जिवंत आहे असे आढळून आले.तो अर्थातच बेशुद्ध होता .त्याचे अंग गांधीलमाशा चावल्यामुळे भप्प सुजले होते.तेलात टाकून तळलेल्या पुरीप्रमाणे तो सुजला होता.त्याच्या अंगात गांधीलमाशांच्या नांग्या अडकून पडलेल्या दिसत होत्या .हणमंतरावानी आपला मोबाइल लगेच काढला आणि फोन केला.त्यांच्या बंगल्यातून दोन गडी लगेच धावत आले.थोड्याच वेळात धावतच ते हणमंतरावांजवळ आले.त्यातील एका गडय़ाने अरे हा तर परसूचा भाऊ नरसू म्हणून त्याला ओळखले .गड्यांनी त्याला उचलून बंगल्यात नेले आणि हणमंतरावानी मोटारीतून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले .

एका गडय़ाने लगेच परसूला त्याचा भाऊ गांधीलमाशा चावल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून कळविले.तरी मी त्याला सांगत होतो की त्या देवाच्या माशा आहेत तू तिथे जाऊ नको.तरी त्याने माझे ऐकले नाही.देवाच्या माशा असल्या म्हणून काय झाले त्या माझ्या भावाला चावल्या मी त्यांना सोडणार नाही .मी त्यांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही.मी सूड घेणार .असे बरेच काही तो बडबडत होता .त्याच्या बोलण्यावरून त्या माशा कुठे आहेत ते त्याला चांगलेच माहीत असावे .नरसूने त्या माशानी बांधलेले पोळे जाळून मध काढावा असाही विचार केला असावा,परंतु परसूने त्याला विरोध केला असावा असे दिसत होते.

परसू जवळ चौकशी करता पुढील प्रमाणे माहिती मिळाली.समुद्रामध्ये उजवीकडचा डोंगर जरा जास्तच घुसला होता . त्या डोंगरात गुहा होत्या .ती प्राचीन लेणी होती .त्या गुहांमध्ये काही मूर्ती होत्या .त्यातील एका गुहेमध्ये छताला खूप मोठे पोळे  गांधीलमाशानी बांधले होते.एक दिवस दोघे भाऊ फिरत असताना त्यांना ते आढळले . ते पोळे पाहिल्यावर नरसू हे पोळे आपण काढू  आणि त्यातील मध विकू असे म्हणत होता.परसूने त्याला सक्त विरोध केला .तिथे खाली गणपतीची मूर्ती होती .छताला पोळे होते.हे देवाचे पोळे आहे. या देवाच्या माशा आहेत. त्यांना आपण त्रास देता कामा नये.असे परसूचे म्हणणे होते.तर नरसू ते पोळे काढणारच असे म्हणत होता.शेवटी परसूने त्याचा नाद सोडला तुला जे काही करायचे असेल ते कर मी तुझ्या बरोबर येणार नाही म्हणून त्याला सांगितले .

नरसू परसू दोघे सख्खे भाऊ त्यांच्यामध्ये अलोट प्रेम होते .कुठेही कामांवर दोघे एकत्र जात असत .मासे मारायला,कालवे काढायला,आंबे काढायला, लाकडे फोडायला,किंवा आणखी कुठे ,दोघे नेहमी एकत्र जात असत.ती जोडगोळी सर्वत्र प्रसिद्ध होती .मी येत नाही असे म्हटल्यावर नरसू माशांचा नाद सोडील असे परसूला वाटले होते.परंतु  नरसू एकटाच बहुधा ते पोळे काढण्यासाठी गेला होता. नरसू शुद्धीवर आल्याशिवाय नक्की काय झाले ते कळणार नव्हते.डॉक्टरांना हा जगेल की नाही तेही नक्की सांगता येत नव्हते.असंख्य माशा चावल्यामुळे त्यांचे विष त्याच्या अंगात भिनले होते.

नरसूचे दैव बलवत्तर असल्यामुळे आठ दिवसांनी का होईना परंतु तो शुद्धीवर आला.त्याने पुढील हकिगत सांगितली .परसूने मी येणार नाही असे स्पष्ट सांगितल्यावर तो एकटाच सर्व तयारी करून गुहेमध्ये गेला.घोंगडीने त्याने आपले सर्व अंग झाकून घेतले होते.बरोबर त्याने दोन चुडी(बांबूच्या बारिक काड्यांची किंवा गवताची मोळी) घेतल्या होत्या.रॉकेलची एक बाटली काडेपेटी  वगेरे सामुग्री घेतली होती .चुडीवर रॉकेल ओतून त्याने ती पेटविली.माशा जाळण्यासाठी त्याने चूड पोळ्याखाली धरली .माश्या जळून पटपट खाली पडू लागल्या.एवढ्यात वाऱ्याच्या मोठा झोत आला चूड  विझली .वाऱ्याच्या झोताने त्याची घोंगडी बाजूला सरकली .माशा त्याच्या अंगाला डसू लागल्या .तो गुहेतून वेड्यासारखा धावत सुटला .माशानी त्याचा पाठलाग सोडला नाही.हाताने माशा मारीत तो सुसाट गावाच्या दिशेने पळत होता .माशा त्याच्या पाठीमागून झपाट्याने उडत येत होत्या .माशांच्या चाव्यानी तो बेजार झाला.पुढे काय झाले ते त्याला आठवत नव्हते.तो शुद्धीवर आला ते हॉस्पिटलमध्ये .

सर्व हकिगत ऐकून परसू माशांवर फार चिडला.देवाच्या माशा असल्या म्हणून काय झाले त्यांनी नरसूला इतके चावावे हे त्याला आवडले नाही . वाटेल ते करून त्या माशांना मी जाळून टाकीन अशी प्रतिज्ञा त्याने केली.

त्यासाठी त्याने जय्यत तयारी केली .घोंगडीची संपूर्ण खोळ शिवून घेतली .एक साधा चष्मा घेतला.एकच तोंड असलेल्या लहान गुहेमध्ये जाळ केल्यावर एकदम हवेचा झोत आत शिरतो तसे होऊ नये म्हणून गुहेला दुसर्‍या बाजूने एक मोठे छिद्र  पाडले .पहारीने हे छिद्र  पाडण्यासाठी त्याला आठ दिवस लागले .छिद्र  पाडताना माशा चवताळू नयेत याची त्याला काळजी घ्यावी लागली .तोपर्यंत नरसू बरा होऊन घरी आला होता. आपल्या योजनेची बातमी त्याने कुणालाही कळू दिली नाही .जर ही बातमी कुणाला कळली असती तर त्याला कुणीही तिथे जाऊ दिले नसते.

तयार केलेल्या चुडी, घोंगडीची खोळ, रॉकेलची बाटली इ. सामान त्याने एकेक करून अगोदरच गुहेत नेऊन ठेवले होते .मासे पागायला जातो असे सांगून तो संध्याकाळी घरातून बाहेर पडला .नरसू अजून पूर्ण बरा झालेला नसल्यामुळे तो त्याच्याबरोबर येण्याचा प्रश्नच नव्हता.गुहेमध्ये जाऊन त्याने घोंगडीची खोळ अंगावर चढविली.

चष्मा घातला .हातामध्ये त्याने मोजेसुद्धा घातले होते.पूर्ण तयारीनिशी  सर्व काळजी घेऊन त्याने चूड पेटविली.ती पेटलेली चूड त्याने मधमाशांच्या पोळ्याखाली धरली. एक चूड पूर्ण पेटल्यामुळे नंतर विझली तर त्यांने  दुसरी चूड जय्यत तयार ठेवली होती .अरुंद गुहेला दुसरे मोठे छिद्र  पाडल्यामुळे वाऱ्याचा झोत एकदम आत शिरला नाही .माशा पटापटा मरून अभिषेक केल्यासारख्या देवाच्या डोक्यावर पडू लागल्या .काही माशा  पिसाटासारख्या त्याच्या अंगावर येवून बसत होत्या.परंतू घोंगडी हातमोजे व चष्मा यामुळे त्यांना परसूला चावता येत नव्हते .गूं गूं करीत त्या गुहेत वेड्यासारख्या त्यांचा शत्रू शोधत फिरत होत्या. थोड्याच वेळात बर्‍याच  माशा मरून खाली खच पडला.उरलेल्या माशा गुहेतून बाहेर पडून उडत दिसेनाश्या झाल्या.दुसरीकडे कुठे तरी पोळे बांधण्यासाठी त्या जागा शोधीत गेल्या असाव्यात .

सर्व गांधील माशा दिसत नाहीश्या झाल्यावर परसूने छताला चिकटलेले पोळे अलगद सोडवून काढले. त्या अगोदर गुहेतील देवाला साष्टांग नमस्कार घातला .देवाचे पोळे जाळल्याबद्दल त्याने देवाची क्षमा मागितली . आणि नंतर अगोदरच नेऊन ठेवलेल्या भांड्यात ते पोळे पिळण्यास त्याने सुरुवात केली . भांड्यात सर्व मध गोळा झाल्यावर त्याने त्यातील वाटीभर मध देवाच्या पुढ्यात  नेवैद्य म्हणून ठेवला .जवळच असलेल्या समुद्रावर जाऊन त्याने हात पाय व्यवस्थित धुतले .मधाचे भांडे खांद्यावर घेऊन सूड घेतल्याच्या समाधानाने तो आपल्या घरी निघाला .

२६/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel